मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद, मुख्यत: भोपाळ, रायसेन आणि सिहोर या जिल्ह्यांत आढळणारी एक जमात. राजस्थान कीर जमातीची मुख्य भूमी आहे. मोगलांशी लढताना तसेच राजा मानसिंग हे जयपूरवर राज्य करीत असताना या जमातीने राजस्थान आणि गुजरात या राज्यांतून मध्य प्रदेश राज्यात स्थलांतर केले. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या सुमारे ७१,००० होती.

कीर जमात ही किराड जमातीसारखी असून ती जमात जयपूरचा राजा करण यांची वंशज असल्याचा किराड जमातीसारखाच दावा करते. एकदा महादेव व पार्वती बागेमध्ये फिरत असताना महादेवाने कुस गवतापासून एक पुरुष आणि स्त्री बनवले. नंतर त्यांपासूनच कीर जमात अस्तित्वात आली, अशी पौराणिक कथा कीर जमातीत प्रचलित आहे. मध्य प्रदेश राज्य आणि छत्तीसगढ या राज्यांतील कीर जामातीमध्ये त्यांची कुळे हीच आडनावे असतात. उदा., बौरी, बोन्या (बन्या), दिन, गदरी (गाद्री), हिरे, जाट, मोची, नामचिरिया (नमचुरिया), नायर, वाल, युद्ध, बाया, बाउरी, किक्रा, नामहुरिया इत्यादी.

इंडो-आर्यन भाषाकुलातील गुजराती ही त्यांची मातृभाषा असली, तरी आजही त्यांच्या भाषेत राजस्थानी भाषेची लय दिसून येते. मध्य प्रदेश राज्यात ते हिंदी भाषिक लोकांमध्ये राहत असल्याने हिंदी भाषेसह मारवाडी भाषेची एक बोली ते बोलतात. पुरुष पांढरी ‘मिरजाई’ (अंगरखा), त्यावर लहान डगला आणि गुडघ्यापर्यंत ‘धोती’ परिधान करतात. टाळू दिसेल असा डोक्याला कपडा बांधतात. हे लोक गळ्यात भैरोण (भैरव) आणि भैरवी देवी यांच्या प्रतिमा तसेच काळ्या लाकडाच्या मण्यांचे हार घालतात. स्त्रिया जयपुरी चुनरी (चुनडी), घागरा व चोळी परिधान करतात. दंडावर आणि मनगटावर लाखेच्या लाल बांगड्या घालतात. पायांमध्ये ‘रामझुल’ नामक दागिना घालतात. त्यांच्या विशिष्ट पोशाखामुळे ही जमात सहजपणे ओळखली जाते.

कीर लोकांची वस्ती साधारणपणे नदीकिनारी, जंगलात किंवा टेकड्यांकाठी असते. ते नदीकिनारी पात्रातील वाळवंटात मुख्यत: टरबूज, खरबूज, शिंगाडा इत्यादी फळे व भाजीपाला या पिकांची शेती करतात. यांना बाजरी फार आवडते. शेती करणाऱ्या कीरांना त्यांच्या जमातीत कुशल मानले जाते. इतर कीर शेतमजुरी करतात. त्यांच्यात बालकामगारपद्धत आढळून येते. हे लोक मारवाडी, पुजारी, ब्राह्मण यांच्या व्यतिरिक्त अन्य जातींकडून अन्न घेत नाहीत. बकरी आणि मासे सोडून इतर मांसाहार ते करत नाहीत. समारंभाच्या वेळी दारू पितात. तसेच म्हशीवर स्वार होतात.

कीर जमातीत नामचिरिया, दामा (दैमा), बनिया, वामन, नायर, जाट, हुवाड, गदरी, लोहारिया, हेक्ड्या, मोची आणि माली ही बारा गोत्रे असून त्यांपैकी शेवटची सात गोत्रे दुसऱ्या जमातीमधून आली आहेत. यांची जातपंचायत असते आणि तीच जातीय तंट्यांचा निवाडा करते.

कीर जमातीत अंतर्गत विवाहपद्धती प्रचलित आहे. एखादी व्यक्ती स्वतःच्या गोत्रात किंवा स्वतःच्या बहीण/भावाबरोबर लग्न करू शकत नाही. त्यांच्यात पूर्वी बालविवाह प्रचलित होता. मुलगी वयात आल्यानंतर जर ती अविवाहित असेल, तर मुलीच्या आई-वडिलांना दंड द्यावा लागत असे. ते जातपंचायतीसमोर वरपित्याला ‘लगन’ (लग्न) ठरवताना ‘चारी’ म्हणजेच रु. १४ ते रु. २० पर्यंत वधूमुल्य देत असत. लग्नसोहळा मुलीच्या घरी पार पडतो. लग्नाच्या वेळी नवरामुलगा म्हशीवर किंवा रेड्यावर बसून नवरीच्या घरी येत असे; मात्र ती प्रथा आता बंद झाल्याचे दिसून येत असून इतर जातींच्या संपर्कामुळे त्यांच्यातील विधींमध्ये काही प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येते. लग्नानंतर नवरीमुलगी नवऱ्यामुलाच्या घरी जाते. तेथे ती आठ दिवस राहते. सासरी असताना नववधूने देवदेवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. लग्नानंतर ‘गौना’ आणि ‘रौना’ हे दोन समारंभ असतात. नववधू ‘बेस’ म्हणजेच नवीन वस्त्र परिधान करून ब्राह्मणाने सांगितलेल्या मुहूर्तावर आपल्या वडिलांच्या घरी परतते, त्याला ‘गौना’ म्हणतात त्यानंतर चार महिन्यांनी नवरदेव नवरीला कायमचे आपल्या घरी घेऊन जातो, त्याला ‘रौना’ म्हणतात. बहुपत्नीकत्वाला या जमातीमध्ये मान्यता आहे. घटस्फोटासंबंधित निर्णय जातपंचायत घेते. पुनर्विवाह आणि विधवाविवाहाला मान्यता आहे. विधवाविवाहाच्या वेळी विधवेला नवीन वस्त्रे आणि दागिने दिले जातात. बाळाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी ब्राह्मणाकडून त्याचे नाव ठेवतात. बाळंतिणीने दीराला द्रव्यदान करून संतुष्ट करण्याची यांच्यात प्रथा आहे.

कीर जमातीमध्ये भैरोण आणि भैरवी देवीची पूजा केली जाते. प्रत्येक गावात देवी आणि भैरोणचा एक विशेष अवतार असतो. काही विशिष्ट गावांचे भैरोण प्रसिद्ध असतात. जसे नामचिरिया कुळातील लोक जारिया गोवरा गावातील देवी पार्वती आणि भैरोणची पूजा करतात; तर बनिया, नायर, हेकड्या व मोची हे जयपूरच्या चामुंडा माता आणि भैरोणची पूजा करतात. हे लोक देवांना प्रसन्न करण्यासाठी देवांच्या चौकोनी, त्रिकोणी आणि आयताकृती प्रतिमा चांदीमध्ये बनवून, दोऱ्यात ओवून गळ्यात घालतात.

कीर जमातीत अपघाती मृत्यू आलेल्या किंवा निपुत्रिक मृतात्मे म्हणजेच ‘आहुत’ यांच्या चांदीच्या छोट्या प्रतिमा करून, त्यांना नैवेद्य दाखवून सण समारंभाच्या वेळी त्या गळ्यात घालण्यात येतात व रात्रभर या मृतात्म्यांची स्तुतिपर काव्ये गायली जातात. या आत्म्यांनी कुटुंबातील इतर लोकांना त्रास देऊ नये, असा यामागील उद्देश असतो. प्रत्येक समारंभात या मृतात्म्यांच्या प्रतिमेला अन्नाचा स्पर्श केल्यानंतरच ते अन्न ग्रहण केले जाते. कीर जमात गायीची आणि पिंपळ वृक्षाची पूजा करतात. ते खाटकाला (कसायाला) आपल्या गायी विकत नाहीत. त्यांचा जादूटोण्यावर विश्वास आहे.

कीर जमातीचे प्रमुख उत्सव दिवाळी आणि नंतर येणारा ‘सिताला अठाइन’ (शीतला अष्टमी) आहेत. ‘सिताला अठाइन’ विधी चैत्र अमावास्येनंतर सातव्या दिवशी करतात. या दिवशी रात्रीच्या वेळी देवीची पूजा करतात. दूध आणि दह्याचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी कोणाच्याही घरी अन्न शिजविले जात नाही. संपूर्ण दिवस देवीची स्तुतिपर गाणी म्हणण्यात ते समर्पित करतात. कार्तिक अमावस्येच्या दिवशी पहाटे सर्व कीर स्त्री, पुरुष आणि लहान मुले नदीवर आंघोळ करून रंगीबेरंगी वस्त्र परिधान करतात. त्या दिवशी उपवास करून नदीकिनारीच स्वयंपाक करतात आणि सूर्यास्तापूर्वी आपल्या मृत पूर्वजांना नैवेद्य दाखवतात. त्यांचा समज आहे की, केवळ याच दिवशी त्यांच्या कुटुंबातील मृत पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येऊन अन्नग्रहण करतात. त्यापूर्वी कीर लोक गोरा व महादेव या देवतांची पूजा करतात आणि गाणी म्हणतात. उर्वरित अन्न घरी घेऊन जातात आणि आपल्या लोकांना ते वाटतात.

कीर जमातीमध्ये प्रेत दहन करण्याची प्रथा आहे. लहान मुलांचे दफन केले जाते. मृताच्या अस्थी आणि हाडे गंगा नदीत किंवा जवळच्या नदीत किंवा तलावात विसर्जित करतात.

कीर जमातीत शिक्षणाचे कमी प्रमाण दिसून येते; मात्र ते शहरांशी व इतर जातींच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांच्या राहणीमानात, शिक्षणात, व्यवसायांत बदल होत असल्याचे दिसून येत आहे.

समीक्षक : लता छत्रे