विश्वासराव पेशवे : (२२ जुलै १७४२ – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील सेनानी. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाई यांचा मुलगा. त्यांचा जन्म पुणे येथे शनिवारवाड्यात झाला. त्यांची मुंज मार्च १७४९ मध्ये झाली. मे १७५० मध्ये  पटवर्धन घराण्यातील लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले. सिंदखेड  स्वारीमध्ये असताना दत्ताजी शिंदे हे त्यांचे कारभारी होते. जनकोजी शिंदे हेदेखील त्या मोहिमेत होते. जनकोजी व विश्वासराव हे समवयस्क मित्र होते.

ऑक्टोबर १७५७ मध्ये औरंगाबाद व सिंदखेडा येथे मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. त्यावेळी या युद्धात विश्वासराव हजर होते. निजाम अलीसोबत जानेवारी १७६० मध्ये झालेल्या उदगीर येथील लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंच्या बरोबर विश्वासरावदेखील होते. त्यांनी या युद्धाच्या वेळी हत्तीवर बसून कमालीची तिरंदाजी केली.

१४ मार्च १७६० मध्ये मराठी फौजा सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात निघाल्या, तेव्हा विश्वासरावांचे वय अवघे १८ वर्षांचे होते. विश्वासरावांच्या हाती स्वतंत्र अशी दहा हजारांची फौज पानिपतच्या युद्धात होती.

बुऱ्हाणपूर, भोपाळ, सीरोंज, ओर्च्छा, नरवर, ग्वाल्हेरमार्गे मराठी फौजा दिल्लीच्या रोखाने निघाल्या. दिल्लीचा किल्ला मराठ्यांच्या हाती आला, तेव्हा तेथे दरबार भरवून सदाशिवराव भाऊंनी विश्वासराव यांना सर्वांच्याकडून नजराणे देऊ केले. या गोष्टीचा विपर्यास करून नजीबखान रोहिल्याने विश्वासराव दिल्लीचे बादशहा झाल्याची अफवा पसरवली. असे केल्याने उत्तरेतील छोटे-मोठे संस्थानिक मराठ्यांवर नाराज होऊन अब्दालीस येऊन मिळतील, असा डाव नजीबने आखला होता.  तेव्हा सदाशिवराव भाऊंनी तातडीने अलीगौहरचा मुलगा जवानबख्त यांस दिल्लीच्या तख्तावर आणून बसविले.

पानिपतच्या भूमीवरून विश्वासराव यांनी वडील नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले एक पत्र हृदयाचा ठाव घेणारे आहे. त्यामध्ये ते लिहितात की, ‘फौज व खजिना पाठविणे. मी आपल्यासाठी लिहित नाही, माझ्यासारखे पुत्र आपल्यास आणखी आहेत व होतील; परंतु भाऊसाहेबांसारखा बंधु मिळणार नाही.ʼ पानिपतच्या रणभूमीवर १४ जानेवारी १७६१ रोजी सदाशिवराव भाऊ मराठी सैन्याच्या मध्यभागी प्रथम हत्तीवर बसून लढत होते. सकाळी लढाई सुरू झाली. त्यावेळी विश्वासराव हत्तीवरून लढत होते. दुपारी हत्तीवरून उतरून ते दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले. मात्र याचवेळी तिसऱ्या प्रहरी गोळी लागून ते धारातीर्थी पडले. त्यावेळी सदाशिवराव भाऊ जवळच लढत होते. त्यांनी विश्वासरावांचे पार्थिव हत्तीवरील अंबारीत ठेवले. बापूजी हिंगणे ते पार्थिव धरून बसले. विश्वासराव पडताच मराठी सैन्याचा धीर खचला. सैन्यात पळापळ सुरू झाली. सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत घुसले. विश्वासराव पडताच रणभूमीवर अंबारीत बसलेल्या पार्वतीबाई यांनी टाहो फोडाला. नाना फडणवीस यांच्या मातोश्रीही त्या अंबारीत होत्या. त्या पार्वतीबाईस समजावू लागल्या. पानिपतच्या रणभूमीवर  विश्वासराव पेशवे यांचा मृतदेह ज्या हत्तीवर ठेवण्यात आला होता, तो हत्ती अफगाण सैन्याच्या हाती लागला आणि बापूजी हिंगणेही कैद झाले. ही बातमी शुजादौल्लास लागल्यावर त्याने ते पार्थिव ताब्यात घेतले. अब्दालीने स्वार पाठवून ते पार्थिव पाहण्यासाठी आपल्या छावणीत आणले. अठरा वर्षांच्या मिशीही न फुटलेल्या सुंदर तरुणाचे प्रेत पाहून सर्वांना हळहळ वाटली. दुराणी शिपायांनी ते पार्थिव पाहून अहमदशहा अब्दाली यास एक विनंती केली की, मराठ्यांच्या राज्याचे हे प्रेत आम्हास द्या, आम्ही त्यात पेंढा भरून ते काबूलास विजयचिन्ह म्हणून नेतो. पण तसे काही न होता गणेश वेदांती व काशीराजा वगैरे मुत्सद्दी लोकांनी एक लाख रुपये भरून अब्दालीकडून विश्वासरावांचे प्रेत सोडवून घेतले. शुजाच्या विनंतीवरून ते त्याच्या छावणीत परत आणून त्याचे शास्त्रोक्तपणे दहन करण्यात आले.

संदर्भ : 

  • राजवाडे, विश्वनाथ काशिनाथ, मराठ्यांच्या इतिहासाची साधने : १७५० ते १७६१, वाई, १८९८.
  • शेजवलकर, त्र्यं. शं. पानिपत :१७६१, आवृ-९, पुणे, २०१८.
  • सरदेसाई, गोविंद सखाराम, रियासत : मध्य विभाग ३ : पानिपत प्रकरण, पुणे, १९२२.
  • हेरवाडकर, रघुनाथ विनायक, संपा., कृष्णाजी शामराव विरचित भाऊसाहेबांची बखर, पुणे, १९९०.

                                                                                                                                                                                   समीक्षक : विद्याचरण पुरंदरे