ग्रीक पुराकथेतिहासामध्ये नाईकी ही विजयाची देवता म्हणून प्रचलित आहे. टायटन पॅलेस आणि सरिद्देवता स्टिक्स यांच्या पाच अपत्यांपैकी एक होय. ही नेहमी स्त्रीदेवता म्हणून वर्णिली जाते. टायटनविरुद्धच्या लढाईमध्ये तिने देवांना साहाय्य केल्याबद्दल झ्यूसने तिचा आदरसत्कार केल्याचे सांगितले जाते. याचेच प्रतीक म्हणून इ.स.पू. पाचव्या शतकामध्ये अथेनिअन लोकांनी पर्शियन लोकांना सागरी युद्धामध्ये पराभूत केल्यावर या देवतेचे स्मारक डेल्फी या ठिकाणी बांधले. यासोबतच क्रीडापटू आणि रथवाहक यांनीसुद्धा खेळामध्ये विजय मिळविल्यावर या देवतेचा सत्कार केल्याचे आढळते. रोमन लोकांसाठी ही देवता मृत्यूवरील विजयाचे द्योतक आहे. रोमन लोकांनी तिला पुढे व्हिक्टोरिया असे संबोधिले असून पृथ्वीवरील विजयाची देवता म्हणून तिला प्राचीन शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये स्थान दिलेले दिसून येते. व्हिक्टोरियाला समर्पित अशी यज्ञस्थली (यज्ञवेदिका) ऑगस्टसने इ.स.पू. २९ मध्ये सीनेट हाउसमध्ये स्थापिल्याचे प्रख्यात आहे.
संदर्भ :
- Barthell, Edward E. Gods and Goddesses of Ancient Greece, Florida, 1971.
- Cotterell, Arthur, A Dictionary of World Mythology, Oxford, 1990.
समीक्षक : शकुंतला गावडे