चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय. योगसाधनेमध्ये चित्ताची एकाग्रता साधत असताना जे घटक चित्ताला एकाग्रतेपासून विचलित करतात त्यांचे वर्णन पतंजलींनी चित्तविक्षेप व विक्षेपसहभू म्हणजे विक्षेपांच्या जोडीने उद्भवणारे उपद्रव म्हणून केले आहे. या विक्षेपांमुळे चंचल झालेल्या चित्तामध्ये रजोगुण व तमोगुणाचे प्राधान्य असल्यामुळे ते मलिन होते. अशा चित्ताचे मालिन्य दूर करून ते शुद्ध व प्रसन्न केल्याशिवाय ते एकाग्र होऊ शकत नाही आणि एकाग्रतेशिवाय यथार्थ ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे चित्ताला शुद्ध आणि प्रसन्न करण्यासाठी पतंजलींनी चित्तप्रसादन हा उपाय सांगितला आहे – मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदु:खपुण्यापुण्यविषयाणांभावनात: चित्तप्रसादनम् | (योगसूत्र १.३३). सुख, दु:ख, पुण्य व पाप या चार विषयांबाबत अनुक्रमे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा अशा भावना जोपासल्या तर चित्तप्रसादन होते. योगसाधकांच्या दृष्टीने हे सूत्र अतिशय महत्त्वाचे आहे.

(१) सुखाप्रति मैत्री : सामान्यत: माणसाला दुसऱ्याच्या सुखाविषयी ईर्ष्या किंवा मत्सर वाटतो आणि त्यामुळे मन कलुषित होते. ते तसे न होता निर्मळ व्हावे म्हणून दुसऱ्याशी मैत्रीचा भाव बाळगावा असे पतंजली सांगतात. मैत्रीत प्रेम असते आणि दुसऱ्या व्यक्तीचा उदार स्वीकार असतो. दुसऱ्या व्यक्तीच्या सुखाला पाहून आपल्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण झाली, तर ती ईर्ष्या आपलेच चित्त मलिन करते. त्याऐवजी मैत्री भावना ठेवल्यास आपले चित्त शुद्ध आणि प्रसन्न राहते.

(२) दु:खाप्रति करुणा : दुसऱ्याचे दु:ख पाहून दया वाटणे ही साधारण प्रतिक्रिया झाली. क्वचित कधीतरी, ‘बरे झाले त्या माणसाला योग्यती शिक्षा मिळाली’ अशी विकृत समाधानाची किंवा ‘मी किती नशीबवान म्हणून असले दु:ख माझ्या वाट्याला आले नाही’ अशी आत्मतुष्टीची भावनाही मनात येवू शकते. याप्रकारच्या भावना चित्ताला मलिनता आणतात. दु:खाविषयी दया दाखविण्यात अहंकाराचा सूक्ष्मगंध असतो. करुणाही त्याहून उच्चपातळीवरील भावना आहे. दु:खी व्यक्तीसाठी करुणा बाळगल्यास स्वत:चे चित्त मलिन होत नाही.

(३) पुण्याप्रति मुदिता : पुण्याविषयी मुदिता म्हणजे आनंदाची भावना जोपासली पाहिजे. दुसऱ्याने केलेल्या पुण्यकर्माबद्दल साधकाला आनंद वाटला पाहिजे आणि त्याने स्वत:सुद्धा असे पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

(४) पापाप्रति उपेक्षा : पापाविषयी उपेक्षा बाळगावी याचा अर्थ असा की, पापाचरण करणाऱ्या व्यक्तीचा राग मानू नये, कारण हा राग साधकाचे मन कलुषित करतो. दुसरी व्यक्ती पापाचरण करीत असेल तर त्याचे चित्त कलुषित आहे परंतु, अशा व्यक्तीविषयी क्रोध उत्पन्न झाल्यास आपले स्वत:चे चित्तही कलुषित होते. त्यामुळे त्याविषयी तटस्थता बाळगणे म्हणजे उपेक्षा. पापाचरण करणाऱ्या व्यक्तीला सत्कर्म करण्यास प्रेरित करावयाचे असेल तर त्यासाठी स्वत:चे चित्त द्वेष किंवा क्रोध यापासून मुक्त असणे गरजेचे आहे. वाचस्पतींनी उपेक्षेचा अर्थ ‘टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग स्वीकारणे’ असा केला आहे. ही उपेक्षा भावना नकारात्मक नसून अन्य तिन्ही भावनांप्रमाणे सकारात्मक आहे. ह्या भावना वाढीस लागतात तसतसे रजोगुण व तमोगुण क्षीण होत जातात आणि सत्त्वगुणाचा प्रकर्ष होतो.

या सूत्रात सांगितलेल्या मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावना जोपासणे सकृद्दर्शनी सोपे वाटले तरी त्या मनात दृढपणे रुजविण्यासाठी साधकाला सतत प्रयत्नशील राहावे लागते. विशेषत: त्यांचे अनुष्ठान व्यवहारदशेत म्हणजेच अन्य लोकांशी संपर्क होत असताना करावयाचे असून त्यांच्या अभ्यासाने चित्त अधिकाधिक शुद्ध करत साधनेसाठी पात्र बनवायचे आहे. चित्तप्रसादनामुळे चित्ताला शुक्लत्व प्राप्त होते आणि ते प्रसन्न होऊन एकाग्र अवस्थेत स्थिरावते असे व्यासांनी म्हटले आहे. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावनांवर संयम (धारणा, ध्यान, समाधि) केल्यास त्या भावनांचे बळ योग्याला प्राप्त होते. म्हणजे त्या भावनांचे अनुष्ठान दृढपणे करण्यास योगी समर्थ होतो (मैत्र्यादिषु बलानि |, योगसूत्र ३.२३).

काही व्याख्याकारांनी चित्तप्रसादनाच्या १.३३ या सूत्रानंतर १.३४ ते १.३९ या सूत्रांमध्ये सांगितलेल्या योगसाधनाही चित्त शुद्ध व प्रसन्न करण्यासाठीच आहेत असे प्रतिपादन केले आहे. परंतु, व्यासभाष्यानुसार मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावनांद्वारे शुद्ध झालेले चित्त प्रसन्न व एकाग्र झाल्यानंतर एकाग्रता दीर्घ काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी सांगितलेले ते उपाय आहेत.

भगवद्गीतेमध्येही (२.६४-६५) प्रसाद हा शब्द स्थितप्रज्ञ वर्णनात आढळतो. ह्या अवस्थेत सर्व दु:खांचा नाश होतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात.

बौद्धवाङ्मयात मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावनांना ब्रह्मविहार म्हटले आहे. उपेक्षेचे अनेक प्रकार तेथे बोध्यंग या विषयावरील चर्चेत वर्णिले आहेत.

                                                                 समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर