अश्मीभूत लाकूड जीवाश्म (Petrified wood fossil) यामध्ये जीवाश्माचा आकार, आकारमान व रचना ही थेट मूळच्या सांगाड्यासारखी असतात. पण मूळच्या घटकाची जागा एखाद्या निराळ्याच रासायनिक संघटनाच्या खनिजाने (Mineral Composition) घेतलेली असते. मुरणाऱ्या पाण्यातील एखाद्या द्रव्याची आणि सांगाड्याच्या घटकांची कणाकणाने अदलाबदल होऊन असे जीवाश्म तयार होतात. उदा., वृक्षांच्या खोडांचे काष्ठतंतूंच्या (Cellulose) जागी गारेची (Silica) स्थापना होते. जैव पदार्थाच्या (Organic) जागी खनिज पदार्थ (Mineral matter – Inorganic) आणणाऱ्या प्रक्रियेस अश्मीभवन (Petrification) म्हणतात.

तमिळनाडू राज्यातील तिरूवक्कराई (विल्लूपुरम जिल्हा) येथील राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय अश्मीभूत लाकूड जीवाश्म उद्यान स्मारकामध्ये साधारणपणे २०० वृक्षांची अश्मीभूत जीवाश्मे आहेत. यांमधील ओंडक्यांची सरासरी लांबी ३ ते १५ मी. असून काही वृक्षांचा घेर ५ मी. पर्यंत आहे. नवजीव महाकल्पातील (Cenozoic Era), निओजिन कल्पातील (Neogene Period), मायो – प्लायोसिन उपकल्पातील (Mio – Pliocene epoch; सुमारे २० द.ल. वर्षांपूर्वी) कडलोर वालुकाश्म संचामध्ये (Cuddalore Sandstone formation) या जीवाश्मी ओंडक्यांचे भाग आडवे रुतलेल्या (Horizontally embedded) स्थितीत आढळतात.

हे स्मारक तिरूवक्कराई गावाच्या पूर्वेला १ किमी. अंतरावर आहे. चेन्नई (तमिळनाडू) या राजधानीच्या शहरापासून दक्षिण- नैऋत्येला (S-SW), राष्ट्रीय महामार्ग क्र. ४५ वरून टिंडीवनम (Tindivanam) मार्गे कुट्टेरीपट्टू (Kutteripattu) येथे यावे लागते. कुट्टेरीपट्टू ते पुदुचेरी (पॉंडिचेरी) रस्त्यावर देवळांसाठी प्रसिद्ध असलेल्या मैलाम (Mailam) गावावरून तिरूवक्कराई गावात जाता येते. पुदुचेरीवरूनही रस्त्याने येथे जाता येते.

संदर्भ :

  • संकेतस्थळ – Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी