सामान्यपणे ‘कर्म’ हा शब्द ‘शरीराद्वारे होणारी कोणतीही क्रिया’ या अर्थाने समजला जातो. परंतु, दर्शनांमध्ये कर्म हा शब्द विशेषत: चित्ताद्वारे होणाऱ्या कर्माचा बोधक आहे. शरीराद्वारे ज्या क्रिया होतात, त्यांना चेष्टा असे म्हटले जाते. चित्ताने दिलेल्या सूचनेनुसार शरीर केवळ एखादी क्रिया अमलात आणण्याचे काम करते. मुख्यत: जी क्रिया करायची आहे, त्याविषयीचा विचार आणि कर्म हे चित्ताद्वारेच होते असते. त्यामुळे चित्त कर्म करते, चित्तामध्येच त्याचे संस्कार उत्पन्न होतात आणि त्याच्या फळाचा अनुभवही चित्ताद्वारेच घेतला जातो. शरीर आणि इंद्रिये ही त्यासाठी असणारी साधने आहेत. ज्या कर्माचा विपाक (फळ) शीघ्र प्राप्त होते, अशा कर्माला सोपक्रम कर्म असे म्हणतात व ज्या कर्माचे फळ दीर्घकाळाने मिळते, अशा कर्माला निरुपक्रम कर्म असे म्हणतात.

योगदर्शनानुसार कर्म चार प्रकारचे असते – शुक्ल (शुभ), कृष्ण (अशुभ), शुक्ल-कृष्ण (मिश्र) आणि अशुक्ल-अकृष्ण (निष्काम कर्म).

(१) शुक्ल कर्म : ज्या कर्माद्वारे अन्य जीवांना हानी होत नाही असे सत्कर्म म्हणजे शुक्ल कर्म होय.तपाचरण, ध्यान इत्यादींचा अंतर्भाव शुक्ल कर्मात होतो. व्यासभाष्यानुसार शुक्ल कर्म केवळ चित्ताद्वारे केले जाते व शरीर किंवा इंद्रियेयांसारख्या बाह्य साधनाद्वारे केले जात नाही. ज्यावेळी चित्ताद्वारे होणाऱ्या कर्माचे अनुसरण शरीराद्वारेही केले जाते, ते केवळ शुक्ल कर्म राहत नाही, तर त्यामध्ये कृष्ण कर्माचा किंचित अंश राहतो. उदाहरणार्थ, चित्तामध्ये अन्नदान करण्याचा विचार आला व शरीराद्वारे ती क्रियाही संपादित केली गेली. एखाद्या गरजू व्यक्तीला दान दिल्याने हे सत्कर्म शुक्ल कर्मही होते, पण अन्न शिजविताना त्यासाठी लागणाऱ्या भाज्या किंवा धान्य मिळवण्यासाठी त्या त्या वनस्पतीला इजा केल्यामुळे ते कृष्ण कर्मही होते. त्यामुळे जे जे चित्ताचे कर्म शरीराद्वारेही संपादित केले जाते, ते सर्व शुक्ल-कृष्ण कर्म होय.

(२) कृष्ण कर्म : चित्ताने, शरीराने किंवा वाणीने दुसऱ्याला इजा पोहोचविणे, फसवणे, हिंसा करणे इत्यादी म्हणजे कृष्ण कर्म होय. जरी प्रत्यक्षात एखाद्याने शरीराने हिंसा केली नाही, परंतु दुसऱ्याविषयी चित्तामध्ये क्रोध, असूया यांचा विचार असेल तर तेही कृष्ण कर्म होय. कारण केवळ चित्ताद्वारे होणाऱ्या कर्माचेही संस्कार चित्तात उत्पन्न होतात व कालांतराने त्याचे फळ मिळते.

(३) शुक्ल : कृष्ण कर्म – जे कर्म काही अंशी चांगले आणि आणि काही अंशी वाईट अशा दोन्ही प्रकारचे असते, असे मिश्र कर्म म्हणजे शुक्ल-कृष्ण कर्म होय. वर म्हटल्याप्रमाणे चित्ताबरोबरच शरीराद्वारेही हे कर्म केले जाते.

(४) अशुक्ल-अकृष्ण कर्म : जे शुक्लही नाही आणि जे कृष्णही नाही, असे तटस्थ रूपाने केलेले कर्म म्हणजे अशुक्ल-अकृष्ण कर्म होय. सामान्य जीवांना कोणतेही कर्म करताना त्या कर्माच्या फळाची इच्छा असते. परंतु, विवेकख्याती प्राप्त झालेल्याव निष्काम भावनेने कर्म करणाऱ्या योग्यांची सर्व कर्मे या प्रकारची असतात — कर्माशुक्लाकृष्णं योगिनस्त्रिविधमितरेषाम् । (योगसूत्र ४.७)

पहिल्या तीन प्रकारच्या कर्मांचे संस्कार चित्तामध्ये उत्पन्न होतातव कालांतराने त्यांचे फळ मिळते. जर चित्तामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष व अभिनिवेश असतील; आणि यातील कोणत्याही क्लेशाच्या प्रभावामुळे जर जीव एखादे कर्म करीत असेल तरच कर्माचे संस्कार (आशय) उत्पन्न होतात; अन्यथा नाही. अशुक्ल-अकृष्ण कर्म निष्काम भावनेने केल्यामुळे अशा कर्माचा कोणताही विपाक (फळ) होत नाही.

कर्म हे प्रकारांतराने तीन प्रकारचे असू शकते – कृत, कारित आणि अनुमोदित. कृत म्हणजे स्वत: केलेले, कारित म्हणजे दुसऱ्याकडून करवून घेतलेले आणि अनुमोदित म्हणजे जर एखादे कर्म कोणीतरी अन्य व्यक्तीने केले आहे, त्या कर्माचे ज्ञान झाल्यावर त्यास आपले अनुमोदन असेल तर ते तिसऱ्या प्रकारचे कर्म होय. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने स्वत: दुसऱ्याला इजा केली तर ते कृत कर्म होय. जर स्वत: न करता दुसऱ्या कोणाकडून इजा करविली, तर ते कारित कर्म होय. एखाद्या व्यक्तीला काही कारणाने इजा झाली असे समजल्यावर ‘योग्य झाले त्याला इजा झाली’ अशा प्रकारे अनुमोदन असेल, तर ते अनुमोदित कर्म होय. या तीन प्रकारांमध्ये फक्त कृत कर्मामध्ये मनुष्य स्वत: शरीराने सहभागी असतो, परंतु चित्ताचा सहभाग तीनही प्रकारच्या कर्मांमध्ये असल्यामुळे केवळ विचाररूपाने जे कर्म होते, त्याचेही संस्कार चित्तात उत्पन्न होतात व त्याचेही फळ प्राप्त होते.

भगवद्गीतेनुसार (१८.१३-१५) कोणतेही कर्म संपादित करण्यासाठी पाच घटक आवश्यक असतात – (१) अधिष्ठान : कर्म करण्याचे स्थान, (२) कर्ता : कर्म करणारा जीव, (३) करण : कर्म करण्याचे साधन, (४) चेष्टा : कर्म संपादित करण्यासाठी केलेल्याआनुषंगिक क्रिया आणि (५) दैव : अदृष्ट घटक.

योगानुसार जीवाला कशा प्रकारचा जन्म प्राप्त होणार, त्याचे आयुष्य किती असणार आणि त्याला आयुष्यात कशा प्रकारचे भोग मिळणार या सर्व गोष्टी त्याच्या कर्मानुसार निश्चित होतात. सांख्य-योग दर्शनांबरोबरच अन्य भारतीय दर्शनांमध्येही कर्माचा विशेषत्वाने विचार करण्यात आला आहे.

                                                                                                                                                                                               समीक्षक : कला आचार्य