टोडहंटर, आयझॅक : (२३ नोव्हेंबर १८२० – १ मार्च १८८४)

टोडहंटर यांचा जन्म इंग्लंडमधील रे (ससेक्स) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हेस्टिंग्ज येथे झाले. पेकहॅम येथील शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच ते संध्याकाळी लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजात गणिताचा अभ्यास करत असायचे. त्यांचे शैक्षणिक मार्गदर्शक विलियम हॉपकिन्स (William Hopkins) होते. तर प्रख्यात गणिती ऑगस्टस डी मॉर्गन (Augustus De Morgan) यांच्यामुळे ते गणिताच्या अभ्यासास प्रवृत्त झाले होते. १८४२ साली, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी लंडन युनिव्हर्सिटीतून गणितात बी.ए. ही पदवी प्राप्त केली. त्याच विद्यापीठातून, सुवर्णपदक मिळवून त्यांनी गणितात एम.ए. केले. १८४४ साली टोडहंटर यांनी केंब्रिजमधील सेंट जॉन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १८४८ मध्ये त्यांना सिनियर रँग्लर म्हणून घोषित करण्यात आले. १८४९ पासून सेंट जॉन्स कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी विकलन, संकलन, बीजगणित, विश्लेषणात्मक स्थितीशास्त्र, प्रतलीय निर्देशक भूमिती या विषयांवरची पुस्तके, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिली. बीजगणित, त्रिकोणमिती तसेच यूक्लिडीय भूमितीवरील पुस्तके, ऑन दि मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर्स हे पुस्तक, विलियम व्हेवेल यांच्या चरित्रात्मक कार्यासंबंधीचा निबंध, कलनशास्त्र (Calculus) या शाखेच्या प्रगतीचा आढावा घेणारे ए हिस्ट्री ऑफ दि प्रोग्रेस ऑफ कॅल्क्यूलस ऑफ व्हेरिएशन्स ड्युरिंग दि नाईनटीथ सेंच्युरी, यूक्लिडीय भूमितीवरचे दि एलिमेंट्स ऑफ यूक्लिड फॉर दि यूज ऑफ कॉलेजेस अँडस्कूल्स, ए हिस्ट्री ऑफ दि मॅथेमॅटिकल थिअरी ऑफ प्रॉबेबिलिटी फ्रॉम पास्कल टू लाप्लास, भौतिकशास्त्राशी संबंधित ए हिस्ट्री ऑफ दि मॅथेमॅटिकल थिअरीज ऑफ  ट्रॅक्शन अँड दि फिगर ऑफ दि अर्थ फ्रॉम दि टाईम ऑफ न्यूटन टू दॅट ऑफ लाप्लास  या पुस्तकाचे दोन खंड, रिसर्चेस ऑन दि कँलक्युलस ऑफ व्हेरिएशन्स हे निबंध त्यांनी प्रकाशित केले. त्यांनी अशी गणितातील अनेक विषयांवर निबंध व पुस्तके लिहीली.

टोडहंटर तत्त्वज्ञानाचेही अभ्यासक होते. १८७७ साली नॅचरल फिलॉंसॉफी फॉर बिगिनर्स हे पुस्तक त्यांनी लिहिले. शैक्षणिक क्षेत्रातील तत्कालीन घडामोडींवर आधारित दि कॉनफ्लिक्ट ऑफ स्टडीज अँड अदर एस्सेज ऑन सब्जेक्ट्स कनेक्टेड विथ एज्युकेशन हे पुस्तक त्यांनी १८७३ साली लिहिले. ए हिस्ट्री ऑफ दि थिअरी ऑफ इलॅस्टीसिटी  हे त्यांचे पुस्तक प्रकृती अस्वास्थ्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. नंतर कार्ल पिअरसन यांनी ते संपादित करून, टोडहंटर यांच्या मृत्युनंतर प्रकाशित केले.

गणितातील योगदानाबद्दल टोडहंटर यांना स्मिथस् प्राईज (Smiths Prize) आणि बर्नी प्राईज (Berney Prize) मिळाले. रॉयल सोसायटीच्या कार्यकारिणी समितीचे ते सभासद होते. तसेच सेंट जॉन्स कॉलेजची मानद फेलोशिपही त्यांना मिळाली होती. त्या काळात लिहिलेली त्यांची पुस्तके आजही उपलब्ध होत आहेत; अजूनही त्यांच्या आवृत्त्या काढल्या जात आहेत.

संदर्भ :

  समीक्षक : विवेक पाटकर