फाहियान : (इ.स. ३३७ ? – ४२२ ?). एक चिनी प्रवासी. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध धर्म गांधार ते मध्य आशियामार्गे चीन व इतर अति पूर्वेकडील देशांमध्ये पोहोचला. त्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करणे व बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांना भेट देणे यासाठी अनेक चिनी यात्रेकरू भारतात आले. या परंपरेमधील फाहियान हा पहिला व बहुधा सर्वांत वृद्ध यात्रेकरू होता. त्याच्या प्रवासाची सुरुवात चीनमधील चांगान या शहरापासून सुरू होऊन प्रसिद्ध ‘रेशीम मार्गाने’ तो पाकिस्तान-भारत-श्रीलंका-इंडोनेशिया या मार्गाने चीनमध्ये परतला. त्याचा संपूर्ण प्रवास अतिशय कठीण व खडतर असून बहुतेक प्रवास त्याने पायी चालत केला. त्याच्या प्रवास वृत्तांताचे नाव सी यु कि (पश्चिमेकडच्या राज्यातील बौद्ध धर्माच्या नोंदी) आहे.
फाहियानचा जन्म उत्तर चीनमधील शान्सी प्रांतातील लिनफन (जुने नाव वूयांग) शहरात झाला. त्याचे आडनाव कुंग होते. त्याला तीन मोठे भाऊ होते; तथापि त्यांचे लहान वयातच निधन झाले होते. फाहियानला लहानपणीच त्याच्या वडिलांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. चीनमध्ये त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास केला. पुढे या धर्मातील नियम व मार्गदर्शक तत्त्वांचा (विनय) अभ्यास करणे व बौद्ध धर्मांच्या पवित्र स्थळांना भेट देणे, या हेतूने त्याने भारतात येण्याचा निश्चय केला.
फाहियान इ. स. ३९९ मध्ये इतर पाच भिख्खूंबरोबर भारतात येण्यास निघाला; तथापि त्यांपैकी काही जण मृत्युमुखी पडले, तर काही वाटेतच थांबले. त्यामुळे संपूर्ण प्रवास फाहियानने एकट्याने केला. गोबीचे वाळवंट ओलांडून तो खोतान व काशगर येथे आला. या दोन्ही ठिकाणचे धार्मिक जीवन त्याने आपल्या प्रवास वृत्तांतात तपशिलात दिले आहे. येथील बौद्ध मठ व फाहियान या ठिकाणी असताना साजरे झालेले बौद्ध सण यांचेही वर्णन त्याने केले आहे. काशगर येथे भरलेल्या धार्मिक परिषदेतही त्याने सहभाग घेतला. खोतान व काशगर नंतर सिंधु नदी पार करून तो उद्यान-गांधार-तक्षशिला मार्गे पेशावरला पोहोचला. पेशावरला त्याने कुषाण सम्राट कनिष्कने बांधलेला भव्य चैत्य पाहिल्याचा उल्लेख केला आहे. नंतर तो मथुरेला गेला. मथुरा त्या काळी भरभराटीला आलेले बौद्ध धर्माचे केंद्र होते. मथुरेहून फाहियान गुप्त साम्राज्याचे केंद्र असणाऱ्या मध्य भारतात आला. त्यावेळी चंद्रगुप्त दुसरा याची कारकिर्द सुरू होती. फाहियानने तेथील राजाचा उल्लेख केला नसला, तरी राज्यातील शांतता, सुराज्य, धार्मिक स्थिती, लोककल्याणकारी व्यवस्था यांचे वर्णन केले आहे.
येथून त्याने मगध परिसरातील काही ठिकाणांना म्हणजे सांकश्य, कान्यकुब्ज (कनौज), अयोध्या, श्रावस्ती, कपिलवस्तू, वैशाली, कुशीनगर, सारनाथ, पाटलिपुत्र या स्थानांना भेट दिली व बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. मगध परिसरातील आचरण्यात येणाऱ्या बौद्ध रूढी व परंपरांचे तपशील फाहियानने आपल्या प्रवास वृत्तांतात दिले आहेत. या प्रवासात पाहिलेले स्तूप, विहार, सम्राट अशोकाने बांधलेला स्तंभ यांचेही उल्लेख त्याने केले आहेत. तेथून नालंदा, राजगृह, गया या ठिकाणांना भेट देऊन तो ताम्रलिप्तीला गेला. ताम्रलिप्तीला फाहियानचा भारतातील शेवटचा मुक्काम होता. भारतात त्याने १० वर्षांचा कालावधी घालवला. त्यांपैकी काही काळ त्याने संस्कृत किंवा पाली भाषा शिकण्यासाठी तसेच बौद्ध धर्माच्या ग्रंथांच्या प्रती करण्यामध्ये व्यतीत केला.
ताम्रलिप्तीहून व्यापारी जहाजाने फाहियान श्रीलंकेला (इ. स. ४०९) पोहोचला. श्रीलंकेत त्या काळी अभयगिरी व महागिरी हे महत्त्वाचे विहार होते. त्यातील अभयगिरी विहारात फाहियानचा मुक्काम होता. फाहियान श्रीलंकेला जाण्याच्या काही वर्षे आधी गौतम बुद्धांच्या दातांचे अवशेष श्रीलंकेला आणण्यात आले होते. राजप्रासादात ठेवण्यात आलेले हे अवशेष दरवर्षी अभयगिरी विहारात आणले जात व त्या वेळी मोठा उत्सव होत असे. फाहियान त्याच्या श्रीलंकेतील मुक्कामात या उत्सवात सहभागी झाला होता. फाहियानने आपल्या प्रवासवृत्तांतात या उत्सवाचे तसेच श्रीलंकेतील बौद्ध धर्माचे चित्र रंगवले आहे.
श्रीलंकेहून फाहियान एका व्यापारी जहाजाने जावा येथे गेला. जावामध्ये त्याचा पाच महिने मुक्काम होता (इ. स. ४१४). या काळात जावामध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव कमी होत असल्याचे निरीक्षण फाहियानने नोंदविले आहे. जावाहून दुसऱ्या एका व्यापारी जहाजाने शेवटी तो चीनला परत गेला.
फाहियान भारतातून ११ ग्रंथ व काही बौद्ध प्रतिमा घेऊन चीनला परतला होता. चीनला परतल्यानंतरचा काळ फाहियानने भारतीय भिख्खू बुद्धभद्र याच्या साहाय्याने भारतातून नेलेल्या काही ग्रंथांचा चिनी भाषेत भाषांतर करण्यामध्ये व्यतीत केला. त्याने भाषांतरित केलेल्या ग्रंथांमध्ये महापरिनिर्वाण सूत्र आणि बौद्ध धर्माचे नियम व मार्गदर्शक तत्त्व हे ग्रंथ (विनय) विशेष महत्त्वाचे आहेत.
फाहियानच्या प्रवास वृत्तांतातील नोंदी तत्कालीन ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाच्या ठरतात. तत्कालीन राजकीय परिस्थितीवर त्याने मौन पाळले असले तरी आशियाई राज्ये, त्यांचा इतिहास, भूगोल, स्वाभाविक रचना, आदी बाबींवर तो प्रकाश टाकतो. विशेषतः तत्कालीन बौद्ध धर्माचे स्वरूप व व्याप्ती समजण्यासाठी त्याचा ग्रंथ बहुमूल्य ठरतो. काही ठिकाणचे चमत्कृतीपूर्ण वर्णन सोडले तर अनेक बौद्ध स्तूप, चैत्य, विहार यांविषयी त्याने दिलेली माहिती महत्त्वाची व उपयुक्त आहे.
संदर्भ :
- Bapat, P. V. Ed., 2500 Years of Buddhism, Publication Division, Ministry of Information and Broadcasting, Government of India, New Delhi, 1956 (Reprint, 1971).
- Giles, H. A. Trans., The Travels of Fa-hien (399-414 A.D.), Cambridge, 2012
- Heera, Bhupendra, Impact of Buddhism on Socio- Religious Life of the Asian People, New Delhi, 2007.
- Legge, James, Trans., A Record of Buddhistic kingdoms, Oxford, 1886.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर