प्राचीन ग्रीक समुद्रदेवता. तसेच तो अश्व आणि भूकंपाचा देव म्हणूनही ओळखला जातो. त्याचा काही वेळा पोसिडॉन असाही उच्चार केला जातो. त्याच्या नावाचा अर्थ पृथ्वीचा पती किंवा पृथ्वीचा स्वामी असा होतो. पोसायडनचा उल्लेख इलियड आणि ओडिसी ह्या दोन्ही महाकाव्यात येतो. झ्यूस आणि हेडीस हे त्याचे भाऊ; तर क्रोनस व रीया हे आईवडील होत. क्रोनसला नष्ट केल्यावर झ्यूस, पोसायडन आणि हेडीस ह्या तिघांनी पृथ्वी, स्वर्ग, समुद्र आणि पाताळ असे आपापसांत विभागून घेतले. समुद्र पोसायडनकडे आला. त्याच्या हातात त्रिशूळ असून त्याच्या साहाय्याने तो समुद्रात त्सुनामी, मोठ्या लाटा, भोवरे निर्माण करतो. तो अतिशय क्रुद्ध स्वभावाचा आहे, असे मानले जाते. त्याचा संबंध कोरड्या जमीनीशीही संगितला जातो. त्याची उपासनाकेंद्रे ही त्यात पाण्याचा स्रोत असलेली अशीच आहेत. तो प्राचीन ग्रीक समुद्रदेव पॉण्टस ह्याच्याहून वेगळा मानला आहे.

रथात बसलेले पोसायडन आणि अँफिट्राइटी

पोसायडन, अथेना आणि मेडुसा : अथेना आणि पोसायडन यांच्यात स्वामित्व कोणाचे असावे, यावरून वाद निर्माण झाला. तेव्हा झ्यूसच्या सांगण्यावरून त्यांनी भेट म्हणून एक एक मौल्यवान वस्तू भेट म्हणून द्यायची, तेव्हा पोसायडनने पाण्याचे कारंजे तयार केले. मात्र ते कारंजे खाऱ्या पाण्याचे निघाल्याने नगरवासीयांना त्याचा उपयोग नव्हता; तर अथेनाने ऑलिव्हचे झाड लावले, जे शांतता व समृद्धीचे प्रतीक होते. साहजिकच नगरवासीयांनी अथेनाची निवड केली. यावरून पोसायडन आणि अथेना यांच्यात अधिक वितुष्ट निर्माण झाले. स्वामित्वाच्या मुद्द्यावरून झालेला वाद पोसायडन विसरला नव्हता आणि त्याने अथेनाच्या मंदिराची पुजारीण असलेल्या सुंदर मेडुसावर  बळजबरी केली आणि निघून गेला. मात्र मंदिराची पुजारीण ही कुमारी असली पाहिजे, असे बंधन असल्या कारणाने मेडुसा आपले पुजारीपद तर गमावतेच; पण तिला अथेनाच्या शापालाही बळी पडावे लागते. अथेनाच्या शापामुळे ती पंखधारी व केसांच्या जागी साप तसेच अर्धे शरीर सापाचे असलेली राक्षसीण बनते. मेडुसापासून पोसायडनला पेगॅसस (Pegasus) नावाचा पंखधारी अश्व उत्पन्न होतो. काही कथांमधून पोसायडन मेडुसाच्या प्रेमात पडला, तर काही कथांमध्ये तो तिच्याकडे आकर्षित झाला, असे मानले जाते.

पोसायडनचा विवाह पॉण्टसची नात अँफिट्राइटी हिच्याशी झाला. तिला पोसायडनने तिच्या शंभर बहिणींमधून निवडले होते. मात्र ती ॲटलासकडे पळून गेली; पण पोसायडनने डॉल्फिन्स पाठवून तिला परत आणले. ग्रीक शिल्पकलेमध्ये अँफिट्राइटी पोसायडनसह सिंहासनावर विराजमान असलेली किंवा पोसायडनबरोबर रथातून, जो रथ समुद्री प्राणी ओढत आहेत अशा रथात, बसलेली दिसते. त्याच्या अनेक संतती होत्या. इओल्कसचे जुळे राजपुत्र पीलिअस आणि नीलिअस हे पोसायडनचे पुत्र असल्याने पोसायडन हा थेसाली आणि मीसेनिया या राजघराण्यांचा दैवी पूर्वज ठरला.

ओडिसस आणि पोसायडन : पोसायडन हा पॉलिफिमस या एकाक्ष राक्षसाचा पिता होय. इथिकाचा राजा ओडिसस ट्रॉयचे युद्ध संपल्यावर घरी जाताना सायक्लोप्स बेटावर येऊन पोहोचतो. पॉलिफिमस त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह एका गुहेत कोंडून ठेवतो. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी ओडिसस त्याला खूप मद्य पाजतो आणि पळून जाताना आपले नाव ‘कोणीच नाही’ असे त्याला सांगतो. त्यामुळे ओडिसस जेव्हा त्याच्यावर आग टाकून पळून जात असतो, तेव्हा मला कोणीच नाही मारले असे पॉलिफिमस ओरडून सांगतो; पण त्याच्या मदतीला कोणीच येत नाही. त्यामुळे ओडिसस व त्याचे सहकारी सुरक्षितपणे पळून जातात. मात्र पळताना तो स्वतःचे खरे नाव सांगतो. ते ऐकून पॉलिफिमस पोसायडनला सूड घेण्याविषयी सांगतो. पोसायडनसुद्धा पुत्रप्रेमापोटी ओडिससच्या समुद्री मार्गात अनेक अडथळे निर्माण करतो आणि या चक्रात ओडिसस चांगली दहा वर्षे अडकून पडतो. शेवटी अथेना झ्यूसला विंनती करून त्याला ह्यातून पोसायडनच्या नकळत सोडवते.

पोसायडन हा इस्मिआमध्ये पूजला जातो. तिथे विविध खेळ आणि सांगीतिक कार्यक्रम त्याच्या सन्मानार्थ आखले जातात. मात्र हा उत्सव ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर बंद झाला. रोमन आक्रमणानंतर त्याचे नेपच्यून या रोमन देवतेशी साधर्म्य दाखवले जाऊ लागले.

संदर्भ :

  • Daniels, Mark, World Mythology : In Bite-Sized Chunks, London, 2016.
  • Smith, William, A New Classical Dictionary of Greek and Roman Biography, Mythology and Geography, London, 2018.
  • https://www.ancient.eu/poseidon/
  • https://greekgodsandgoddesses.net/gods/poseidon/
  • https://www.greekmythology.com/Olympians/Poseidon/poseidon.html
  • http://www.mythweb.com/encyc/entries/poseidon.html

                                                                                                                                                                   समीक्षक : शकुंतला गावडे