अधिहर्षतेची कारके

एखादा बाह्य पदार्थ शरीरात गेला असता एरव्ही न होणारी विशिष्ट प्रतिक्रिया होणे म्हणजे अधिहर्षता. अशी विपरीत प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या प्रवृत्तीलाही अधिहर्षता असे म्हणतात. ज्या बाह्य पदार्थामुळे अधिहर्षता होते त्यास ‘अधिहर्षताकारी’ किंवा सामान्य भाषेत ‘वावडा’ पदार्थ म्हणतात. सामान्यपणे हे वावडे पदार्थ खालीलप्रमाणे आहेत.

अन्नातील पदार्थ : अंडी, दूध, शेंगदाणे, मासे, विशेषत: कवचधारी प्राणी ( कोळंबी) इत्यादी. औषधे : पेनिसिलिन, अ‍ॅस्पिरीन, काही जीवनसत्त्वे लस : विषमज्वर, धनुर्वात इत्यादींची लस.  विष : मधमाशी, भुंगा, साप, विंचू इत्यादी. इतर: सौंदर्यंप्रसाधने, फुलातील परागकण, विशिष्ट रसायने, सूर्यप्रकाश इत्यादी.

सर्वसाधारणपणे पाळीव प्राण्यांचे केस, परागकण, कवके आणि गालिच्य़ामधील व धुळीमधील ‘माइट’ कुलातील संधिपाद प्राणी आणि काही औषधे यांमुळे अधिहर्षता होऊ शकते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कधीही व कुठल्याही पदार्थाची अधिहर्षता होऊ शकते. याची लक्षणेही निरनिराळी असतात. एका व्यक्तीत ही सर्व लक्षणे दिसतात असे नाही, तर यापैकी काही लक्षणे दिसतात.

अधिहर्षतेची सामान्य लक्षणे 

बाधित अवयव   लक्षणे
नाक आतील भागाला सूज येणे.
डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे.
श्वसनमार्ग शिंका, खोकला, आवाजातील घरघर, दम्याचा झटका
कान दडे बसणे, दुखणे, कमी ऐकू येणे.
त्वचा पुरळ, झसब, खाज.
अन्ननलिका मार्ग पोटात दुखणे, ओकारी, अतिसार.

        

अधिहर्षताकारी पदार्थ शरीराच्या संपर्कात आला असता रक्तातील एक प्रकारच्या पांढर्‍या पेशींपासून त्याच्याविरुद्ध प्रतिपिंडे निर्माण होऊ लागतात. प्रथम संपर्कात अधिहर्षतेची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, पण प्रतिपिंड निर्माण होतात. नंतरच्या संपर्कात अधिहर्षताकारी पदार्थाचा प्रतिपिंड असलेल्या पेशींबरोबर संयोग होतो व त्या फुटतात. त्यामुळे पेशींमधील हिस्टामिने रक्तात उतरतात व अधिहर्षता निर्माण होते.

अधिहर्षतेचे सामान्यपणे चार प्रकार आहेत. त्यांतील अत्याधिहर्षता ही तीव्र असते.  उदा., माशी चावल्यावर वा पेनिसिलिनाचे अंत:क्षेपण केल्यावर अधिहर्षता  पटकन येते, पेनिसिलिनच्या अंत:क्षेपणात कधीकधी उपाय करण्याच्या आत व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते. यात शरीराच्या सर्व पेशींत एकाच वेळी तीव्र अधिहर्षता येते. अशा वेळी ताबडतोब अ‍ॅड्रेनॅलिनाचे अंत:क्षेपण दिल्यास फायदा होण्याची शक्यता असते.

अधिहर्षतेचे अन्य तीन प्रकार अत्याधिहर्षतेएवढे तीव्र नसतात. यांपैकी एका पेशीविषारी प्रकारात पेशींवर परिणाम होतो. दुसर्‍या प्रतिरोधक प्रकारात केवळ अधिहर्षताकारी पदार्थांचा प्रतिरोध करणारी प्रतिपिंडे तयार होतात. शेवटच्या तिसर्‍या पेशीजन्य प्रकारात प्रतिपिंडे तयार होत नाहीत. मात्र या प्रकारात टी-लसिका पेशी उत्तेजित होतात व त्यांच्याद्वारा महाभक्षी प्रकारच्या पांढर्‍या पेशींच्या कार्याला चालना मिळते. वावड्या पदार्थांशी संपर्क आल्यानंतर १२ ते ७२ तासांनी ही क्रिया घडते.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा