ॲरिस्टोफेनीस : (सु. ४४६-३८६ इ. स. पू.). एक ग्रीक सुखात्मिकाकार.‘ॲरिस्टोफेनीसला सुखात्मिकेचा जनक’ आणि ‘प्राचीन सुखात्मिकेचा राजा’ असे म्हटले जाते. जन्म अथेन्स येथे. त्याच्या पित्याचे नाव फिलिपॉस व आईचे झेनोडोरा. ईजायना बेटावर आपल्या कुटुंबासह ते राहत होते.
जुन्या अथेन्सचे वर्णन त्याने आपल्या लेखनात अधिक बारकाईने केले आहे. द बँक्विटर्स, द बॅबिलोनियस आणि द आकार्नीअन्स ही त्याची पहिली तीन नाटके. यांपैकी पहिली दोन अनुपलब्ध आहेत. टोपणनावाने लिहिलेल्या या नाटकांतून त्याने अथेन्समधील युद्धपक्षाचा नेता क्लीऑनवर टीका केली होती. स्पार्टावर विजय मिळविण्याच्या हेतूने क्लीऑन कार्यरत होता. द नाईटस् (इ. स. पू. ४२४) हे नाटक मात्र त्याने स्वत:च्या नावावर प्रसिद्ध केले आणि क्लीऑनवर उघडपणे टीका केली. पेलोपनीशियन युद्धाच्या कालखंडात (४३१-४०४ इ. स. पू.) ॲरिस्टोफेनीसचे बरेचसे नाट्यलेखन झाले. युद्धाची अनर्थकारकता अनुभवल्यानेच तो युद्धाचा कट्टर विरोधक झाला असावा. द पीस (इ. स. पू. ४२१) आणि लिसिस्ट्राटा (इ. स. पू. ४११) ह्या दोन नाटकांतून त्याने आपली युद्धविरोधी भूमिका परिणामकारकपणे मांडली आहे. क्लीऑनचा युद्धपक्षाने स्पार्टावर विजय मिळवून तेथील शिपायांना युद्धकैदी म्हणून अथेन्समध्ये आणले होते. या युद्धामुळे राज्यातील शेतकरी व जमीनमालक यांचे मोठे नुकसान झाले. स्पार्टामध्ये काव्य, संगीत आणि नृत्य यावर बंदी घालण्यात आली होती. ॲरिस्टोफेनीससारख्या धार्मिक उदारमतवादी विचारांच्या लोकांना या परिस्थितीची झळ पोहोचली होती. द पॉस्पस (इ. स. पू. ४२२), द क्लाऊड्स (इ. स. पू. ४२३) आणि द पीस (इ. स. पू. ४२१) ह्या त्याच्या राजकीय सुखात्मिका, द क्लाउड्स मध्ये सॅफिस्ट आणि सॉक्रेटीस ह्यांच्यावर टीका आहे. द पॉस्पसमध्ये न्यायालयातील ज्यूरी-पद्धतीवर टीका आहे. थेस्मोफोरियात्सुझे (इ. स. पू. ४११) आणि फ्रॉग्ज (इ. स. पू. ४०५) मधून त्याने एस्किलस व यूरिपिडीझ या ग्रीक नाटककारांच्या शोकांतिकांचे विडंबन केले आहे. द बर्ड्रस ही ॲरिस्टोफेनीसची एक कल्पनारम्य सुखात्मिका होय. प्लूटूस (इ.स.पू. ३८८) या नाटकात संपत्तीची समान विभागणीची कल्पना प्रत्यक्षात आणल्यास त्याचे काय परिणाम होतील हे चितारले आहे.
ॲरिस्टोफेनीस आणि निनॅडर यांनी ग्रीक सुखात्मिका संपन्न केली. तत्कालीन राजकीय परिस्थिती, शिक्षणप्रणाली आणि ग्रीक शोकांतिका यांचा आपल्या नाटकांतून ॲरिस्टोफेनीस याने तीव्र उपहास केला. ॲरिस्टोफेनीसच्या सुखात्मिका म्हणजे अथेन्समधील तत्कालीन जीवनावरील त्याची भाष्येच होत. तत्कालीन जीवनात त्याला जाणवलेले दोष व विसंगती ह्यांविरुद्ध त्याने आपल्या उपरोधपूर्ण शैलीत लेखन केले आहे. रचनेच्या दृष्टीने काहीशा विस्कळीत असल्या व विनोद काही वेळा असभ्यतेच्या पातळीवर उतरत असला तरी जून्या ग्रीक सुखात्मिकेच्या सर्व वैशिष्ट्यांचे परिपक्व रूप ॲरिस्टोफेनीसच्या नाटकांतून दिसते. जुन्या ग्रीक सुखात्मिकेत शांतता, लोकशाही, शिक्षण यांसारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर त्याची टीका आहे.
ॲरिस्टोफेनीसनंतर ग्रीक सुखात्मिकेचे एक पर्व संपले. त्याच्या निधनानंतर काही वर्षांच्या कालावधीतच ग्रीक नवसुखात्मिका अवतरली प्लूटूस ही सुखात्मिका जुन्या आणि नव्या ग्रीक सुखात्मिकेच्या संक्रमणकाळात लिहिल्या गेली. द बर्डस् ही त्याची समाजशास्त्रीय सुखात्मिका. त्याच्या कोकालुस ह्या नाटकाने सुखात्मिकांना एक नवे वळण लावले असे समजले जाते. ग्रीक सुखात्मिका मुख्यत: अथेन्समध्ये विकसित झाली होती. स्वतंत्र वातावरण असल्यामुळेच क्लीऑनसारख्या लोकनेत्यांवरही ॲरिस्टोफेनीससारखा नाटककार टीका करू शकत होता. इ. स. पू. ४०४ मध्ये अथेन्सचा स्पार्टाकडून पराभव झाला आणि इ. स. पू. ३३८ मध्ये संपूर्ण ग्रीस मॅसिडोनियाच्या आधिपत्याखाली आला, त्यामुळे पारतंत्र्यात लेखनस्वातंत्र्य उरले नाही. म्हणूनच सुखात्मिकांतून अशा प्रकारची टीका नाहीशी झाली व कल्पनानिर्मित व्यक्तिरेखांच्याद्वारे तत्कालीन जीवनाचे चित्रण सुखात्मिकांतून होऊ लागले. राजकीय विषयांपेक्षा लोकांच्या वर्तनतर्हा हे उपरोधाचे लक्ष्य बनले.
ॲरिस्टोफेनीसच्या नाटकात कथानकापेक्षा तत्कालीन विषय व व्यक्ती यांवर जहाल औपरोधिक टीका अथवा त्यांचे विडंबन आहे. त्याने पशूपक्षी, ढग, गांधीलमाशा, यांचाही व्यक्तिरेखा म्हणून उपयोग केला आहे. विनोदी नाटकातील समूहदृश्यांमध्ये अभिनेते/नट घोड्यांचे मुखवटे व शेपटांचा प्रतिकात्मक स्वरुपात वापर करत असत. नाटकाचे सौंदर्य वाढवणारा घटक म्हणून पारंपरिक संकेत व प्रतिकात्मकता यांचा प्रभाव दिसून येतो.
लेखनासोबतच पुस्तकांचे जतन करण्यातही त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. ईजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे ग्रीक राजा पहिला टॉलेमी (इ. स. पू. २९०) याने महत्त्वाचे ग्रंथालय स्थापन केले होते. फिलाडेल्फस व तिसरा टॉलेमी या राजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. डीमीट्रिअस, झिनॉडोटस्, अपोलोनीयस यांबरोबर ॲरिस्टोफेनीसने या ग्रंथालयाचे ग्रंथपालपद भूषविले होते. अनेक महत्त्वाचे ग्रंथ जमवून त्याचे भाषांतर व १२० विषयांत त्याचे वर्गीकरण व सूचीही तयार केली होती.
वयाच्या ६० व्या वर्षी डेल्फी येथे तो मरण पावला.
संदर्भ : https://www.britannica.com/biography/Aristophanes
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.