वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत :
आकाश गोलावरील (Celestial Sphere) ग्रह, तारे किंवा अन्य आकाशस्थ वस्तूंचे स्थान निश्चित करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीत वैषुविकवृत्त (Celestial Equator) हे संदर्भ वर्तुळ आहे. वैषुविकवृत्तावरील अंशात्मक अंतर मोजण्यासाठी वसंत संपात हा आरंभ बिंदू घेतला जातो. वसंत संपातापासून पूर्वेकडे मोजलेले अंतर जरी अंशात असले, तरी या पद्धतीमध्ये ते तास (Hour) या स्वरूपात व्यक्त करतात. वर्तुळाचे ३६० अंश म्हणजे २४ तास हा हिशोब धरून ३६० ÷ २४ = १५ अंश म्हणजे एक तास होतो. अशा प्रकारे या वर्तुळावरील अंतर व्यक्त केले जाते. त्यासाठी होरा किंवा तास (R.A.; Right Ascension) हे एकक वापरतात. वसंत संपात आरंभ बिंदू असल्यामुळे वसंत संपात बिंदूचा होरा ० मानला जातो. तेथून पुढे प्रत्येक १५ अंशासाठी एक तास याप्रमाणे ०h पासून २३h पर्यंत होरा (h म्हणजे hour : तास) मोजले जातात. यातल्या एका तासाचेही ६० भाग म्हणजे मिनिटे आणि मिनिटाचे ६० भाग म्हणजे सेकंद असे सूक्ष्म मापही आवश्यकतेनुसार केले जाते. होरा ४h याचा अर्थ वसंत संपात बिंदूच्या पूर्वेस ४ तास अर्थात (१५ x ४ = ६० अंश) असा होतो. याप्रमाणे उत्तर-विष्ट्म्भ बिंदू, शरद संपात आणि दक्षिण-विष्ट्म्भ बिंदू यांचे होरा अनुक्रमे ६h, १२h, आणि १८h असे आहेत. वैषुविकवृत्ताच्या उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील अंशात्मक अंतर व्यक्त करण्यासाठी ‘क्रांती’ (Dec. : Declination) हे एकक वापरतात. दोन्ही ध्रुव बिंदूंना जोडणारे आणि त्यांच्यामधून जाणारे होरावृत्त काढल्यास या होरावृत्तावर वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस मोजलेले अंशात्मक अंतर म्हणजे क्रांति. उत्तर क्रांति दर्शविण्यासाठी धन (+) आणि दक्षिणक्रांति दर्शविण्यासाठी ऋण (-) चिन्ह वापरतात. क्रांति -१५ अंश याचा अर्थ तो तारा वैषुविकवृत्ताच्या दक्षिणेस १५ अंशावर आहे असा होतो. उदाहरणार्थ, चित्रा (Spica; Alpha virginis) तारकेचे स्थान होरा: १३h २५m ११.५७९s तर क्रांती: -११ अंश ०९’ ४०.७५” असे आहे. येथे क्रांती दर्शवितानाही अंशाचे ६० भाग म्हणजे कोनीय मिनिटे (Arc Minute) , जे (‘) या चिन्हाने दाखवतात, तर मिनिटाचे ६० भाग म्हणजे कोनीय सेकंद (Arc Second) हे (“) या चिन्हाने दाखवले जातात. सर्व होरावृत्ते दक्षिण आणि उत्तरध्रुवावरून जाणारी असतात, तर सर्व क्रांतिवृत्ते वैषुविकवृत्ताला समांतर असतात.
दीर्घकाळपर्यंत ताऱ्यांची स्थाने (एकमेकांच्या संदर्भात) फारशी बदलत नाहीत. परंतु, पृथ्वीच्या परांचन गतीमुळे ठराविक कालावधीमध्ये संपात बिंदूचे आकाशातील स्थानच पश्चिमेकडे सरकते. हा संदर्भबिंदूच बदलल्याने आकाशाच्या नकाशातील ताऱ्यांची स्थाने वेगळ्या सहनिर्देशांकांनी दाखवावी लागतात. हा बदल जरी सूक्ष्म प्रमाणात होत असला, तरी दर ५० वर्षांनी असे संदर्भ-स्थान बदल केलेले नकाशे प्रसृत केले जातात. याआधी असे प्रमाण-नकाशे १९०० अणि १९५० साली प्रकाशित करण्यात आले होते. आज इ.स. २०२० मध्ये, अजूनही इ.स. २००० च्या संपात बिंदूच्या स्थानावर आधारित असलेले (Epoch-२०००) नकाशे आपण वापरत आहोत. ताऱ्यांच्या एकमेकांशी असणाऱ्या स्थानांमध्ये बदल दिसत नाही. परंतु आकाशात ताऱ्यांशी तुलना करता, भराभर चलन करणाऱ्या ग्रह, सूर्य, चंद्र इत्यादींची स्थाने मात्र ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर दररोजच बदलत राहतात, त्यामुळे आकाशाच्या नकाशात त्यांचा संदर्भ जर ते नकाशे विशिष्ट कालावधीसाठी असले, तरच दर्शविण्यात येतो, अथवा ते नकाशात दाखवण्यातच येत नाहीत.
वसंत संपात आणि शरद संपात या दोनही बिंदूंची क्रांति ० अंश असते. तर उत्तरविष्ट्म्भ बिंदूची क्रांति +२३.५ अंश आणि दक्षिण विष्ट्म्भ बिंदूची क्रांति -२३.५ असते.
या वैषुविक पद्धतीप्रमाणे दर्शविलेल्या ताऱ्यांच्या सहनिर्देशकांमध्ये जगभरात कोठूनही पाहताना बदल होत नाही; जसा स्थानिक क्षित्यंश-उन्नतांश पद्धतीत दिसून येतो.
समीक्षक : आनंद घैसास