आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील र्हायझोपोडा या वर्गातील अगदी साधी शरीररचना असणारा अमीबा हा प्राणी आहे. अमीबा प्रजातीच्या अनेक जाती असून त्या खार्या व गोड्या पाण्यात आणि दमट व ओलसर जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती सार्वत्रिक आहे. अमीबाच्या शरीराचा आकार सतत बदलत असतो. अमीबाचे रेखाचित्र
ग्रीक पुराणानुसार प्रोटिअस या समुद्रदेवतेकडे आकार बदलण्याची क्षमता होती. यावरून सतत आकार बदलू शकणार्या या प्राण्याला अमीबा प्रोटिअस असे नाव दिले गेले आहे. अमीबाच्या बहुतेक जाती सूक्ष्म (लांबीला साधारण २० मायक्रॉन) असून काही नुसत्या डोळ्यांनी (०.२५ मिमी.) दिसू शकतात. याचे शरीर एकाच पेशीचे असते. ते पातळ, लवचिक, पापुद्र्यासारख्या जीवद्रव्यपटलाने आच्छादलेले असते. या पटलाच्या आत जीवद्रव्य असून त्याचे बहिर्द्रव्य आणि अंतर्द्रव्य असे थर असतात. कोणत्याही प्रकारचे कण नसलेल्या स्वच्छ थराला बहिर्द्रव्य म्हणतात आणि कणमय असणार्या वाकीच्या सर्व भागाला अंतर्द्रव्य म्हणतात. अंतर्द्रव्यात गोलसर केंद्रक आणि एक किंवा दोन संकोचशील रिक्तिका असतात. सूक्ष्मजीव, डायाटम व जैव पदार्थांचे कण हे अमीबाचे अन्न होय. शरीरापासून निघालेल्या बोटांसारख्या व आकाराने मोठ्या होऊ शकणार्या अंगकाने अन्न अथवा भक्ष्य वेढून ते जीवद्रव्यात घेतले जाते. भक्ष्याभोवती पाण्याचा पातळसा थर असतो. याला अन्नरिक्तिका म्हणतात. त्यात अन्नाचे पचन होते. या बोटासारख्या अंगकांना छद्मपाद, असत्पाद वा धाकलेपाय असेही म्हणतात. हे पाय तात्पुरते असून काम झाले की, परत आत घेता येतात. हे पाय वापरून अमीबा पाण्याच्या तळालगत रांगत चालतो. चालताना फक्त याची टोके टेकलेली असतात. अमीबा ज्या पाण्यात राहतो, त्यात विरघळलेला ऑक्सिजन जीवद्रव्य पटलातून विसरणाने जीवद्रव्यात जातो आणि आत उत्पन्न होणारा कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. चयापचयामुळे उत्पन्न होणारे यूरियासारखे टाकाऊ पदार्थ जीवद्रव्य पटलातून बाहेर पडतात. शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण तसेच उत्सर्जन ही कार्ये संकोचशील रिक्तिकेद्वारे होतात.
अमीबा एका ठराविक आकारमानाइतका वाढला म्हणजे द्विपेशी विभाजन या अलैंगिक पद्धतीने त्याचे प्रजनन होते. पाण्याचे डबके कोरडे पडणे यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत अमीबा एक विशिष्ट पदार्थ स्रावून स्वतःभोवती एक संरक्षक कवच (पुटी) तयार करून सुप्तावस्थेत राहतो. अनुकूल परिस्थिती झाली की तो कवच फोडून बाहेर येतो. ही अवस्था लांबली तर बहुपेशी विभाजन पद्धतीने एका अमीबापासून अनेक अमीबा तयार होतात. अमीबाला नैसर्गिक मरण नसते.
अमीबाच्या पुष्कळ जाती विविध प्राण्यांच्या अन्नमार्गात परोपजीवी असतात. यापैकी काही रोग निर्माण करतात. एंटामीबा हिस्टॉलिटिकामुळे माणसाला आमांशाचा रोग होतो. या रोगात जुलाब होतात व आतड्याच्या आतील भागाला जखमा होऊन रक्तस्राव होतो. या विकाराला अमीबाजन्य विकार (अमीबिअँसिस) म्हणतात.