नारळ हे फळ ज्या वनस्पतीपासून मिळते त्या वृक्षाला माड किंवा नारळाचे झाड म्हणतात. या वृक्षाचा समावेश अ‍ॅरॅकेसी कुलात केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव कोकॉस न्यूसिफेरा आहे. माडाचे मूलस्थान आग्नेय आशिया असून जगातील सर्व उष्ण प्रदेशांत समुद्रकिनाऱ्‍याजवळ तो वाढलेला दिसतो. हिंदी व पॅसिफिक महासागर येथील बेटांवर तो नैसर्गिक अवस्थेत वाढतो. भारतात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, ओडिशा व पश्‍चिम बंगाल या राज्यांच्या तसेच पाँडिचेरीच्या समुद्रकिनाऱ्‍यालगत माडाची लागवड केली जाते.

माड (कोकॉस न्यूसिफेरा) : (१) वृक्ष, (२) फुलोरा, (३) फळे

माड वृक्ष सु. ३० मी. उंच वाढतो. खोड नितळ, राखाडी रंगाचे व शाखाहीन असून त्यावर गळून गेलेल्या पानांचे व्रण असतात. खोडाच्या टोकाला (शेंड्याला) मोठी व पिसांप्रमाणे, २–६ मी. लांब अशी १०–१२ पाने झुबक्याने असतात. पानांची दले अनेक, मोठी, ६०–९० सेंमी. लांब, हिरवी आणि तलवारीच्या पात्यासारखी असतात. त्याला दरवर्षी १०–१२ फुलोरे स्थूलकणिश पुष्पविन्यास प्रकारात येतात. प्रत्येक फुलोरा १-२ मी. लांब असून त्यावर लहान, असंख्य व एकलिंगी फुले येतात. फुलोऱ्‍याच्या वरच्या टोकाला नर-फुले आणि खालच्या टोकाला मादी-फुले येतात. फळ आठळीयुक्त, २०–३० सेंमी. लांब, काहीसे त्रिकोणी, प्रथम हिरवट-पिवळे परंतु नंतर पिंगट होते. ते टणक असून मध्यकवच तंतुमय व अंत:कवच म्हणजे करवंटी कठीण असते. बी एकच व भ्रूणपोषी म्हणजे गर्भाबाहेर अन्नांश असलेली असते. करवंटीसकट असलेली बी म्हणजेच बाजारात मिळणारा नारळ होय. खोबरे आणि नारळातील पाणी हा भ्रूण तर सर्व नारळ म्हणजे आठळी होय. नारळात तीन अंडाशय असून त्यांना डोळे म्हणतात. त्यांपैकी दोन वंध्य असतात. बी रुजते वेळी तिसऱ्‍या फलनशील डोळ्यातून अंकुर बाहेर पडतो.

दरवर्षी नारळाच्या प्रत्येक वृक्षाला सु. १०० नारळ येतात. प्रत्येक फळ पिकायला साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो. पिकलेली फळे वृक्षावरून गळून पडतात. जगभर तेल देणाऱ्‍या पिकांमध्ये नारळाचा पहिला क्रमांक आहे. नारळाच्या उत्पादनात फिलिपीन्स, इंडोनेशिया आणि भारत हे देश आघाडीवर आहेत.

माडाला कल्पवृक्ष म्हणतात. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा मनुष्याला उपयोग होतो. नारळाच्या म्हणजे शहाळ्याच्या पाण्यात शर्करा, सूक्ष्मतंतू, प्रथिने, पोटॅशियमचे क्षार आणि -जीवनसत्त्व असते. कोवळ्या नारळातील पाण्याचा उपयोग वनस्पती ऊतीच्या संवर्धनासाठी तसेच सूक्ष्मजीवांच्या संवर्धनासाठी होतो. ताज्या खोबऱ्‍यात कर्बोदके, मेद, प्रथिने आणि पाणी असते.खोबरे मूत्रल असून त्यात , आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. ताजे खोबरे तसेच सुकविलेले खोबरे स्वयंपाकात व मिठाईत वापरतात. खोबरेल तेलाचा वापर स्वयंपाकात तसेच साबण, मेणबत्त्या, सुगंधी तेले व मार्गारीन तयार करण्यासाठी होतो. फुलोऱ्‍यातील रसापासून नीरा मिळवितात. तसेच पुढे त्याच्यापासून माडी हे मादक पेय किंवा गूळ तयार करतात. तुसांपासून काथ्या तयार करून त्यापासून दोरखंड, चटया, पायपोस, ब्रश इ. वस्तू बनवितात. काथ्याचा उपयोग गाद्यांमध्येही करतात. पानांच्या शिरांपासून झाडू व पात्यांपासून चटया तयार करतात.

खोबरेल तेलात लॉरिक आम्ल (४८%), मिरिस्टिक आम्ल (१६%), पामिटिक आम्ल  (९.५%), डिकॅनॉइक आम्ल (८%), कॅप्रिलिक आम्ल (७%) आणि ओलेइक आम्ल (६.५%) ही संपृक्त मेदाम्ले असतात. लॉरिक आम्लाच्या सेवनामुळे चांगले कोलेस्टेरॉल म्हणजे एचडीएल कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल म्हणजे एलडीएल कोलेस्टेरॉल अशा दोन्ही कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, असे आढळून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा