मध्य प्रदेश राज्यातील धार शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीवर बांधलेला इतिहासप्रसिद्ध किल्ला. इंदूरपासून सु. ७५ किमी. अंतरावर असलेले हे ठिकाण मध्ययुगीन कालखंडात ‘माळवा’ प्रांतात समाविष्ट होते.

दर्शनी तटबंदी,धारचा किल्ला.

मध्ययुगीन कालखंडातील ९ व्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते १४ व्या शतकापर्यंत या प्रांतावर परमार घराण्याचे राज्य होते. राष्ट्रकूटांनी त्यांची अंमलदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अलाउद्दीन खल्जी आणि मुहम्मद बिन तुघलक यांच्या वंशजानी माळव्यावर शासन केले. यांच्या राजवटींत किल्ल्याच्या तटबंदीचा विस्तार होऊन प्रवेशद्वारांसोबतच बर्‍याच नवीन वास्तूंची भर पडली. १५३५ साली हुमायूनने सुलतान राजवटीचा अस्त केला आणि माळवा प्रांतावर मोगलांचे निशाण फडकवले. दख्खनच्या स्वारीला निघलेला अकबर बादशाहा आठवडाभर या किल्ल्यात मुक्कामी राहिल्याची नोंद आहे.

बुरूज.

श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी उत्तरेत मिळविलेल्या विजयाच्या परिणामस्वरूप माळवा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला (१७३०) आणि त्यांनी धारची सुभेदारी पवारांना दिली. पेशवाईच्या संबंधित काही महत्त्वाच्या घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. पेशवे पदाच्या लालसेपोटी रघुनाथरावांनी बंड केले आणि ब्रिटिशांना मिळाले, तेव्हा त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी या किल्ल्यात आश्रय घेतला. शेवटचा पेशवा दुसर्‍या बाजीरावाचा येथे जन्म झाला (७ जानेवारी १७७५). शिंद्यांच्या फौजेने जुलै १७७६ साली किल्ल्यास वेढा घातला. आनंदीबाईंनी चार महिने किल्ला लढवला. तेव्हा रघुनाथरावांनी महादजी शिंदे यांना पत्र लिहिले, ‘लढणे अगर बोलणे आम्हासी करावे. बायकामुलास तसदी द्यावी हे योग्य की काय? धारेस चिरंजीव आहे. सबब तसदी फार होते. या करिता चिरंजीवास व ‍कबिल्यास आम्हा जवळ पोहोचवून किल्ला ज्याचा त्यास अर्थात खंडेरावास द्यावा.’ यानुसार शिंद्यांनी वर्तन केले. या हकिकतीनुसार दुसर्‍या बाजीरावाने दोन वर्षांचा काळ या किल्ल्यात घालवला.

खरबुजा महाल.

इंग्रजांच्या काळात धारच्या पवारांना संस्थानिकांचा दर्जा मिळाला. तेव्हापासून भारतीय स्वातंत्र्यापर्यंत धार थेट पवारांच्या आधिपत्याखाली होते. १८५७ आणि त्या पुढील ३ वर्षे याला अपवाद ठरली. क्रांतिकारकांनी जुलै १८५७ साली किल्ल्यावर हल्ला करून ताबा मिळवला. त्यांना या भागातील भिल्ल, आदिवासी यांचीही मोलाची साथ मिळाली. कंपनी सरकारच्या फौजेची मोठी तुकडी किल्ल्यावर चालून आली. किल्ला ताब्यात येत नसल्याने ब्रिटिशांनी किल्ल्याबाहेरील सामान्य रयतेवर अनन्वित अत्याचार केला. या कारणामुळे आणि साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे ३ महिन्यांनी ३१ ऑक्टोबर १८५७ साली क्रांतिकारकांनी किल्ला सोडला. भुयारी मार्गाने ते सुरक्षित किल्ल्याबाहेर पडल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत तो भुयारी मार्ग दिसत नाही. इंग्रजांनी बंड मोडून काढल्यानंतर बंडास पाठिंबा दिल्याच्या सबबीखाली कंपनी सरकारने धार संस्थान बडतर्फ केले. पुढे इंग्रजांनी स्वत:चा निर्णय रद्द केला (१ मे १८६०) व आनंदराव (तृतीय) यांच्या रूपाने धारवर पुन्हा एकदा पवारांची सत्ता प्रस्थापित झाली.

प्रवेशद्वाराजवळील सैन्यनिवासाची इमारत.

किल्ल्याच्या पायथ्याला भव्य प्रवेशद्वार आणि त्या लगत ऐसपैस देवड्या आहे. त्याच्या छतावर पाना-फुलांचे नक्षीकाम केलेले आहे. उजव्या बाजूला १४ वर्तुळाकार खांबांची लांब कौलारू इमारत आहे. ती ब्रिटिश काळात सैन्याच्या निवासासाठी उपयोगात येत असे. तटबंदीच्या दुसर्‍या दरवाजावरील गणेशपट्टी किल्ल्याची मूळ संस्कृतीशी असलेली ओळख अधोरेखित करते. यानंतर तीस-चाळीस पावलांच्या अंतरावर पुढे आणखी ३ दरवाजे लागतात. पाच दरवाजांची ही शृंखला आणि त्यांना जोडणारा वळणदार रस्ता हे येथील वैशिष्ट्य. हे दरवाजे आणि जोडीला अभेद्य तटबंदीचे कवच किल्ल्याचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असलेले महत्त्व दाखवितात.

शेवटचा दरवाजा ओलांडला की, समोरच मोठे प्रांगण आहे. उजव्या बाजूच्या इमारतीत पुरातत्त्व खात्याचे संग्रहालय आहे. पूर्वी येथे कारागृह होते. गडाच्या दुसर्‍या टोकाला दगड आणि विटांचा वापर करून उभारलेली एक दुमजली वास्तू आहे. त्याच्या वरच्या मजल्यावरचे गवाक्ष, त्याला आधार देणार्‍या सिंहाचे शिल्पांकन आहे. समोरून दुमजली दिसणारी ही वास्तू मागील बाजूने एकमजली भासते. याच्या दोन्ही टोकाला काटेकोर आणि प्रमाणबद्ध नक्षीकामाने वेढलेल्या चार चौरसाकृती खांबांची ओसरी व पाठीमागे दालन असून खांबांना स्पर्श केल्यावरच ते लाकडी नसून दगडी असल्याची खातरी पटते. ओसरी समोरच्या पायर्‍यांनी तळघरात अर्थात समोरच्या बाजूने दिसणार्‍या पहिल्या मजल्यावर जाता येते.

तटबंदीच्या भिंतीला जोडून ‘खरबुजा महाल’ नावाची आणखी एक दुमजली वास्तू आहे. छताच्या चारी कोपर्‍यावरच्या घुमटाचा आकार खरबुजासारखा असल्याने हे नाव पडले. याच्या खालच्या मजल्यावर सात आणि वर चार खोल्या आहेत. १६ व्या शतकात राजाचे किल्ल्यावरचे निवासस्थान म्हणून हा महाल बांधण्यात आला. पुढे येथे येणार्‍या खास व्यक्तींसाठी तो वापरात येत असे. जवळपास सर्वच मोगल बादशहांचा यात मुक्काम झाला. मराठ्यांच्या काळात याच्या भिंतींना चुन्याचा गिलावा आणि रंगकाम करून सुशोभित करण्यात आले.

किल्ल्याला एकूण १४ बुलंद बुरुजांचा साज आहे. काही बुरुजांवर राजपूत शैलीत मेघडंबरी सारख्या छत्र्या बांधल्या आहेत. साधारण १० फूट उंचीच्या अष्टकोनी आकारातील भिंती आणि वर घुमट अशी रचना दिसून येते. त्यांतील तीन भिंतींना लांब खिडक्या आणि एका बाजूने पहारेकर्‍यांना प्रवेश करण्यासाठी दरवाजा आहे. किल्ल्यात पायर्‍या असलेली मोठी विहीर आहे. किल्ल्याभोवती पूर्वी खंदक होता. आता तेथे गवत वाढलेले आढळते.

संदर्भ :

  • Luard, C. E. Dhar and Mandu : A Sketch for the Sight-Seer, Alahabad, 1912.
  • Yazdani, G. The Early History of the Deccan, Vol. 2, Oxford, 1960.
  • सरदेसाई, गो. स. मुसलमानी रियासत, भाग -२, पुणे.

                                                                                                                                                                           समीक्षक : जयकुमार पाठक