नॉर्वेमधील स्कुटेरुड या गावी हे प्रथम आढळल्याने याला स्कुटेरुडाइट नाव देण्यात आले. हे कोबाल्ट-निकेल आर्सेनाइड मालिकेतील खनिज असून यात बहुधा लोहही असते. याचे स्फटिक सामान्यपणे घनाकार व अष्टफलकाकार असून क्वचित द्वादशफलकाकार स्फटिकही आढळतात. मात्र हे खनिज बहुधा संपुंजित व घट्ट कणांच्या रूपांत आढळते. कठिनता ५.५ – ६; वि. गु. ६.५  ± ०.४; ठिसूळ; चमक धातूसारखी; रंग कथिलासारखा पांढरा ते रुपेरी करडा; कस काळा; अपारदर्शक, रा. सं. बहुधा (Co, Ni)As3 मात्र कोबाल्ट व निकेल यांच्या जागी पुष्कळदा लोह आलेले असल्याने रा. सं. (Co, Ni, Fe,) As3 असेही दर्शवितात. निकेलचे प्रमाण जास्त असलेल्या याच्या प्रकाराला निकेल – स्कुटेरुडाइट म्हणतात. हे गलनीय खनिज लोणारी कोळशाच्या निखार्‍यावर फुंकनळीद्वारे भाजल्यास फुंकनळीसमोर आर्सेनिक ऑक्साइडचा लेप तयार होतो व लसणासारखा वास येतो. संपुंजित आर्सेनोपायराइटपासून हे केवळ कोबाल्टची चाचणी घेऊन वेगळे ओळखता येते.

मध्यम तापमानाला बनलेल्या धातुक (कच्च्या रूपातील धातू) शिरांमध्ये कोबाल्टाइट व निकोलाइट या खनिजांबरोबर हे आढळते. पुष्कळदा याबरोबर नैसर्गिक चांदी, बिस्मथ, आर्सेनोपायराइट व कॅल्साइट सामान्यपणे आढळतात. सॅक्सनी, कोबॉल्ट (आँटॅरिओ) व स्वित्झर्लंड येथे हे आढळते. कोबाल्ट व निकेल यांचे धातुक म्हणून याचा उपयोग होतो. चिरचुंबक व उच्च वेगी पोलादी हत्यारे यांच्या मिश्रधातू बनविण्यासाठी कोबाल्ट वापरतात. मृत्पात्री व काचेच्या वस्तू तयार करताना कोबाल्ट ऑक्साइड हे निळे रंगद्रव्य म्हणून वापरतात.

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर