आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व औषधी गुणधर्म असलेल्या खनिजांना औषधीय खनिजे संबोधले जाते. प्रामुख्याने आयुर्वेदीय औषधनिर्मितीमध्ये खनिजांचा वापर मोठया प्रमाणात आढळून येतो. आयुर्वेदात या औषधनिर्मितीच्या शास्त्रास रसशास्त्र म्हटले आहे. ऋग्वेद, अथर्ववेद आणि तैतरीय उपनिषदामध्ये रसशास्त्राचा उल्लेख आढळतो. १२ व्या शतकापासून आयुर्वेदीयपद्धतीने रोगनिदान करून चिकित्सेमध्ये प्रामुख्याने खनिजांचा उपयोग रसशास्त्रातील औषधीत होऊ लागला. अथर्ववेदाला भैषज्यवेद म्हटले जाते.
औषधनिर्मितीमध्ये पारदाला (पारा; Mercury) विशेष स्थान असून वाग्भट्टाने पारदाला “रसराज” या शब्दाने गौरविले आहे. रसोत्पती प्रकरणात पारदाचे स्वरूप, उत्पत्तीस्थान, गुणदोष आणि उपयोग याचे सविस्तर वर्णन आले आहे. इ.स.पूर्व ३२५ ते ४०० वर्षांपूर्वी चाणक्याने रचलेल्या कौटिल्य अर्थशास्त्रात पारदाचा उल्लेख आढळतो. आठव्या ते नवव्या शतकानंतर खनिजापासून पारदाबरोबर औषध निर्माण करण्याचे शास्त्र प्रगत झाले. चरक व सुश्रुत यांच्या ग्रंथात पारद व इतर खनिजांचा उल्लेख आढळतो. वाग्भट्टाच्या रसरत्नसमुच्चय ग्रंथात पारद आणि औषधीय खनिजांची विस्तृत माहिती आहे. त्यात औषधीय खनिजांचे वर्गीकरण खनिजांचे स्वरूप, गुणधर्म आणि औषध तयार करण्याच्या उपयुक्ततेनुसार महारस, उपरस आणि साधारणरस यामध्ये केले आहे. हिंगुळ हे पारदाचे निसर्गात मिळणारे प्रमुख खनिज आहे.
ज्या खनिज सत्वाने रसरक्तादि धातूंची वाढ होते, त्यास महारस म्हणतात. यातील खनिजांना श्रेष्ठ खनिजे म्हटले आहे. यांत अभ्रक (Mica), वैक्रान्त (Fluorite/Tourmaline), माक्षिक (Chalcopyrite), विमल (Iron Pyrite), शिलाजतु (Mineral Pitch/Asphaltum), सस्यक (Malachite/Blue Vitriol), चपल (Bismuth) आणि रसक/खर्पर (Zincite/Calamine) इत्यादी खनिजांचा समावेश होतो. उपरसातील खनिजांचे सत्व किंचित रसायनयुक्त असते. यांत गंधक (Sulphur), गैरिक (Hematite), कासीस (Green Vitriol/Melanterite), कांक्षी (Potash Alum), हरताल (Orpiment), मनःशिला (Realgar), अञ्जन (Collyrium/Stibnite) आणि कंकुष्ठ (Magnesite) इत्यादी खनिजांचा समावेश होतो. तर साधारणरसात सामान्यपणे खनिजांचा थोडक्यात वापर केला जातो. यांत गौरीपाषाण (White or Native Arsenic), नवसागर (Sal Ammonic), गिरिसिंदूर (Red oxide of Mercury), हिङ्गुल (Cinnabar) आणि मुर्दाशंख (Litharge) इत्यादी खनिजांचा समावेश होतो.
शुद्ध, स्फटिकी, पारदर्शी इ. गुणांनी युक्त अधिक सुंदर अशा खनिजास “रत्न” (Gems/Precious minerals) म्हणतात. विशेष मोहक रंग आणि पूर्ण पारदर्शक खड्यांना मौल्यवान समजतात. तर अंशतः स्फटिकी पारदर्शक किंवा अपारदर्शक खड्यांना उपरत्ने (Semi-precious minerals) म्हणतात. काही विशेष रत्ने आणि उपरत्नांचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो. त्यांतील प्रमुख रत्ने याप्रमाणे : माणिक्य (Ruby/Red gem Corundum), तार्क्ष्य/पन्ना/मरकत (Emerald), पुष्यराग/पुखराज (Topaz), वज्र/हीरक (Diamond), नीलम (Blue gem Corundum/Sapphire), गोमेद (Hessonite/Orange Zircon), वैदूर्य (Cymophane/cat’s eye). तर उपरत्ने याप्रमाणे : सूर्यकान्त (Sun stone – Gem Variety Orthoclase), चन्द्रकान्त (Moon stone, Labradorite), राजावर्त (Lapis lazuli), वैक्रान्त (Fluorite), स्फटिक (Rock crystal/Quartz), कान्त (Magnetite), तंतुपाषाण (Serpentine), पेरोजक (Turquoise), व्योमाष्म (Jade), तृणकांत (Amber) इ. कर्पद, अग्निजार, मौक्तिक आणि प्रवाळ हे प्राणीज द्रव्य आहेत, तर कंपिल्लक हे वनस्पतीची साल आहे. त्यामुळे भूशास्त्रीय दृष्ट्या त्यांना खनिज म्हणता येत नाही.
सर्वच औषधीय मूळ खनिजांवर शुद्धीकरणासाठी संस्कार केल्यानंतरच ते औषधी द्रव्य म्हणून वापरले जाते. अनेक शतकांपासून विविध शारीरिक आणि मानसिक आजारात औषधीय खनिजांचा उपयोग यशस्वीपणे केला जात आहे.
संदर्भ :
- Umrethia, Bharati; Kalsariya,Bharat. Text Book of Rasashastra, Chaukhambha Prakashak, Varanasi.
- वैद्य, श्री. शं.; डोळे, वि.वा. रसशास्र, अनमोल प्रकाशन, पुणे,१९९७. समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर