रशियाच्या पश्चिम भागातील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण, प्रमुख शहर व नदीबंदर. लोकसंख्या ८,४१,९०२ (२०१९ अंदाजे.). हे व्होल्गा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. पूर्वी व्होल्गा नदीतून चालणाऱ्या व्यापाराचे हल्लेखोर टोळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी १५९० मध्ये एक रक्षक ठाणे म्हणून या शहराची स्थापना करण्यात आली. १६१६ व १६७४ अशी दोन वेळा या ठाण्याची जागा बदलण्यात आली. सराटव्ह हे १७८० मध्ये प्रांताच्या राजधानीचे ठिकाण, तर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मॉस्कोशी रेल्वेने जोडल्यापासून प्रमुख व्यापारी केंद्र बनले. सांप्रत शहराच्या औद्योगिक परिसराचा विस्तार व्होल्गा नदीच्या काठांवर खूप दूरवर झालेला आहे. १९६५ मध्ये रस्ते वाहतुकीसाठी येथील व्होल्गा नदीपात्रावर २.८ किमी. लांबीचा एक मोठा पूल बांधण्यात आला. यूरोपातील सर्वाधिक लांबीच्या पुलांपैकी हा एक आहे.
व्होल्गा नदीच्या खालच्या खोऱ्यातील हे एक प्रमुख औद्योगिक, वाहतूक व सांस्कृतिक केंद्र असून येथे अवजड उद्योगांचा विस्तार झाला आहे. अभियांत्रिकी, हवाई वाहतुकीची साधने, खनिज तेल, रसायने, विद्युत उपकरणे, यांत्रिक हत्यारे, डिझेल एंजिने, जनित्रे, गोलक धारवा, काच, फर्निचर, विटा व इतर बांधकामाचे साहित्य, पादत्राणे, कपडे, खाद्यपदार्थ इत्यादींचे निर्मितीउद्योग येथे आहेत. राज्यक्रांतिपूर्व काळापासून प्रसिद्ध असलेल्या येथील पीठ गिरणी उद्योगाचे महत्त्व अजून टिकून आहे. व्होल्गा नदीपात्रातून वाहून आणलेल्या लाकडी ओंडक्यांवर येथील लाकूड कापण्याच्या गिरण्यांत प्रक्रिया करून त्यांपासून विविध लाकडी सामान तयार केले जाते. परिसरातून उत्पादित होणाऱ्या खनिज तेल व नैसर्गिक वायूची येथील रसायन उद्योग विकसित होण्यास चांगलीच मदत झाली आहे. येथे संश्लिष्ट अल्कोहॉल, कृत्रिम धागे, ॲसिटोन व अमोनियम सल्फेट यांचे उत्पादन होते. सराटव्हच्या वरच्या बाजूस व्होएस्क येथे व्होल्गा नदीवर १९६० च्या दशकात एक मोठे धरण व जलविद्युतनिर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. सराटव्ह हे एक प्रमुख लोहमार्ग स्थानक असून मॉस्को, व्होल्गोग्राड, कझॅन व इतर ठिकाणांशी लोहमार्गांनी जोडलेले आहे. सराटव्ह नाट्यगृह (स्था. १८०२) सराटव्ह स्टेट युनिव्हर्सिटी (१९०९), नव-गॉथिक संगीत विद्यालय (१९१२), कलासंग्रहालये इत्यादी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था येथे आहेत.
समीक्षक : ना. स. गाडे
https://www.youtube.com/watch?v=Ln8TC6cWKcI
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.