महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ला. तो चिपळूण तालुक्यामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे. चिपळूण शहर वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेले असून समुद्रातून येणारा व्यापारीमार्ग वाशिष्ठी नदीच्या दाभोळ खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणून महत्त्व होते. या व्यापारी मार्गावर अंकुश ठेवण्यासाठी खाडीच्या अंतर्भागात चिपळूणचा ‘गोवळकोट’ हा किल्ला बांधला गेला.

गोवळकोट किल्ला चिपळूणपासून ४ किमी. अंतरावर गोवळकोट गावामध्ये एका छोट्या टेकडीवर असून गडाची पायथ्यापासून उंची फक्त ६० मी. आहे. गडावर कोणत्याही ऋतुमध्ये जाता येते. मध्ययुगीन कालखंडात किल्ला सर्व बाजूने पाण्याने वेढलेला होता. किल्ल्याच्या सर्व बाजूने बोटी फिरू शकत होत्या, असा उल्लेख पेशवे दप्तर खंड ३३ मध्ये आहे. येथील करंजेश्वरी देवीचे मंदिर किल्ल्याच्या आग्नेयेला असून पटवर्धन आणि राजवाडे आडनावाच्या लोकांची ती कुलदेवता आहे. सध्या गडावर जाण्याचा मार्ग करंजेश्वरी मंदिराशेजारून गडाच्या पूर्वेकडील तटबंदीपर्यंत जातो.
गड पूर्व-पश्चिम पसरलेला असून, गडाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख आहे. या दरवाजातून पायऱ्यांच्या मार्गे गोवळकोट बंदरापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. या दरवाजाची कमान दिसत नाही; तथापि शेजारील दोन भक्कम बुरूज आणि कमान पेलणारे दगडाचे खांब तेथे दरवाजा असल्याचे दर्शवितात. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूंस पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या खोल्यांचे अवशेष आहेत. पूर्वेकडील तटबंदीमधून एका उद्ध्वस्त दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. या दरवाजाच्या अवशेषांत अडसराची जागा आणि आतील दोन्ही बाजूंस पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या खोल्यांचे अवशेष दिसतात. दरवाजाच्या दोन्ही बाजूंस कोपऱ्यावर दोन मोठे बुरूज असून त्यावर भल्या मोठ्या आकाराच्या तोफा आहेत. यांपैकी तीन तोफा ओतीव पद्धतीच्या असून एक तोफ बांगडी पद्धतीने तयार केलेली आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. गडावर ‘रेडजाई देवीचे’ मंदिर असून येथे दरवर्षी होळीच्या दिवशी करंजेश्वरीची पालखी आणली जाते. मंदिरासमोरच एक कोरडा तलाव असून शेजारील तटावर एक छोटी तोफ दिसते. आज संपूर्ण गडावर अनेक बांधकामांची जोती दिसतात. पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठे बांधीव टाके आहे. पण सध्या या टाक्यात पाणी साठत नाही. या टाक्याजवळच्या तटबंदीशेजारी चुन्याचा घाणा आहे. गडाची उत्तरेची व पश्चिमेची तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे. पाण्याच्या टाक्याजवळ ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ आणि ‘करंजेश्वरी देवस्थान ट्रस्ट’ यांच्या प्रयत्नातून गोवळकोट बंदरावरून काढलेल्या सहा तोफा संवर्धन करून ठेवलेल्या बघायला मिळतात. या तोफा बोटी बांधण्यासाठी गोवळकोट बंदरावर गेली सु. १५०—२०० वर्षे उलट्या करून मातीमध्ये गाडलेल्या होत्या. किल्ला ज्या टेकडीवर बांधलेला आहे, या संपूर्ण टेकडीच्या पायथ्याला सर्व बाजूने तटबंदी होती. ऐतिहासिक कागदपत्रांमधे या किल्ल्याचे ‘बालाकोट’ म्हणजे ‘बालेकिल्ला’ व ‘केलाकोट’ म्हणजे ‘खालचा किल्ला’ असे दोन भाग असल्याचे दिसते. गाडी रस्त्याने करंजेश्वरी देवस्थानाकडे जाताना एका बुरुजाचे अवशेष दिसतात. गावातून पूर्वेकडून किल्ल्यावर जाताना वाटेत पाण्याच्या टाकीजवळ दोन बुरुजांचे अवशेष दिसतात.

बहमनी साम्राज्याच्या काळात हा प्रदेश विजयनगर साम्राज्याच्या अंमलाखाली होता. बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता. गोवळकोट नक्की कोणी बांधला, याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रांत मिळत नसली, तरी किल्ला बहुतेक आदिलशाही काळात ‘अंजनवेल’ बरोबरच बांधला गेला असावा. छ. शिवाजी महाराजांनी १६६० ते १६७० मध्ये ‘चिपळूणचा कोट’ बांधल्यानंतर या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचे तत्कालीन कागदपत्रांत, तसेच रत्नागिरीच्या दर्शनिकेत (गॅझेट) उल्लेख सापडतात. हा प्रदेश १६९८ मध्ये सिद्दीच्या ताब्यात गेला. सिद्दीकडून हा परिसर जिंकून घेण्यासाठी मराठ्यांकडून खूप प्रयत्न झाले (१७३०-३३). छ. शाहू महाराजांनी चिमाजी आप्पा यांना कोकण मोहिमेवर जाण्यासाठी अनेक आज्ञापत्रे पाठवली; पण ते गेले नाहीत. यावर चिडून महाराजांनी, “तुम्ही जर मदतीस गेला नाहीत, तर मी स्वतः मोहिमेवर जाईन” असे खरमरीत पत्र चिमाजी आप्पा यांना पाठवले. पुढे १७३३ च्या मे महिन्यात स्वतः बाजीराव पेशवे व फत्तेसिंग भोसले कोकणात उतरले.

ऑक्टोबर १७३३ च्या एका पत्रात येथे झालेल्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते. या हल्ल्यात किल्ला मराठ्यांना जिंकता आला नाही. १७३४ मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदारांनी गोवळकोटवर हल्ला केला, या हल्ल्यात मराठ्यांच्या तुकडीला माघार घ्यावी लागली, यात सिद्दीची पंधरा-वीस माणसे मारली गेली, तर पंचवीस-तीस जखमी झाली. खाडीत झालेल्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. सिद्दीचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक मारले गेले. यावेळी सिद्दीबरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला.
जानेवारी १७४४ मध्ये गोवाळकोटवर सिद्दी याकूत याचा अंमल होता. आंग्रेंच्या सैन्याने किल्ल्यावर हल्ला केला असता सिद्दीच्या लोकांनी तोफा व बंदुकांचा मारा सुरू केला. पुढे किल्ला जानेवारी १७४५ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. या नंतरच्या १७४८ च्या ऐतिहासिक कागदपत्रांत ‘गोविंदगड’ नावाचा उल्लेख वाचायला मिळतो. १७५५ मध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. १८१६ ते १८१९ या काळात मराठ्यांचे सर्व किल्ले इंग्रजांनी जिंकून घेतले. मे १८१८ मध्ये इंग्रजांतर्फे कर्नल केनेडी याने गोवळकोट किल्ला ताब्यात घेतला. सन १८६२ साली किल्ल्यावर २२ तोफा असल्याची नोंद इंग्रजांच्या कागदपत्रांत मिळते. पुढे भारताच्या स्वातंत्र्याबरोबर हा किल्ला स्वतंत्र भारतात सामील झाला.
संदर्भ :
- जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव, पुणे, २०१३.
- पोतदार, द. वा. ‘अंजनवेलची वहिवाट’, भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक, पुणे. १९१३.
- रत्नागिरी आणि सावंतवाडी गॅझेटिअर, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबई, १८८०.
समीक्षक : जयकुमार पाठक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.