गोरक्षशतकम् हा गोरक्षनाथ यांनी लिहिलेला पद्यग्रंथ आहे. गोरक्षनाथांच्या काळाबद्दल मतभेद असून ते ७ वे ते १५ वे शतक या दरम्यान होऊन गेले असे विद्वानांचे मत आहे. तरीही सामान्यत: इसवी सनाचे १० वे शतक हा त्यांचा काळ मानला जातो. मत्स्येन्द्रनाथ हे नाथसंप्रदायाचे अथवा योगसंप्रदायाचे आद्यगुरु असून गोरक्षनाथ हे त्यांचे शिष्य होते. ते शैवसंप्रदायातील योगी होऊन गेले. त्यांच्या पंथाला कानफाटा असेही म्हणतात. गोरक्षनाथांच्या स्थलनिश्चितीविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. कोणी त्यांचा जन्म पूर्व बंगालमध्ये झाला असे मानतात, तर कोणी पंजाब येथे, तर कोणी गोदा नदीच्या तीरावरील चंद्रगिरी हे त्यांचे ठिकाण मानतात.
गोरक्षशतकम् हा ग्रंथ पद्यमय असून नावात सूचित केल्याप्रमाणे त्यात शंभर श्लोकांचा समावेश आहे. तथापि काही हस्तलिखितांत श्लोकांची संख्या शंभरहून अधिक आढळते. गोरक्षशतकम् हा ग्रंथ मोक्षाचा मार्ग आहे असे गोरक्षनाथ ग्रंथाच्या आरंभी म्हणतात (२). या ग्रंथानुसार आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या सहा अंगांच्या अभ्यासाने चित्तावर नियंत्रण प्राप्त होते. परिणामी साधकाला मुक्ती मिळते. जेवढ्या जीवजाती आहेत तेवढी आसने आहेत. भगवान शिव ती सर्व आसने जाणतात असे गोरक्षनाथ म्हणतात (५). प्रातिनिधिक असलेल्या ८४ आसनांपैकी सिद्धासन व पद्मासन ही दोन आसने मुख्य आहेत असे प्रतिपादन करून त्या दोघांची कृती व लाभ यांचे वर्णन त्यांनी केले आहे.
या सहा अंगांशिवाय प्राणायाम, मुद्रा, बंध, कुंडलिनी, षट्चक्रे व नाड्या या विषयांचेही विवेचन या ग्रंथात आढळते. शरीरातील ७२००० नाड्यांपैकी इडा, पिंगला, सुषुम्णा, गान्धारी, हस्तिजिह्वा, पूषा, यशस्विनी, अलम्बुषा, कुहू, शंखिनी या दहा नाड्या व त्या शरीराच्या कोणत्या भागात आहेत याचे यथोचित वर्णन येथे आले आहे.
हठयोगातील अन्य ग्रंथात गोरक्षशतकात वर्णन केलेल्या दहा नाड्यांव्यतिरिक्त सरस्वती, वरुणा, विश्वोदरी, पयस्विनी या नाड्यांचाही उल्लेख येतो. गोरक्षनाथांनी पाच प्रकारच्या प्राणांच्या नावाचा उल्लेख केला असून प्राण आणि अपानाला वश होऊन जीव शरीरात भ्रमण करतो असे म्हटले आहे. महामुद्रा, नभोमुद्रा, उड्डियान, जालंधर आणि मूलबंध यांचे ज्ञान असणाऱ्या योग्याला सिद्धी प्राप्त होतात असे प्रतिपादन त्यांनी केले आहे (३२). महामुद्रा, खेचरीमुद्रा, जालंधर बंध व मूलबंध यांची कृती दिली असून उड्डियान बंधाची प्रशंसा केली आहे. हा बंध मृत्यूवर विजय प्राप्त करवितो असे विधान केले आहे (३५).
प्राणायामाचे महत्त्व सांगताना प्राण (श्वसन) अस्थिर असेल तर चित्तही अस्थिर होते. प्राण स्थिर असेल तेव्हा चित्त स्थिर होते आणि योगी खांबासारखा स्थिर होतो म्हणून प्राणावर नियंत्रण ठेवावे असा उपदेश केला आहे (३९). या ग्रंथात रेचक, पूरक आणि कुंभक यांना प्राणायाम असे म्हटले आहे (४७). ज्या प्राणायामामध्ये शरीराला घाम येतो तो अधम, ज्यात शरीराचे कंपन होते तो मध्यम आणि ज्यात योगी पद्मासनात असताना वायूचे शरीरात ऊर्ध्व दिशेला गमन होते तो उत्तम प्राणायाम असे प्रस्तुत ग्रंथात सांगितले आहे (४९).
प्रत्याहाराची व्याख्या ‘तालुप्रदेशातील अधोमुख असलेल्या चंद्रातून स्रवणारे अमृत धारण करणे आणि नाभिप्रदेशात असलेल्या ऊर्ध्वमुख सूर्याने त्याचा ग्रास घेऊ नये अशी दक्षता घेणे याला प्रत्याहार म्हणतात’, अशी केली आहे. तो विपरीतकरणीने साध्य होतो असे प्रतिपादन केले आहे (५५, ५७, ५९).
पतंजलींनी धारणेची व्याख्या ‘एखादया विशिष्ट वस्तूवर मन स्थिर करणे म्हणजे धारणा’ अशी केली आहे (योगसूत्र ३.१); तर गोरक्षनाथांनी धारणेची व्याख्या ‘मनाचे निश्चलत्व’ अशी केली आहे आणि शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांवर धारणा करावी असे म्हटले आहे. त्या ठिकाणी प्राण नेऊन पाच घटिकांपर्यत तेथे चित्त स्थिर करावे असे म्हटले आहे. प्राणाला क्रमश: हृदय, कंठ, तालु, भुवयांचा मध्य या स्थानांमधून ब्रह्मरंध्राचे (सहस्रार) ठिकाणी न्यावे (६८–७३). पाच महाभूतांवर केलेल्या धारणांना स्तम्भनी, द्रावणी, दहनी, भ्रमणी आणि शोषणी ही नावे आहेत असे गोरक्षनाथ म्हणतात (७४).
ध्यानाची व्याख्या गोरक्षनाथ यांनी ‘तत्त्वावर (आत्म्यावर) मन स्थिर होते त्याला ध्यान म्हणतात’ अशी केली आहे. आधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक, अनाहत, विशुद्ध या चक्रांवर ध्यान करण्यामुळे मिळणारे फळ या ग्रंथात प्रतिपादन केले आहे (७८–८३). गोरक्षनाथांनी सगुण व निर्गुण असे ध्यानाचे दोन प्रकार सांगितले आहेत (७७). सगुण ध्यानाने आनंद प्राप्त होतो, तर निर्गुण ध्यानाने दु:खांपासून मुक्ती प्राप्त होते (८४–८५).
समाधीची व्याख्या ‘जीवात्मा आणि परमात्म्याचे ऐक्य’ अशी केली आहे. या अवस्थेत श्वसन क्षीण होते आणि मनाचा लय होतो. योगी शब्द, रूप, रस, गंध अर्थात इंद्रियांच्या पलीकडे जातो. एकात्मभावाचा अनुभव घेतो. त्याला काळ म्हणजे मृत्यू आणि कर्माचे बंधन उरत नाही (९४–९७). दुधामध्ये दूध, तुपामध्ये तूप आणि अग्निमध्ये अग्नि मिसळला असताना त्यांचे जसे ऐक्य होते त्याप्रमाणे योग जाणणारा योगी परमपदामध्ये अद्वैत स्थितीला प्राप्त होतो.
गोरक्षनाथांनी यम आणि नियम यांची योगाच्या अंगांमध्ये गणना केली नाही. या ग्रंथाचे अवलोकन करताना प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी इत्यादी व्याख्यांचे पतंजलींच्या योगसूत्रातील व्याख्यांपेक्षा वेगळेपण जाणवते. योगाचे अंतिम ध्येय अद्वयत्व, परमात्म्यात लीन होणे हे सांगितले आहे. गोरक्षशतकम् या ग्रंथामध्ये अद्वैतावर भर दिला असून पातंजल योगामध्ये प्रकृति-पुरुष यांच्या द्वैतावर भर दिला आहे.
योगाचे विवेचन अद्वैत तत्त्वज्ञानाच्या आणि तंत्राच्या आधारे करणारा गोरक्षशतकम् हा ग्रंथ साधकांना मुक्तीचा मार्ग दाखवितो.
समीक्षक : ललिता नामजोशी