नाट्यशास्त्रातील नृत्यविषयक संदर्भ : शास्त्रपरंपरेत स्वतंत्र शास्त्र म्हणून समावेश केलेल्या नृत्य ह्या विषयाचे ठोस संदर्भ आपल्याला भरतमुनींचे नाट्यशास्त्र ह्या ग्रंथामध्ये मिळतात. नाट्यशास्त्र हा केवळ नाट्य ह्या विषयावर आधारलेला ग्रंथ नसून ह्यामध्ये संगीत-वाद्य- नृत्य ह्या घटकांचे देखील सविस्तर वर्णन भरतमुनींनी केले आहे. नाट्यशास्त्राच्या ३७ अध्यायांपैकी जवळपास १५ ते १८ अध्यायांमध्ये नृत्याशी निगडित संदर्भ आहेत. रंगदेवता/रंगमंचाचे पूजन ह्यावर आधारित दुसऱ्या अध्यायात रंगमंचाशी निगडित देवतांचे वर्णन येते. कोणत्याही नाटकाच्या किंवा नृत्याच्या प्रयोगारंभी रंगमंचाचे पूजन करण्याची परंपरा आहे, ह्या परंपरेचे आजही पालन केले जाते. आजही नृत्य सादरीकरणापूर्वी रंगमंचाची पूजा करण्यात येते. तसेच नृत्यातून सर्वप्रथम रंगमंचाप्रती आदर आणि देवतांची स्तुती सादर करण्यात येते. ह्याला नृत्याच्या परिभाषेत पुष्पांजली अशी संज्ञा आहे. ह्याच्याशी संबंधित मुद्दे ह्या अध्यायामध्ये आलेले आहेत. चौथा अध्याय तांडवलक्षण नावाने प्रसिद्ध आहे. ह्या अध्यायात तांडव आणि लास्य ह्या शिव-पार्वतीच्या नृत्याची लक्षणे सांगितलेली आहेत. शास्त्रीय नृत्यातील विशिष्ट हालाचालींना ‘करण’ म्हणतात ह्यांचा उल्लेख ह्या अध्यायात येतो. एकूण १०८ करण भरतमुनींनी स्पष्ट केलेली आहेत. आजही ह्या करणांचा वापर नृत्याच्या सादरीकरणामध्ये विशेषतः भरतनाट्यम् नृत्यप्रकारात केला जातो. ह्या करणांची शिल्पे देखील काही मंदिरावर कोरण्यात आलेली आहेत, तामिळनाडूतील बृहदीश्वर मंदिर ह्या कारणासाठी प्रसिद्ध आहे.

सहावा अध्याय रसाध्याय आहे. ह्या अध्यायात साहित्यातील अष्टरस आणि त्यांच्या स्थायीभावांचे वर्णन आहे, रस ह्या संकल्पनेचा नृत्य-नाट्य-संगीत ह्यांच्या सादरीकरणामध्ये वापर केला जातो. अनेक नृत्यरचना ह्या रसांवर आधारित असल्याचे दिसते. संस्कृत साहित्यातील रचना नृत्यातून सादर करताना रचनेच्या मुख्य रसाच्या अनुषंगाने नृत्य सादरीकरणाचा विचार केलेला दिसून येतो. नृत्याच्या सादरीकरणामध्ये अभिनयाचे विशेष महत्त्व आहे. अभिनय हा आंगिक-वाचिक-आहार्य-सात्त्विक या चार प्रकारचा सांगण्यात आलेला आहे. नाट्यशास्त्राच्या सातव्या अध्यायात भाव ह्या संकल्पनेविषयी तर आठव्या अध्यायात रसाचे विश्लेषण आहे. नवव्या अध्यायात नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या हस्तमुद्रांचा उल्लेख येतो. हस्ताभिनय अध्यायात असंयुत-संयुत हस्त आणि त्यांचे विनियोग ह्यांविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ह्या माहितीचा वापर आजही नृत्य सादरीकरणामध्ये दिसून येतो. नृत्यात वाचिक अभिनयाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात येतो, तर हस्तमुद्रा हा नृत्याचा अविभाज्य घटक आहे. दहाव्या अध्यायात शारीराभिनय म्हणजेच शारीरिक अवयवांचा विनियोग ह्याबद्दल स्पष्टीकरण केले आहे. ह्याचा वापर नाट्य तसेच नृत्यात देखील केला जातो. अकराव्या अध्यायामध्ये चारी म्हणजे पायांच्या विविध हालचालींबद्दल माहिती दिलेली आहे. मंडलविकल्पनम् ह्या अध्यायात गतिप्रचार ह्या संकल्पने अंतर्गत पात्रांचा रंगमंचावर प्रवेश, तसेच प्रत्येक रसातील गती ह्याबद्दल विचार मांडलेले आहेत, ह्याचा वापर नाट्याइतकाच नृत्यातही केला जातो.

अठरावा अध्याय हा चतुर्विध अभिनयातील आहार्य अभिनयावर आधारित आहे. आहार्य अभिनयाला नाट्याच्या इतकेच नृत्यात देखील महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या नृत्यनाटिकेच्या सादरीकरणात त्यात समाविष्ट असलेल्या पात्रांचा विचार करुन त्यानुसार वेशभूषा केली जाते. एकोणीसाव्या अध्यायात नायक आणि नायिका ह्यांचे भेद सांगितले आहेत. ह्यामध्येच नृत्यात वापरल्या जाणाऱ्या अष्टनायिकांचा देखील उल्लेख येतो. विसाव्या अध्यायांमध्ये वाद्यांविषयी सांगण्यात आले आहे आणि त्यानंतरचा अध्याय हा तालाध्याय ह्या नावाने प्रसिद्ध आहे. हयामध्ये नृत्य आणि नाट्य ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तालाविषयी माहिती भरतमुनींनी दिली आहे. ह्यातील अनेक संकल्पनांचा वापर आजही नृत्यसादरीकरणामध्ये केला जातो.

संदर्भ :

  • शर्मा, पंडित बटुकनाथ, नाट्यशास्त्रम्,  बनारस, १९८५.

समीक्षक : सुनीला गोंधळेकर