नामदेव लक्ष्मण व्हटकर: (२४ ऑगस्ट १९२१ – ४ ऑक्टोबर १९८२). सुप्रसिद्ध लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक,  प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदार. चित्रपट निर्माते अशीही त्यांची ओळख आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून या पुस्तकांमध्ये वैचारिक, कादंबरी, नाटक, कथा, पटकथा, कविता, समीक्षण, संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्यप्रकार विविध विषयासह आढळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यदर्शनाचे चित्रीकरण करणारे आणि त्यांच्यावर पहिला लघु चित्रपट बनवणारे चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मसूदमाले या गावी ढोर या अनुसूचित जातीत झाला. लक्ष्मण व पारू व्हटकर हे त्यांचे आईवडील. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून परिश्रमपूर्वक पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

नामदेव लक्ष्मण व्हटकर यांची साहित्य संपदा आणि निर्मिती : कादंबरी :- अपराधी (१९४३), झोपाळा (१९५४), सोळा शिनगार (१९६८); नाटक :- फितूर  (१९४४), वाट चुकली, सौभाग्यवती भव (१९६१), आई शिवाय जन्मला (१९६५), काळजाची हाक (१९६७), सुखा तुला शोधू कुठे (१९७९), भाकरी (१९७४), सावतामाळी (१९७६), जावईबापू (१९७८); वगनाट्ये :- तिरसट नंबरची खोली, आई शिवाय जन्मला, ऊसाला लागल कोल्हा; चित्रपट :- मुलगा (१९५५) आहेर (१९५७); लघु चित्रपट :- सात करोड (१९५४), पतित-पावन (१९५५), पदयात्रा (१९५८), हर मोसंम मे पाणी (१९५९), कुडे से कंचन (१९६०), एक कला – भारतीय पद्धत (१९६२), पाच चाकांची गाडी (१९६३), लोककला तमाशा (१९६५), बाटलीने बाटला तो जन्मातून उठला (१९६७), महापुरुष डॉ. आंबेडकर (१९६९), महाराष्ट्र रंगभूमी (१९७१), खंड्याचा खंडेराव झाला (१९७८), मराठवाडा कृषी विद्यापीठ (१९७९); वैचारिक ग्रंथ :- नभोवाणीचे लेखन तंत्र (१९५२-१९५३), भारतातील जातिभेद आणि त्यावर उपाय (१९६४), अभिनय शास्त्र आणि तंत्र समजून घेऊ (१९५८), समाजवाद (१९५८) मराठीचे लोकनाट्य तमाशा कला आणि साहित्य (१९५९),   महाराष्ट्रातील चर्मउद्योग आणि त्याचा विकास (१९८१), बौद्ध धर्मदीप (१९५६); आत्मचरित्र:- कथा माझ्या जन्माची; काव्यसंग्रह: भावफुलोर. आकाशवाणीसाठी – छोट्या नाटिकांचे लेखन, लोकसाहित्य व सामाजिक विषयावर आकाशवाणीतून अनेक भाषणे. गावराज्य नजर, जनसागर, दलित सेवक इत्यादी साप्ताहिकांमधून सामाजिक, राजकीय प्रश्न, अस्पृश्यता निवारण, सामाजिक समता आणि दलितांचे प्रश्न यावर त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे.

व्हटकर यांच्या कादंबऱ्यांमधून समाजात अवैद्य संबंधांमधून जन्मलेल्या संततीच्या सामाजिक व्यवहाराच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. सोळा शिनगार या कादंबरीमधून तमाशा लोककलेच्या विविध प्रश्नांना समाजासमोर मांडलेले दिसते. त्यांनी लिहिलेले वाट चुकली हे नाटक बौद्ध धर्मांतर याबद्दलची प्रतिक्रिया असणारे आहे. ते मुंबई राज्याच्या नाट्य परिषदेतील प्रथम पारितोषिक प्राप्त नाटक होय (१९५४), त्याचे गुजराती भाषेतही भाषांतर झाले आहे. त्यांच्या लघुकथा या समाज प्रबोधनात्मक आहेत. नीतीमूल्यांच्या बोधाचे प्रतिबिंब या कथांमध्ये दिसून येते. सामाजिक बदलाची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने व्हटकर यांनी त्यांच्या लघुचित्रपटातून कातडी कमावणे, अस्पृश्यता निवारण, पाणी व्यवस्थापन, दारूबंदी असे विषय हाताळले आहेत. समाज शिक्षणमालेतुन व इतर मासिकातून भरपूर लघुकथा त्यांनी लिहिल्या आहेत, यातील काही कथा पंजाबी भाषेमध्ये भाषांतरित झाल्या आहेत. डाग हे वगनाट्य अस्पृश्यता निवारणासाठी सादर केलेले वगनाट्य होय. हे वगनाट्य तमाशाप्रधान असून त्यात सवर्णांकडून अस्पृश्य तमाशा कलाकार स्त्रीची फसवणूक आणि त्यामुळे अस्पृश्य स्त्रीच्या जीवनात होणारी दारुण व्यथा दाखविली आहे. या समस्येवर त्यांनी विविध अंगाने विचार करून जाती व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला आहे. संशोधन, चिंतन, मनन यावर आधारलेले त्यांचे वैचारिक लेखन दिसून येते. तमाशा या सर्वसामान्य लोकांच्या कलेला असणारे स्थान, त्याचे विविध प्रकार पहिल्यांदा त्यांनी ऐतिहासिक संदर्भासह लिहिलेले दिसून येतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यदर्शनाची डॉ. आंबेडकर महानिर्वाण ही एकमेव फिल्म आज उपलब्ध आहे आणि ती व्हटकर यांनी चित्रित केलेली आहे. हरिजन वेल्फेअर बोर्ड, सामाजिक समता परिषद, समाजकल्याण सल्लागार समिती, नागरी संरक्षण समिती, अशा अनेक समित्यांवर ते सदस्य म्हणून कार्यरत होते. चर्मोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष होते. दलित मित्र पुरस्कार (१९७१), कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

संदर्भ :

  • व्हटकर नामदेव, कथा माझ्या जन्माची, मॅजेस्टिक  प्रकाशन,पहिली आवृत्ती,१९८३.
  • व्हटकर नामदेव, भारतातील जातीभेद आणि त्यावर उपाय, यशश्री प्रकाशन कोल्हापूर, १९८१.