अथेन्सचे अक्रॉपलीस

अथेन्सचे अक्रॉपलीस

             अथेन्स येथील ‘अक्रॉपलीस’ अभिजात ग्रीक वास्तुशैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. ‘अक्रॉपलीस म्हणजे उंच टेकडीवर बांधलेल्या वास्तुंचा समूह. इसवीसनपूर्व ५ व्या शतकाच्या उत्तरार्धात अथेन्सच्या टेकडीवर तेथील वास्तुतज्ज्ञ आणि शिल्पकारांनी या अक्रॉपलीसचे निर्माण केले. यात समाविष्ट असलेल्या मुख्य वास्तू म्हणजे – अक्रॉपलीसचे भव्य प्रवेशद्वार – प्रॉपिलिया, ग्रीक देवता ‘अथेना निकी’ हिचे मंदिर – एरेक्थिऑन आणि अर्थातच पार्थेनॉन.

ग्रीक देवता अथेना निकी’ हिचे मंदिर

              अक्रॉपलीसच्या सर्व इमारतींसाठी मुख्यत्वे पांढरा पेंटेलिक संगमरवरी दगड वापरला आहे. त्याचबरोबर रंगसंगतीमधील एकसारखेपणा टाळून वास्तुंच्या विशिष्ट भागांना महत्त्व देण्यासाठी राखाडी रंगाच्या एलियुसिअन संगमरवराचा देखील वापर करण्यात आला आहे. प्रॉपिलिया द्वारावर अक्रॉपलीसमध्ये जाणाऱ्या लोकांचा प्रवेश नियंत्रित केला जात असे. या वास्तू समूहाच्या पश्चिमेस प्रॉपिलिया बांधले आहे. इ.स.पूर्व ४३७ व्या शतकात या वास्तुचे बांधकाम सुरु झाले. वास्तुचा आराखडा आयताकृती (२४ X १८.२० मी.) असून त्याला दक्षिण व उत्तर असे दोन पाखे (wings) आहेत. त्याच्या पूर्व आणि पश्चिमेच्या दर्शनी बाजूस ६ डॉरिक स्तंभांवर तोललेले पेडीमेंट आहे. प्रमुख इमारतीच्या पूर्वेकडील भिंतीवर ५ दरवाजे आहेत, तसेच त्याच इमारतीत मध्यवर्ती मार्गाच्या दोन्ही बाजूस आयोनिक शैलीतील स्तंभांची रांग आहे. ग्रीक वास्तुशैलीमधील ही पहिली इमारत आहे, ज्यात एकाच नजरेत डॉरिक व आयोनिक या दोन्ही प्रकारांमधील स्तंभ दृष्टीस पडतात. तसेच या भागावरचे निळ्या रंगांवर सोनेरी चांदण्या रंगवलेले कॉफर्ड छत देखील प्रसिद्ध आहे. अक्रॉपलीसच्या नैऋत्येस, प्रॉपिलियाच्या उजवीकडे ग्रीक देवता अथेना निकीचे मंदिर आहे. इ.स.पूर्व ४२० व्या शतकातील हे अक्रॉपलीसमध्ये संपूर्णपणे आयोनिक शैलीमध्ये बांधलेले पहिले मंदिर आहे. या मंदिराच्या पुढील व मागील बाजूस प्रत्येकी ४ स्तंभांवर तोलून धरलेले द्वारमंडप आहेत. ७ मी. उंच असणाऱ्या या मंदिराचा आराखडा आयताकृती (८ X ५.५ मी.) आहे.

एरेक्थिऑन
प्रॉपिलिया

एरेक्थिऑन हे आयोनिक शैलीतील ‘अक्रॉपलीसच्या उत्तरेस असणारे इ.स.पूर्व ४२१-४०६ या काळात बांधलेले, अथेना आणि पोसायडॉन या देवतांचे मंदिर आहे. याचे ४ भाग आहेत, ज्यातील पूर्वेकडचा मंडप असलेला गाभारा सर्वात मोठा आहे. उतारावर असलेल्या या वास्तूच्या बाह्य भागाचे वैशिष्ट्य म्हणजे एलियुसिअन दगडातील राखाडी शोभेची कमान ज्यावर पांढऱ्या पेंटेलिक दगडातील शिल्पे जोडली होती. नाजूक कोरीवकाम केलेली दारे-खिडक्या, सुशोभीत आयोनिक स्तंभ याचबरोबर मंदिराच्या दक्षिणेकडचा  ६ ‘कारीयातीद’ (म्हणजे म्हणजे खांब म्हणून वापरेली स्त्रीची कोरीव मूर्ती) खांबावर उभा असणारा मंडप जगप्रसिद्ध आहे. कारीयातीद मंडपाला ‘दासींचा मंडप’ असेही म्हणतात.

पार्थेनॉन

अक्रॉपलीसच्या सर्वात उंच आणि मुख्य ठिकाणी असणारी, आजच्या काळापर्यंत टिकून राहिलेली, अभिजात ग्रीक शैलीतील प्रमुख वास्तू म्हणजे अथेना देवीचे मंदिर पार्थेनॉन. वास्तुविशारद एकटायनस व कॅलिक्रातिस यांनी रचना केलेल्या पार्थेनॉनचे इ.स.पू. ४४७ मध्ये याचे बांधकाम सुरु झाले. ६९.५ X ३०.९ मी. असा पाया असणाऱ्या मंदिराच्या दर्शनी व मागील बाजूस १०.४ मी. उंच असे प्रत्येकी ८ डॉरिक स्तंभ आहेत. स्तंभाचा मधला भाग बाकीच्या भागांच्या तुलनेत जास्त फुगीर आहे, जेणेकरून लांबून पहिले असता संपूर्ण स्तंभ सरळ दिसेल. ह्या स्तंभांवर पेडीमेंट आहे, ज्यावर इथल्या देवांशी निगडीत शिल्पे कोरली होती. या इमारतीच्या छतावर संगमरवरी कौले होती. छताला आधार देण्यासाठी बाहेरच्या खांबांच्या मागे, आतील बाजूस तशाच ६ स्तंभांची रांग आहे. या  स्तंभांनी वेढलेला मंदिराचा गाभारा दोन भागात विभागला आहे. अत्यंत परिपूर्ण अशी ही वास्तू डॉरिक वास्तुशैलीचा सर्वोच्च बिंदू समजली जाते.

सन १६८७ मध्ये झालेल्या लढाईत अक्रॉपलीसवरील वास्तूंची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अलीकडच्या काळात त्यातील काही भागाची दुरुस्ती करण्यात आली आहे. अथेन्सच्या अक्रॉपलीसवरील वास्तूंना युनेस्कोतर्फे जागतिक वारसा वास्तूंचा दर्जा मिळाला आहे.

संदर्भ :

ग्रंथ –

  • Athens: Monuments with Reconstructions

वेबसाईट –

 

समीक्षक : श्रीपाद भालेराव