ओकागामी : अभिजात जपानी कथाग्रंथ. इ.स.१११९ च्या सुमारास हेइआन कालखंडामध्ये हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथाच्या लेखकाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. ह्या ग्रंथामध्ये लेखकाने लिहीलेल्या माहितीवरून फुजिवारा नो मिचिनागा ह्या उच्चकुलीन सरदाराच्या कर्तुत्वाने तो लेखक भारावून गेला होता हे जाणवते. मिचिनागा दूरदृष्टी असलेला कुशल राजकारणी होता. त्याची गोष्ट या ग्रंथात आली आहे. ह्या ग्रंथामध्ये फुजिवारा कुटुंबाचा सुवर्णकाळ मानला जाणार्या इ.स.८५० ते १०२५ ह्या काळाचे वर्णन केले आहे. ह्यामध्ये जुन्या चिनी ऐतिहासिक ग्रंथांप्रमाणे प्रस्तावना, सम्राटाच्या गोष्टी, मंत्र्यांच्या गोष्टी आणि इतर गोष्टी आहेत. ह्या ऐतिहासिक ग्रंथाची रचना बाकीच्या ग्रंथांपेक्षा वेगळी आहे. यामध्ये १९० वर्षांचा ओयाके नो योत्सुगी भूतकाळ आठवत असतो. १८० वर्षाचा नात्सुयामा नो शिगेकी स्वत:ची मते सांगत असतो. एक तरुण सामुराइ योद्धा ह्या दोघांना प्रश्न विचारात असतो. त्या प्रश्नांच्या उत्तरामधून गोष्ट उलगडत जाते. अशा रचनेमुळे इतिहासातील ठळक घटना, त्यांच्याबद्दलची मते आणि टीका हे नैसर्गिक पद्धतीने कथेमध्ये येते. एखाद्या परीकथेमध्ये १९० अथवा १८० वर्षांचे पात्र आले तर त्याबद्दल काही वाटत नाही; परंतु ऐतिहासिक ग्रंथामध्ये अशी पात्रे आल्याने त्याच्या खरेपणाबद्दल शंका व्यक्त केली जाते. ओयाके नो योत्सुगी म्हणतो की त्याने १३ सम्राटांना बघितले आहे. ह्या सर्व काळामध्ये फुजिवारा नो मिचिनागा सारखा दुसरा चतुर आणि कुशल कार्यकारी मी पाहिला नाही. इथे वाचकाला कळते की आता ऐतिहासिक प्रसंगांमधून मिचिनागाचे कर्तुत्व सांगितले जाणार आहे.
हेइआन कालखंडामध्ये फुजिवारा कुटुंब हे अतिशय महत्वाचे सरदार घराणे मानले जात होते. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आणि जमिनी होत्या. फुजिवारांच्यामुळे क्योतोच्या राजघराण्याला शोभा आली असे म्हटले जाते. मिचिनागा हा फुजिवारा नो कानेइएचा मुलगा. त्याने फुजिवारा कुटुंबाची ताकद संघटीत केली. त्याचे भाऊ मिचिताका आणि मिचिकाने हे लवकर मृत्यू पावल्याने सर्व ताकद मिचिनागाच्या हातात आली. त्याने आपल्या पुतण्यांना हद्दपार केले. स्वतःच्या मुलींचे सम्राटांशी विवाह करून दिले. त्याच्या मुली सुंदर आणि कुशल होत्या. हेइआन दरबारामध्ये पहिल्यांदाच सम्राज्ञी कोगु आणि सम्राज्ञीच्या खालचे पद च्युगु अशी दोन पदे निर्माण केली गेली. स्वत:च्या मुलीला सम्राज्ञी हे पद देऊ करून स्वत:च्या पुतणीची पदानवती करून तिला सम्राज्ञीच्या पदावरून खालच्या पदावर आणली. नंतर त्याच्या मुलीचा मुलगा सम्राट झाल्यावर नातवाचे वय लहान असल्याने त्याच्या वतीने राज्यकारभार केला.
ह्या पुस्तकाचा अनुवाद इंग्रजीमध्ये The Great Mirror ह्या नावाने झाला आहे. ग्रंथाच्या शीर्षकामध्ये कागामी (mirror) हा शब्द असलेले अजून ३ ग्रंथ आहेत. ओकगामी आणि ते तीन ग्रंथ मिळून चार आरसे (Four Mirrors) असे म्हटले जाते.
संदर्भ :
समीक्षक : निसिम बेडेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.