अल्लादियाखाँ : ( १० ऑगस्ट १८५५—१६ मार्च १९४६ ). कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक व जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रवर्तक. खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण नंतर धर्मांतरित झाले. खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’. खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. अल्लादियाखाँ चौदा-पंधरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील टोंक येथे वृद्धापकाळाने मृत्यू पावले. त्यामुळे त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले. अल्लादियाखाँनी प्रथम चारपाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे निष्ठेने शिक्षण घेतले. यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. प्रदेशांत व थेट नेपाळपर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला. पुढे ते आमलेटा संस्थानात असताना एकदा अतिगायनामुळे त्यांचा आवाज बसला, तो जवळपास दोन वर्षांपर्यंत तसाच होता. त्यामुळे त्यांनी पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी निर्माण केली. १८९१ च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदाबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयाला दरबार गायक म्हणून रुजू झाले. ते १९२२ पर्यंत कोल्हापुरात वास्तव्यास होते. त्यानंतर १९४६ पर्यंतची चोवीस वर्षे त्यांचे वास्तव्य मुख्यत: मुंबईत होते. तेथे त्यांनी अनेक शिष्यांना संगीतविद्या दिली.
खाँसाहेबांच्या पूर्वी महाराष्ट्रात अनेकविध गायनशैली प्रचलित होत्या, पण त्यांतल्या कोणत्याही गायकीपेक्षा ही गायकी स्वतंत्र होती. मूळच्या धृपद-अंगामुळे येणारा बोझ, स्वररचनेचा पेचदारपणा, लयकारीचा बिकटपणा, अनेकविध रागांचा अनवटपणा अथवा मिश्रता, चिजांचे नावीन्य, अचाट दमसास, त्यामुळे येणारा एकसंघ अतूटपणा आणि गोळीबंद गमक-अंगाचे प्राधान्य ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये होती. त्यांचा प्रत्येक स्वर लयकारीने झेलला जात असे; आणि त्यांच्या तानेची मांडणी विलक्षण व अनपेक्षित असे. त्यामुळे त्यांची गायकी ऐकण्यापूर्वी श्रोत्यांच्या बौद्धिक पूर्वतयारीची नितांत अपेक्षा असे. त्यांच्या तनाइतीतले एक वैशिष्ट्य म्हणजे रागाच्या जीवस्वराला मध्येच दिला जाणारा अतिशय मोहक झोल किंवा दुसऱ्या एखाद्या स्वरावर होणारा ठेहराव व तेथून अत्यंत अनपेक्षितपणाने तानेचा समेपर्यंत अवसानाने होणारा प्रवास. त्यांच्या एकंदर गायकीमध्ये चीज, आलाप, तान, बोलताना इ. अंगे एकापुढे एक पृथक ठेवलेली न वाटता ती एकमेकांमध्ये बेमालूमपणे एकजीव होऊन जात आणि चिजेला अथवा रागाला पूर्णोद्गाराचे स्वरूप येई आणि या साऱ्या वैशिष्ट्यांबरोबरच सर्वस्वी अनवट अशा अनेकविध रागरागिण्यांच्या सादरीकरणामुळे ही गायकी वेगळी वाटत राहते.
खाँसाहेबांचा स्वभाव निगर्वी, गुणग्राहक आणि वृत्ती अलिप्तपणाची होती. खाँसाहेबांनी आपल्या वडिलांचे—एहमदजींचे—नाव गोवून बऱ्याच सुंदर चिजा बांधलेल्या आहेत. त्यांच्या मुलांपैकी दोन मुलगे मंजीखाँ आणि भूर्जीखाँ हेही गुणी गायक व शिक्षक होते. खाँसाहेबांना काही हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक ‘कोठीवाले’ गायक होते.
खाँसाहेबांच्या शिष्यशाखेत त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला इ. सुविख्यात कलावंत मंडळींचा समावेश होतो.
खाँसाहेब मुंबईस मृत्यू पावले. त्यांची कबर मुंबईला ठाकुरद्वारला रूपावाडी येथे असून कोल्हापुरास गायन समाज देवल क्लब समोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.
समीक्षण : श्रीकांत डिग्रजकर