ट्रोजन लघुग्रह समूह :
मंगळ आणि गुरूच्या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा मुख्य पट्टा आहे. लघुग्रहांच्या या मुख्य पट्ट्यात नसणारे काही लघुग्रह ‘ट्रोजन’ म्हणून ओळखले जातात. ग्रहमालिकेतील काही खास जागी असणाऱ्या वस्तूंसाठी हा गट केलेला आहे. सूर्य आणि कोणत्याही ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे अवकाशात अशा काही जागा निर्माण होतात, की ज्या जागी या दोन्ही वस्तूंचे गुरुत्वीय बल समान खेच, समान आकर्षण निर्माण करते. या जागांवर जर कोणती तिसरी लहान वस्तू आली, तर ती तिथे जणू जखडल्यासारखी पकडून ठेवली जाते. या गुरुत्वीय खेचीमुळे दोन्ही मोठ्या वस्तूंच्या संदर्भात समान अंतरावर (उदाहरणार्थ, परिभ्रमण कक्षेत त्रिज्येएवढ्याच अंतरावर, म्हणजे मोठ्या वस्तूपासून ६० अंशांवर किंवा दोन्ही वस्तूंच्या गुरुत्वीय माध्यांतरांवर) ती वस्तू जखडल्यासारखी टिकून राहते. या जागांना ‘लॅग्रेंजियन बिंदू’ (Lagrangian point) असे म्हणतात. कोणत्याही दोन वस्तूंसंदर्भात अवकाशात अशा ५ जागा असतात, जेथे या दोन्ही वस्तूंचे गुरुत्वाकर्षण समान असते. इ.स. १७७२ मध्ये जोसेफ लुईस लॅग्रँज (Joseph Louis Lagrange) याने गुरू आणि सूर्य यांच्या बाबतीत त्यांच्याशी बरोबर ६० अंशाच्या कोनात, गुरूच्याच कक्षेमध्ये पुढे आणि मागे काही लघुग्रहांचा समूह असल्याची संकल्पना मांडली होती. गुरूच्या कक्षेतील लॅग्रेंजियन बिंदू ४ आणि लॅग्रेंजियन बिंदू ५ असे ज्या जागांना म्हणतात, या जागी हा ट्रोजन लघुग्रहांचा समूह आहे. अवकाशात फिरणाऱ्या कोणत्याही दोन वस्तूंच्या बाबतीत अशा एकूण पाच लॅग्रेंजियन जागा असतात. गुरूच्या कक्षेत गुरूच्या पुढे आणि मागे ठराविक अंतर राखून, सूर्याभोवती हे लघुग्रहांचे मुख्यत: दोन समूह फिरत आहेत. गुरूच्या कक्षेत पुढे असणाऱ्या समूहाला ‘ग्रीक-छावणी’ (Greek Camp) तर गुरूच्या मागे फिरणाऱ्या समूहाला ‘ट्रोजन-छावणी’ (Trojan Camp) असे म्हणतात. गुरूच्या कक्षेतच परंतु सूर्याच्या पलीकडे असणाऱ्या ‘लॅग्रेंजियन-३’ या जागीही काही लघुग्रह आढळून आले आहेत. त्यांना ‘हिल्डाज्’ (Hildas) असे म्हणतात. परंतु बिंदू १ आणि बिंदू २ या जागांवर असे ट्रोजन आढळलेले नाहीत. या जागी इतर ग्रहांच्या, विशेषत: शनीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने या वस्तूंच्या कक्षा ढळल्या असाव्यात. त्यामुळे त्यांच्या जागाच बदलल्या असाव्यात. शिवाय, ट्रोजन लघुग्रहांच्या दोन्ही छावण्यांमधील काही वस्तूंच्या कक्षाही गुरूच्या कक्षेशी सुमारे ४० अंशाने कलत्या आहेत. त्याचे कारणही इतर ग्रहांचा गुरुत्वीय प्रभाव हे असावे. हे सारे ट्रोजन लघुग्रह ४ आणि ५ या मूळ लॅग्रेंजियन बिंदूपासून त्याच्या आसपास, गुरूच्याच कक्षेत पुढे-मागे सुमारे ७० अंशात विखुरले गेलेले आहेत. या भाकीत केलेल्या लघुग्रहांपैकी पहिला ‘५८८ अचिल्स’ हा लघुग्रह जर्मन निरीक्षक मॅक्स वूल्फला (Max Wolf) इ.स.१९०६ मध्ये सापडला. त्यानंतर यातले इतर लघुग्रह मिळत गेले.
ग्रीकांच्या ट्रॉयबरोबर झालेल्या प्राचीन युद्धकथेच्या ‘होमर’च्या ‘इलियड’ या महाकाव्यामधून या युद्धकथेतील पात्रांची नावे या समूहातील लघुग्रहांसाठी योजण्याची, निवडण्याची प्रथा आहे.
जानेवारी २०२० पर्यंत गुरूच्या कक्षेतील एकूण ८,१९० ट्रोजन लघुग्रहांची माहिती ज्ञात झालेली आहे. हे लघुग्रह साधारणत: १५ किलोमीटरपेक्षा आकाराने मोठे आहेत. त्यातला सर्वात मोठा ‘६२४ हेक्टर’ हा सुमारे २०३ किलोमीटर आकाराचा (सरासरी व्यासाचा) आहे. ग्रीक छावणीत सुमारे ६,३०० ( ± १,०००) तर ट्रोजन छावणीत सुमारे ३,४०० (±५००) लघुग्रह २ किलोमीटरहून मोठ्या आकाराचे (सरासरी व्यासाचे) आहेत, असे सध्याचे अनुमान आहे. परंतु, एकूणच १ किलोमीटर आकाराचे, सुमारे दहा लाखाहून अधिक लघुग्रह गुरूच्या या ‘ट्रोजन’ प्रकारात असावेत, असा एक प्राथमिक अंदाज आहे.
ग्रहांच्या कक्षेत असे पुढे मागे चालणारे ‘ट्रोजन’ इतरही काही ग्रहांना आहेत. त्यांना लघुग्रह नाही, तर मंगळाचे ट्रोजन, नेपच्यूनचे ट्रोजन असेच ओळखले जाते. मंगळाला नऊ (यातले पाच पुनर्निरीक्षणातून नक्की झाले आहेत, तर चौघांच्या कक्षांची निश्चिती अजून व्हायची आहे, म्हणून त्यांना यादीत अजून सामील केले गेलेले नाही) ट्रोजन आहेत, तर नेपच्यूनला २८ ट्रोजन आहेत. युरेनसचे दोन ट्रोजन सापडले आहेत, असे आधी वाटले होते, परंतु, त्यातला एकच निश्चित झाला आहे, तर दुसरा हरवला आहे. पृथ्वीचाही एक ट्रोजन ‘२०१० टीके ७’ हा सापडलेला आहे. शनीला अजून कोणताही ट्रोजन सापडलेला नाही. परंतु, त्याचे उपग्रह टिथिस आणि डायोन यांना ट्रोजन (टिथिसचे समकक्ष ‘टेलेस्टो’ आणि ‘कॅलिप्सो’, तर डायोनचे समकक्ष ‘हेलेन’ आणि ‘पॉलीड्यूसेस’) आहेत असे दिसून आले आहे. लघुग्रहाच्या मुख्य पट्ट्यातल्या सेरेस आणि व्हेस्टा यांनाही एक एक ट्रोजन आहे असे दिसून आले आहे, परंतु कदाचित त्यांच्या या तात्पुरत्या कक्षा असाव्यात.
गुरूचे १०० किमीहून मोठे असलेले काही ट्रोजन:
नाव | सरासरी व्यास |
६२४ हेक्टर | २२५ किलोमीटर |
६१७ पेट्रोक्लस | १४० किलोमीटर |
९११ अगामेमनॉन | १३१ किलोमीटर |
५८८ अचिल्स | १३० किलोमीटर |
३४५१ मेन्टॉर | १२६ किलोमीटर |
३३१७ पॅरिस | ११९ किलोमीटर |
१८६७ डेइफोबस | ११८ किलोमीटर |
११७२ एनिअस | ११८ किलोमीटर |
१४३७ डायमेडेस | ११८ किलोमीटर |
११४३ ओडिस्स्युस | ११५ किलोमीटर |
संदर्भ:
- ‘लघुग्रह’ नोंद, मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती.
- https://minorplanetcenter.net/iau/TheIndex.html
- https://minorplanetcenter.net/iau/lists/Trojans.html
समीक्षक : आनंद घैसास