बेकर, गॅरी : (२ डिसेंबर १९३० – ३ मे २०१४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. देशाच्या बाजारपेठांतील व्यक्तींचे वर्तन, त्यांच्यातील आदान-प्रदान (इंटरॲक्शन) यांबाबत सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणपद्धती विकसित करण्याच्या योगदानाबद्दल बेकर यांना १९९२ मध्ये अर्थशास्त्र विषयातील नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजशास्त्रांशी संबंधित असलेल्या वांशिक भेदाभेद (Racial Discrimination), लोकसंख्या, समाजातील गुन्हेगारी, कौटुंबिक संघटन, मादक पदार्थांच्या सेवनाच्या प्रवृत्ती या सामाजिक प्रश्नांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे ते पहिलेच अर्थतज्ज्ञ मानले जाते. समाजातील मानवी वर्तनापाठीमागच्या प्रेरणांचा अभ्यास त्यांनी केला. ते शिकागो विद्यापीठ तसेच तेथील बूथ स्कूल ऑफ बिझनेस या ठिकाणी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचे भूतपूर्व प्राध्यापक होते.
बेकर यांचा जन्म पेनसिल्व्हेनिया राज्यातील पॉट्सव्हिल या शहरात झाला. त्यांनी १९५१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून बी. ए. ही पदवी प्राप्त केली. वांशिक भेदाभेदाचे अर्थशास्त्र या विषयावर प्रबंध लिहून १९५५ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएच. डी. ही पदवी मिळविली. १९५७ – १९६८ या काळात त्यांनी कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले व पुन्हा ते शिकागो विद्यापीठात परतले. तेथेच त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या दोन्ही विभागात शैक्षणिक कारकीर्दीच्या अखेरपर्यंत प्राध्यापक म्हणून काम केले.
बेकर यांनी वांशिक भेदापाठीमागील प्रवृत्तींचा अभ्यास करताना वर्णभेद करणाऱ्यांना त्यामुळे मदतच होते, या मार्क्सवादी विचारसरणीला आव्हान दिले. उद्योग-व्यवसायाच्या मालकाने एखाद्या कर्मचाऱ्याला केवळ त्याच्या वर्णामुळे नोकरीवर घेतले नाही, तर मालक चांगल्या कामगाराला गमावतो. थोडक्यात, वर्णभेद करणाऱ्याचेच त्यामुळे नुकसान होते. विशेषत: स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेच्या वातावरणात ज्या कंपन्या अशा प्रकारे भेदाभेद करतात, त्यांचा बाजारातील व्यवसायाचा हिस्सा कमी होतो. वर्णभेदाची समस्या खुल्या वातावरणात काम करणाऱ्या कंपन्यांपेक्षा नियंत्रित कंपन्यांमध्ये असल्याचे बेकर यांनी आपल्या अभ्यासाद्वारे दाखवून दिले. वर्णभेद करणाऱ्यांचेच नुकसान होते, हा विचार अर्थतज्ज्ञांमध्ये व औद्योगिक क्षेत्रांत रुजविण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. १९६० च्या पूर्वार्धात मानवी भांडवल या महत्त्वाच्या विषयाकडे त्यांनी आपले लक्ष वळविले. शिक्षणावर केलेला खर्च ही गुंतवणूक असून त्याकडे शासनाचे व समाजाचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आर्थिक गुंतवणूकीमुळे भौगोलिक भांडवलात जशी वृद्धी होते, तशीच शिक्षणामुळे मानवी भांडवलात होत असते; तथापि शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी काही काळ जावा लागतो, असे त्यांचे मत होते.
बेकर यांनी कुटुंबासाठी वेळ देणे, ही एक प्रकारची गुंतवणूक असते. या आणखी एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधले. वैकल्पिक खर्चाची संकल्पना वापरून त्यांनी असे दाखवून दिले की, जेव्हा श्रमिक बाजारात वेतनवाढीवर भर दिला जातो, तेव्हा विवाहित स्त्रियांनी नोकरी न करता घरात थांबण्यामुळे कौटुंबिक खर्च वाढतो. त्या परिस्थितीत स्त्रिया नोकरी पत्करून खर्चाचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. लग्नाचा वा घटस्फोटाचा निर्णय तसेच मुले होऊ देण्याचा व त्यांच्या शिक्षणासंबंधीचा निर्णय हा कुटुंबासाठी वेळ देण्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. व्यक्तींचे सामाजिक वर्तन त्यांच्या वैचारिक बैठकीवर अवलंबून असून कुटुंब, व्यवसाय वा संघटन या ठिकाणी साधारणपणे होणारा लाभ व त्यासाठीचा खर्च व धोके यांचा विचार करून व्यक्ती त्यासाठी प्रवृत्त होतात. या गृहीतकाच्या आधारे गुन्ह्यांसाठी शिक्षा होण्याची संभाव्यता (Probability) वाढविणे तसेच जास्त कडक शासन करणे यांसारखे उपाय योजणे गरजेचे असते. त्यांनी गुन्हेगारीचे अर्थशास्त्र या विषयाचाही अभ्यास केला. लोकसंख्येच्या आर्थिक विश्लेषणासाठीही त्याचे नाव होते.
https://www.youtube.com/watch?reload=9&v=32sCNqdCjs4
बेकर यांची काही उल्लेखनीय ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : ह्यूमन कॅपिटल : थिऑरेटिकल ॲण्ड एम्पिरिकल ॲनॅलिसिस विथ स्पेशल रेफरन्स टू एज्युकेशन (१९६४), ए थिअरी ऑफ द अलोकेशन ऑफ टाइम (१९६५), क्राइम ॲण्ड पनिशमेंट : ॲन इकॉनॉमिक ॲप्रोच (१९६८), दि इकॉनॉमिक्स ऑफ डिस्क्रिमिनेशन (१९७१), ट्रिटाइज ऑन दि फॅमिली (१९८१), दी चॅलेंज ऑफ इमिग्रेशन : ए रॅडिकल सोल्यूशन (२०११).
बेकर यांना नोबेल स्मृती पुरस्काराव्यतिरिक्त अर्थशास्त्र व सामाजिक प्रश्नांच्या संशोधनाबद्दल पुढील सन्मानही लाभले : जॉन बेट्स क्लार्क मेडल (१९६७), अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस् ॲण्ड सायन्सेसचे अधिछात्र (१९७२), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८७), पाँटिफिकल अकॅडमी ऑफ सायन्सेस (१९९७), नॅशनल मेडल ऑफ सायन्स (२०००), जॉन व्हॉन न्यूमान अवॉर्ड (२००४), प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम (२००७).
बेकर यांचे शिकागो येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
समीक्षक – संतोष दास्ताने