अधिकार : कोणती कृती अनुज्ञेय आहे आणि कोणती संस्था कायदेशीर आहे ह्या आधुनिक संज्ञेवर अधिकार ही संकल्पना आधारलेली आहे. अधिकाराचा एक संच स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र व अधिकाराचे वितरण मंजूर करणे होय आणि काय होऊ शकते, काय केले पाहिजे आणि काय केले जाऊ नये यासंबंधी एका विशिष्ट उद्देशाचे समर्थन करणे होय. या अर्थाने अधिकार काही विशिष्ट क्रिया करण्यासाठी आहेत (किंवा नाहीत). विशिष्ट राज्यात असणाऱ्यांना क्रिया करण्यासाठी अधिकार असतो (किंवा नसतो) तसेच ठराविक राज्यात अधिकार असू शकतात (किंवा नसतात). व्यक्तीला जे प्राप्त होणे योग्य आहे ते मिळावे असा अधिकार संकल्पनेचा अर्थ आहे. उदा. मतदान करणे, भाषण करणे इत्यादी. परंतु राजकीय उत्तरदायित्वापासून अधिकार संकल्पना वेगळी आहे. अधिकार आणि उत्तरदायित्व या संकल्पनांचा अर्थ सामान नाही ; परंतु संज्ञांचा परस्पर संबंध आहे. वैधानिक, नैतिक आणि मानवी इत्यादी आधारावर अधिकाराचा दावा केला जातो. अधिमान्य सत्तेला अधिकार म्हणतात. अधिमान्य सत्ता म्हणजे ज्यांच्यावर सत्ता वापरली जाते त्यांना तो सत्तावापर मान्य असतो. ज्या प्रकियेतून सत्तेचा वापर अधिमान्य बनतो असा अधिकार असणाऱ्या व्यक्तीच्या आज्ञा पाळल्या जातात. कारण तिला अशा आज्ञा देण्याचा अधिकार आहे हे संबंधितांनी मान्य केलेले असते. म्हणूनच शासन हे अधिकारावर आधारित असावे असा आग्रह सिद्धांतांमध्ये दिसून येतो. उदा. संमतीचा सिद्धांत, सहमतीचा सिद्धांत. कोणताही अधिकार संबंधितांच्या संमतीनेच अधिमान्य बनतो. तसेच संमतीमधून अधिकारी व्यक्तीला कृतीचा हक्क प्राप्त होतो.
अधिकार आणि सत्ता यांच्यात महत्वाचा फरक आहे. एखाद्या व्यक्तीला सत्ता असणे म्हणजे विशिष्ट कृती करण्याची शक्ती असते. पण त्या व्यक्तीला ती कृती करण्याचा हक्क असेलच असे नव्हे. याउलट अधिकार असणे म्हणजे विशिष्ट कृती करण्याचा हक्क मिळतो. सत्ता ही मुख्यतः दंडशक्ती वापरण्याच्या कुवतीवर किंवा क्षमतेवर आधारित आहे. तर अधिकार हा अधिमान्यतेवर आधारित आहे. दोहांमध्ये व्यक्ती-व्यक्तींमधील वर्चस्वसंबंध दिसतात ; परंतु वर्चस्व स्थापनेला जेव्हा अधिमान्यता मिळते तेव्हा तो अधिकार असतो. अधिकाराचे समर्थन तीन आधारांवर केले जाते. अ) समाजाचा एक घटक ह्या नात्याने व्यक्तीला अधिकार मिळावेत. ब) व्यक्तीला समाजात योग्य भूमिका निभावण्यासाठी अधिकार आवश्यक आहे. क) व्यक्तीला अधिकार मिळण्यासाठी तिने इतरांच्या अधिकारांचा सन्मान केला पाहिजे.
अधिकाराला अधिमान्यता कशी प्राप्त होते याचे विवेचन मॅक्स वेबर यांनी केले आहे. त्याने अधिकाराचे तीन प्रकार सुचविले आहेत. १) नियम अथवा तर्कसंगत मानदंडावर आधारित असा विधिजन्य अधिकार.उदा. राज्यघटना, कायदे इत्यादींवर आधारित अधिकार. येथे अधिकाराचा पाया बुद्धिनिष्ठ असतो. अधिकार वापरणाऱ्या व्यक्तीला महत्व नसते. तर ती ज्या पदावर असेल त्या पदाला काही अधिकार दिलेले असतात. ती व्यक्ती पदावरून दूर झाल्यानंतर ते अधिकार त्याच्याकडे राहत नाहीत. २) परंपराजन्य अधिकार. येथे लोकांची संमती परंपरेला आणि त्या परंपरेनुसार अधिकाराचा वापर करण्याला असते. असा वापर करणाऱ्या व्यक्तीला परंपरेमुळे अधिकार मिळतो. ३) दिव्यवलयांकित अधिकार. अधिकार पदामुळे नव्हे तर व्यक्तीला खास त्याच्या कर्तृत्वामुळे प्राप्त होतो. ती व्यक्ती कोणत्या पदावर आहे किंवा एखाद्या पदावर आहे की नाही याला महत्व नसते. अशा व्यक्तीला अपूर्व लोकप्रियता आणि दिव्य वलय प्राप्त झालेले असते.अशा अधिकाराला कोणताही बुद्धिनिष्ठ अथवा परंपरानिष्ठ आधार नसतो. तर केवळ ती व्यक्ती, तिचे कर्तृत्व, व्यक्तिमत्व यातूनच अधिकार निर्माण होतो. व्यक्तीच्या ज्या अधिकारांमध्ये राज्यसंस्था हस्तक्षेप करीत नाही असे अधिकार नकारात्मक अधिकार असतात. उदा. स्वातंत्र, जीवित आणि मालमत्ता इत्यादी. व्यक्तीच्या ज्या अधिकारांमध्ये राज्यसंस्था राजकीय उत्तरदायित्व म्हणून हस्तक्षेप करते अशा अधिकारांना सकारात्मक अधिकार म्हणून ओळखले जाते. अशा सकारात्मक अधिकारांचा उद्देश चांगली सेवा देणे हा असतो. नकारात्मक अधिकाराच्या संकल्पनेचा आधार अहस्तक्षेप तर सकारात्मक अधिकाराचा आधार हस्तक्षेप असतो. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नागरी हक्क ही संकल्पना नव्याने मांडली गेली (१९५०-१९६०). राजकीय अधिकार व नागरी अधिकार वेगवेगळे मानले जात होते. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत नागरी अधिकारांमध्ये मतदान करणे, सार्वजनिक पद प्राप्त करणे यांचा समावेश केला जात नव्हता. कारण हे विशेष अधिकार होते. ह्या हक्काची मागणी सुरुवातीस अमेरिकन लोकांनी सत्तेसाठी केली. लोकशाही राज्यात समान नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त करणे हा सत्तेच्या संघर्षाचा उद्देश होता. नागरी अधिकारांमध्ये सामान नागरिकत्व तसेच व्यक्तिगत, राजकीय आणि आर्थिक अधिकारांचा समावेश होतो. भेदभाव करुन हे अधिकार नाकारले जाऊ शकत नाहीत. अंतत : नागरी व राजकीय अधिकार असा भेदभाव नाहीसा होऊन लोकशाहीत सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त होऊ लागले.
संदर्भ :
- Rajeev, Bhargava and Acharya, Ashok, Political Theory: An Introducation, Pearson Longman Pvt Ltd, 2008.
- Zalta, Edward N.(Principal Editor), Rights, Stanford Encyclopedia of Philosophy, Substantive revision, Stanford University, 2005 .
- व्होरा, राजेंद्र ; पळशीकर, सुहास, राज्यशास्त्र कोश, दास्ताने प्रकाशन, पुणे.