ज्यावेळी चित्तामध्ये अहिंसा इत्यादी यमांच्या साधनेला प्रतिकूल विचार उत्पन्न होतो त्यावेळी त्या विचाराला छेद देणाऱ्या सकारात्मक विषयावर ध्यान करणे याला प्रतिपक्षभावन म्हणतात. पतंजलींनी “वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम् |” (योगसूत्र २.३३) या सूत्रात योगसाधनेला प्रतिकूल हिंसा, असत्य, स्तेय इत्यादींचा वितर्क या शब्दाने निर्देश केला आहे. येथे वितर्क शब्द विपरीत विचारासाठी वापरला आहे. ज्यावेळी चित्तामध्ये हिंसेचे, असत्य भाषणाचे, द्रव्यापहरणाचे, परस्त्रीशी गैरवर्तन करण्याचे, इतरांच्या धनाचा स्वामी बनण्याचे विचार बळावतात त्यावेळी त्या त्या विचारांच्या विरुद्ध सकारात्मक विचार (प्रतिपक्षभावनम्) मनात आणावेत.

अहिंसा हा यम आहे. त्याविषयी  साधना करीत असताना मनामध्ये हिंसेचे विचार उफाळून येणे हा वितर्क आहे. उदा., ‘अमुक एका व्यक्तीने माझा अपमान केला आहे म्हणून त्याला इजा करण्याचा विचार मनात उद्भवणे हा वितर्क आहे. परंतु, असे केल्यामुळे केलेल्या कर्माचे फळ म्हणून मला स्वत:ला दु:ख प्राप्त होईल आणि ते फळ या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावे लागेल आणि दु:ख निवृत्तीरूपी कैवल्याच्या लक्ष्यापासून मी दूर जाईन’ असा विचार करणे म्हणजे प्रतिपक्षभावन होय. ते केल्यामुळे साधक पुन्हा अहिंसेच्या आचरणात स्थिर होतो.

लोभ, क्रोध, अज्ञान यांमुळे उत्पन्न होणारे हिंसा, असत्य व स्तेयरूपी विपरीत विचार (वितर्क) हे स्वत: केलेले (कृत),  इतरांच्या प्रेरणेने केलेले (कारित), आणि स्वत: न करता दुसऱ्याने केलेल्या हिंसा इत्यादी कृत्याला संमती देण्यामुळे घडलेले (अनुमोदित) असे तीन प्रकारचे असतात. त्या कृत्यांच्या तीव्रतेनुसार त्या प्रत्येकाचे मृदु, मध्य आणि अधिमात्र (तीव्र) असे तीन-तीन प्रकार होतात. अशा प्रकारचे विपरीत आचरण दु:खाला आणि अज्ञानाला कारणीभूत होते. अज्ञान तमोगुणात्मक असते. तमोगुण ज्ञानावर आवरण टाकतो, त्यामुळे भविष्यात देखील ज्ञानाच्या अभावी विपरीत आचरण घडू शकते. ते आचरण होऊ नये याकरिता वर सांगितल्याप्रमाणे वितर्कनाशक चिंतन करणे म्हणजे प्रतिपक्षभावन होय (योगसूत्र २.३४). यमांचे आचरण करण्यापासून माणूस परावृत्त  झाला असताना हे प्रतिपक्षभावन करावयाचे आहे असे सांगितले असले तरी योगसाधनेच्या कोणत्याही टप्प्यावर साधना क्षीण झाली असताना प्रतिपक्षभावन केल्यास साधनेमध्ये सातत्य टिकविता येते. तसेच मानवी जीवनात योगाव्यतिरिक्त कोणत्याही साधनेत जेव्हा शैथिल्य येते तेव्हा ते ज्या कारणामुळे निर्माण झाले असेल त्याविरुद्ध सकारात्मक विचार केल्यास साधना सफल होऊ शकते.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर