जर्मन भाषेतील ‘वेल्टनशाउंग’ ही संज्ञा इंग्रजीतील ‘वर्ल्ड-व्ह्यू’ या संकल्पनेशी नाते सांगणारी आहे. तिचे भाषांतर ‘जगत्-दर्शन’ असे करता येते. ‘वेल्ट’ म्हणजे जग व ‘आशाउंग’ म्हणजे दृष्टिकोण, भूमिका. म्हणून ‘वेल्टनशाउंग’ म्हणजे जगाकडे बघण्याचा समग्र दृष्टिकोण. तो एकाचा असेल किंवा अनेकांचा. येथे महत्त्वाची आहे ती सर्वंकषता, सर्वसमावेशकता. हा दृष्टिकोण सर्वसमावेशक असतो. त्यात तत्त्वज्ञान सामावलेले असते; जिवाचे जगाशी असणारे नाते विशद केलेले असते. त्यातून संबंधितांची बांधिलकी, धोरण, विचारांची दिशा स्पष्ट होते. उदा., साम्यवादातून मार्क्सचा ‘वेल्टनशाउंग’ प्रकट होतो. चिदणुवादातून लायप्निट्सचा ‘वेल्टनशाउंग’ कळतो. श्यामच्या आईतून साने गुरूजींची जगाकडे बघायची दृष्टी व्यक्त होते. जग मुळात कसे आहे, त्यात कालांतराने बदल कसे होत गेले, कोणते बदल अपेक्षित आहेत, व्हावेत, ते कसे व कधी होतील, यांसंबंधीची तत्त्वप्रणाली म्हणजे ‘वेल्टनशाउंग’. त्यातून सामाजिक, राजकीय, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक तत्त्वे, भूमिका व आदर्श स्पष्ट होतात. भावभावना, मूल्ये, राज्यव्यवस्था, कला या सर्वांविषयीची जाण दर्शविणाऱ्या विविध ‘वेल्टनशाउंग’चा तौलनिक विचार करण्याची गरज निनियन स्मार्ट या तत्त्वचिंतकाने अधोरेखित केली. वेगवेगळ्या ‘वेल्टनशाउंग’मध्ये संगती आहे का, त्यात वैज्ञानिक दृष्टी आहे का, त्याची व्याप्ती केवढी आहे व उपयुक्तता कितपत आहे, ह्या चार निकषांची चर्चा स्मार्टने केली आहे. मुळात कांटने वापरलेली ही संज्ञा हेगेलने रूढ केली. विचारव्यूह, विचारसरणी, आर्ष ज्ञान, लोककथा, पुराणकथा, बाणा, मनोभूमिका, सामाजिक संकेत, रीतिरिवाज, प्रथा, परंपरा, मूल्यव्यवस्था, ‘मेमेप्लेक्सेस’, ‘पॅरेडाइम्स’, ‘रिॲलिटी टनेल्स’ त्यातून प्रकट होतात.
हवामानासारखे भौतिक घटक, पर्यावरण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, समाजकारण, भाषा, विज्ञान ‘वेल्टनशाउंग’ साकारण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ‘वेल्टनशाउंग’ व्यक्ती साकारते की व्यक्तीला असे विशिष्ट दर्शन समाजामुळे होते, हा तत्त्वज्ञानातील एक प्रमुख प्रश्न आहे. त्यानुसार क्रमश: व्यक्तिवाद व समूहवाद मांडले जातात.
१९११ मध्ये डिल्टायने ‘द टाइप्स ऑफ वर्ल्ड-व्ह्यू अँड देअर डेव्हलपमेंट इन मेटाफिजिक्स’ हा निबंध प्रकाशित केला. यात डेमॉक्रिटस, हॉब्ज, ह्यूम आदींनी स्वीकारलेला निसर्गवाद; प्लेटो, देकार्त, कांट, बेर्गसॉ आदींचा द्वैती स्वातंत्र्यात्मक चिद्वाद आणि डिल्टाय, हेराक्लायटस, पार्मेनिडीझ, स्पिनोझा, लायप्निट्स, हेगेल आदींना अभिप्रेत असणारा एकतत्त्ववादी, वस्तुनिरपेक्ष चिद्वाद अशा तीन प्रकारच्या ‘वेल्टनशाउंग’ची चर्चा डिल्टायने केली आहे.
जेम्स अंडरहिलने ‘वेल्टनशाउंग’चे पाच घटक विशद केले. जग पाहणे, जगाचे आकलन होणे, मनोभूमिका, वैयक्तिक जग व दृष्टिकोण हे ते पाच घटक होत.
संदर्भ :
- Naugle, David, World-View : The History of a Concept, Michigan, 2002.
- Sire, James W. Naming the Elephant : World-View as a Concept, Illinois, 2014.
- Smart, Ninian, World-Views : Crosscultural Explorations of Human Beliefs, New Jersey, 1981.
समीक्षक : डॉ. लता छत्रे