अभ्रक हे आयुर्वेद महारसातील महत्त्वाचे खनिज आहे. इ. स. पू. ४ थ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रात वज्राभ्रक नावाने अभ्रकाचा उल्लेख आढळतो. इ. स. ३ र्‍या शतकात गौतमकृत न्यायदर्शनमध्ये अभ्रकाचा उल्लेख आढळतो. इ. स. ६ व्या शतकातील अमरकोशात अभ्रकाला गिरिजामल संबोधले आहे. अभ्रकाला संस्कृतमध्ये अभ्रकम्, हिंदी व मराठीमध्ये अभ्रक, इंग्रजीत माइका/मायका नावाने ओळखले जाते. आयुर्वेद वाङ्‌मयात अभ्रकाला अभ्रक, गगन, भृंग, ख, व्योम, वज्र, घन, गिरिज, बहुपत्र, अनन्तक, आकाश, अम्बर, शुभ्र, अमल, गरजध्वज, मेघ, अन्तरिक्ष, गौरीतेज इ. वेगवेगळी नावे आहेत. याशिवाय आकाश व ढग या अर्थी असलेले शब्द अभ्रकाची पर्याय नावे म्हणून वापरले जातात.

आयुर्वेदात अग्निपरीक्षेवरून अभ्रकाचे पिनाक, नाग, मंडूक आणि वज्र हे प्रकार केलेले आहेत. अभ्रकाचा मोठा तुकडा रसरसलेल्या शेगडीमध्ये ठेवून लाल होईपर्यंत तापवितात. अग्नीच्या उष्णतेमुळे अभ्रकाचे पापुद्रे सुटे होऊन त्यातून चिटचिट असा अवाज होतो, अशा अभ्रकास पिनाक म्हणतात. नाग प्रकारात अभ्रकातून नागाच्या फुत्कराप्रमाणे आवाज येतो. मंडूक प्रकारात अग्नीच्या उष्णतेमुळे अभ्रकाचे तुकडे बाहेर पडतात, तसेच बेडकाच्या ओरडण्यासारखा आवाज येतो. वज्र प्रकारात अभ्रकावर अग्नीचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. प्रत्येक प्रकारचा अभ्रक श्वेत, पीत, रक्त आणि कृष्ण रंगाचा असतो. वज्र अभ्रकाचा उपयोग आयुर्वेद महारसात केला जातो. चिकित्सामध्ये अभ्रकाचा सर्व प्रथम उपयोग अष्टांगहृदय (४ ते ६ शतक) मध्ये कासीसादि तेलाच्या रूपात बाह्योपचारार्थ केलेला आढळतो.

खाणीमधून सव्वा हातापेक्षा (एक हात = १६ इंच) जास्त खोलीवरून काढलेले, दिसावयास स्निग्ध, जाड पापुद्रे, वजनदार व सहज विलग होऊ शकणारे कृष्णवज्राभ्रक हे औषधनिर्मितीसाठी ग्राह्य आहे. अग्राह्य अभ्रकाचा औषधात उपयोग केला गेला, तर त्यापासून अनिष्ट लक्षणे व व्याधी उत्पन्न होऊ शकतात.

अभ्रक भस्म औषधनिर्मितीपूर्वी कृष्णवज्राभ्रकावर शोधन, मारण, अमृतीकरण, निश्चंद्रत्व, लोहितीकरण, सत्वपातन, सत्वशोधन, सत्वभस्म आणि सत्वमृदुकरण इत्यादी संस्कार केले जातात. अभ्रक भस्म संपुटीकरण करून विविध अग्निपुटं प्रकार वापरून अब्जांश कणापर्यंत नेले जातात. काही परीक्षा, उदा., जसे बोटांवरील रेषांमध्ये भस्म भरून जाणे; ज्यास रेखापूर्णत्व तपासणी म्हणतात आणि वारीपूर्णत्व म्हणजे पाण्यावर तरंगणे इत्यादी ही अब्जांश स्तरावरील तपासणी होत.

अभ्रक भस्माचा उपयोग मुख्यत: मधुमेह (Diabetes mellitus), श्वास (Asthama), कुष्ठ (Leprosy), कास (Coughing disorder), शोथ (Swelling), पाण्डु (Anaemia), हृदयरोग (Heart disease) इत्यादी व्याधींमध्ये देण्यात येणार्‍या औषधांत केला जातो. आरोग्यवर्धिर्नी वटी, पंचामृतपर्पटी, रसराजरस, महालक्ष्मी विलास रस, नागार्जुनाभ्र रस, ब्राह्मी वटी, चंद्रकला रस, योगराज गुग्गुल, अर्शकुठार रस, वसंतकुसुमाररस, बृहतवातचिंतामणिरस इत्यादी औषध निर्मितीतसुद्धा अभ्रक भस्माचा उपयोग केला जातो.

संदर्भ :

  • Dole, Vilas; Paranjpe, Prakash  A Text Book of Rasashastra, Chaukhamba Sanskrit, Pratishthan, Delhi, 2006.
  • Murthy, S. R. N. Minerals of the Indian Systems of Medicine, Prasad Narasimha, Bangalore, 2003.
  • Umrethia, Bharti; Kalsariya Bharat A Text Book of Rasashastra, Chaukhambha Prakashak,Varanasi, 2019.
  • पं. काशीनाथशास्त्री रसतरङ्गिणी, मोतिलाल बनारसीदास, दिल्ली, २०००.
  • झा, चन्द्रभूषणआयुर्वेदीय रसशास्त्र, चौखम्बा सुरभारती प्रकाशन, वाराणसी, २०२०.
  • वैद्य, श्री. शं., डोळे, विलास रसशास्त्र, अनमोल प्रकाशान, पुणे, १९९७.

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर