शोर, पीटर विलिस्टन : (१४ ऑगस्ट, १९५९ )
अमेरिकन गणिती शोर यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. १९८१ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेतून त्यांनी विज्ञानात पदवी घेतली. १९८५ साली एम.आय.टी. या संस्थेतून, लीटन (Leighton) यांच्या मार्गदर्शखाली, शोर यांना, उपयोजित गणितातील ‘प्रॉबेबिलिस्टिक ॲनालिसिस ऑफ बिन पॅकिंग अल्गोरिथम्स’ या प्रबंधासाठी पीएच.डी. मिळाली. सुरुवातीला बेल (आताची नोकिया बेल) लॅबोरेटरीत तर २००३ पासून ते एम.आय.टी. संस्थेत मध्ये कार्यरत आहेत.
क्वांटम कॉम्प्यूटींगमधील पूर्णांकाचे अवयव पाडणे (Integer Factorisation) यासाठी शोर यांनी १९९४ साली विकसित केलेली शोर्स अल्गोरिथम रीत, या संदर्भातील त्यावेळच्या विद्यमान रीतींपेक्षा अधिक वेगवान ठरली. त्यानंतर क्वांटम कॉम्यूटींग संदर्भात शोर यांचे आणखी १५ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. बिन पॅकिंग अँड श्येडयूलिंग, चयनशास्त्र (Combinatorics), कॉम्प्यूटेशनल कॉम्प्लेक्सीटी थिअरी, कॉम्प्यूटेशनल भूमिती आणि उपयोजित संभाव्यता तसेच सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि संगणकशास्त्र यांतील मूलभूत बाबी, यांवर शोर यांनी एकूण ६८ पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. सहसा प्रश्नाला भूमितीय बैठक देऊन तो सोडवण्यावर शोर यांचा कल दिसून येतो.
एम.आय.टी.ने २००४ ते २०१० या कालावधीत आयोजित केलेल्या विविध शैक्षणिक शिबिरांमध्ये शोर यांनी उच्च-मिती अवकाश घनाकृती कौलांनी व्यापणे (tiling high dimensional spaces with cubes), सान्त आबेलीयन गट (finite abelian groups), काही विशिष्ट गट यांसारख्या विषयांवर व्याख्याने दिली. तसेच आय. ए. पी. (Inter-Academic Partnership) उपक्रमांतर्गत झालेल्या उपयोजित गणिताची तत्त्वे, सैद्धांतिक संगणकशास्त्र, क्वांटम कॉम्प्यूटींगवरील प्रगत पाठ्यक्रमांमध्येही त्यांचे योगदान होते.
शोर यांना पुटनॅम (Putnam), मॅकऑर्थर (McArther) फेलोशिप मिळाली होती. माहिती विज्ञानातील गणिती पैलू यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नेवानलिना (Nevanlinna) पारितोषिक मिळाले. तसेच सैद्धांतिक संगणकशास्त्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना गोडेल (Gӧdel) पारितोषिक आणि आय.सी.एस. पारितोषिक दिले गेले होते. त्यांना अमेरिकन ॲकेडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे सभासद करण्यात आले. सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना आय.सी.टी.पी. (इंटरनॅशनल सेंटर ऑफ थिऑरेटीकल फिजिक्स) तर्फे डिरॅक (Dirac) पदक देऊन गौरवले गेले.
एम.आय.टी.मधील अध्यापनाच्या कार्याबरोबरच शोर तेथील सी.एस.ए.आय.एल. (CSAIL – Computer Science and Artificial Intelligence Laboratory) तसेच सीटीपी (C.T.P – Centre of Theoretical Physics) या संस्थांमध्येही कार्यरत आहेत.
संदर्भ :
- https://arxiv.org/abs/quant-ph/9508027
- https://www.csail.mit.edu/person/peter-shor
- http://www.math.ucsd.edu/~ronspubs/98_03_shor.pdf
- http://math.mit.edu/directory/profile?pid=247
समीक्षक : विवेक पाटकर