मंजिष्ठ ही वनस्पती रुबिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुबिया कॉर्डिफोलिया आहे. कॉफी वनस्पतीही रुबिएसी कुलातील आहे. मंजिष्ठ ही बहुवर्षायू वेल सर्व उष्ण प्रदेशांत वाढणारी असून भारतात ती दाट वनांत वाढलेली आढळते. तिचा प्रसार जपान, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्य आफ्रिका येथेही झालेला आहे.
मंजिष्ठाची वेल किंवा झुडूप सु. १० मी. उंच वाढते. खोड व फांद्या काटेरी, चतुष्कोनी, खोबणीदार व पांढरट सालीचे असतात. खोडाच्या प्रत्येक पेरावर चार पाने असतात. त्यांपैकी समोरासमोरील दोन पाने मोठी, तर पानांची दुसरी जोडी लहान असते. पाने हृदयाकृती अथवा भाल्यासारखी, लांब देठांची, ठळक शिरा असलेली व खरबरीत असतात. फुले फांद्यांच्या टोकाला फुलोऱ्यात येत असून ती लहान, पांढरट किंवा हिरवट; तर कधी लाल व पिवळ्या छटा असलेली असतात. मृदुफळे जांभळी किंवा गडद काळी, गोलसर, मांसल आणि द्विबीजी असतात.
मंजिष्ठ ही औषधी वनस्पती आयुर्वेदात महत्त्वाची मानली जाते. तिच्या मुळ्या कफनाशक असून नेत्ररोग, मूत्रविकार व विषबाधा यांवर गुणकारी असतात. तिच्या मुळांपासून लाल रंग मिळतो. हा रंग ॲलिझरीन या कार्बनी रंगद्रव्यामुळे येतो. सूत, लोकर, गालिचे व घोंगड्या रंगविण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधने, दंतमंजन इत्यादींमध्येही हा लाल रंग वापरतात. रुबिया प्रजातीतील रुबिया टिंक्टोरम या वनस्पतीपासून असाच लाल रंग मिळवितात. एकोणिसाव्या शतकापर्यंत या लाल रंगाचे व्यापारी स्तरावर उत्पादन भारतात घेतले जात असे. १८६८ मध्ये अँथ्रॅसीन या कार्बनी संयुगापासून ॲलिझरीन प्रयोगशाळेत तयार करता येते, हे समजले. तेव्हापासून हा रंग रसायनांपासून तयार करण्यात येत आहे.