स्फीन हे खनिज टिटॅनियम व कॅल्शियम यांचे ऑर्थोसिलिकेट आहे. याचे स्फटिक एकनताक्ष प्रणालीचे व पाचरीच्या आकाराचे असतात आणि त्यांची ठेवण (स्वरूप) भिन्न प्रकारची असते. हे खनिज चांगले स्फटिकीकरण झालेले किंवा पटलयुक्त असते. पाटन (110) चांगले असून यात विभाजनतले असू शकतात. कठिनता ५-५.५, वि. गु. ३.४-३.५५; चमक रेझिनासारखी ते हिर्यासारखी; रंग करडा, उदी, हिरवा, पिवळा, काळा. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. पाचरीच्या आकाराचे असलेले स्फटिक व वैशिष्ट्यपूर्ण चकचकीत चमक यांच्यामुळे ते ओळखता येते. रा. सं. CaTiO(SiO4). यात बहुधा थोडे लोह असते.
ग्रॅनाइट, ग्रॅनोडायोराइट, डायोराइट, सायेनाइट व नेफेलीन सायेनाइट या अग्निज खडकांत स्फीनचे लहान स्फटिक गौण खनिज म्हणून आढळतात. पट्टिताश्म, क्लोराइट सुभाजा व स्फटिकी चुनखडक या रूपांतरित खडकांत, तसेच पेग्मटाइट या खडकात त्याचे मोठे स्फटिक जडवलेल्या रूपात आढळतात. स्फीन सामान्यपणे क्लोराइटबरोबर आढळते आणि लोह धातुके, पायरोक्सीन, अँफिबोल, स्कॅपोलाइट, झिरकॉन, ॲपेटाइट, फेल्स्पार व क्वॉर्ट्झ यांच्याबरोबरही ते आढळते. रशिया (कोला द्वीपकल्प), स्वित्झर्लंड, नॉर्वे, मादागास्कर, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया, इंग्लंड, स्पेन, मेक्सिको इ. देशांत ते आढळते.
रंगलेपांतील रंगद्रव्यासाठी टिटॅनियम धातूचा स्रोत म्हणून स्फीनचा उपयोग होतो. याचे विविध रंगांचे चमकदार स्फटिक मौल्यवान उपरत्ने म्हणून वापरतात व त्यांना बहुधा पैलूही पाडतात. स्फीनमध्ये सामान्यपणे किरणोत्सर्गी (भेदक किरण व कण उत्सर्जित करणारी) मूलद्रव्ये अल्प प्रमाणात असतात. अशा खनिजाचा खडकांच्या निर्मितीच्या कालनिर्णयासाठी उपयोग होतो. स्फीन हे नाव पाचर अर्थाच्या ग्रीक शब्दावरून पडले आहे. याशिवाय टिटॅनाइट हे त्याचे आधीचे नाव असून त्याला ग्रोथाइट असेही म्हणतात.
संदर्भ : http://www.mindat.org
समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर