एम्पसन, विल्यम : (२७ सप्टेंबर १९०६ – १एप्रिल १९८४). ब्रिटिश समीक्षक आणि कवी. २० व्या शतकातील साहित्यिक टीकाकार आणि त्याच्या तर्कसंगत,आभासी कवितेसाठी परिचित.  एम्पसन नवीन विचारांचे स्वागत आणि स्वीकार करणारा होता आणि त्याच वेळी त्याच्या मतांचा बचाव करण्यासाठी सक्षम होता. एम्पसनचा जन्म यॉर्कशायर इंग्लंड येथे चांगल्या विचारवंतांच्या कुटुंबात झाला होता. अल्पवयातच त्याने विंचेस्टर महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळविली. या शाळेचा भर क्रीडा आणि कडक शिस्तीवर होता ; मात्र तरीही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. तेथून तो कॅंब्रिज येथील मॅग्डालेन महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळविण्यात यशस्वी झाला, जेथे १९२९ मध्ये त्याने पदवी संपादन केली.

गणित व इंग्रजी विषयात त्यांनी प्रथम पदवी घेतली. पदवीनंतरचे शिक्षण एम्पसनला कॅंब्रिज येथे घेता आले नाही. त्याच्या वयसुलभ आक्षेपाहार्य वर्तनामुळे त्याला विद्यापीठातून काढण्यात आले. एम्पसनला केवळ विद्यापीठातूनच काढले गेले नाही, तर त्याला केंब्रिजमध्ये त्यास राहण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे त्याला तेथे पुढील उच्च शिक्षण घेता आले नाही. तदनंतर तो लंडनमध्ये गेला आणि तेथे स्वतंत्ररीत्या लेखन व संपादनासह त्याने त्याचे जीवन व्यतीत केले. एम्पसनने इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्याने १९३१ ते १९३४  या काळात टोकियो विद्यापीठात आणि त्यानंतर चीनमधील पेकिंग नॅशनल युनिव्हर्सिटीत इंग्रजी साहित्य या विषयाचे अध्यापन केले. द्वितीय विश्वयुद्धात तो ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये चिनी संपादक होता. १९५३ पासून शेफील्ड विद्यापीठात एम्पसन इंग्रजी साहित्याचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.

एम्पसनचा पहिला काव्यसंग्रह एम्पसन पोएम्स १९३५ ला प्रकाशित झाला. यात प्रकाशित काही कविता त्याने पदवीचे शिक्षण घेतानाच लिहिले होते. या काव्यसंग्रहात त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानातून निर्माण झालेली मानवी जीवनातील   निराशावादी भूमिका रूपकाधारे प्रतिबिंबित केली आहे. त्याच्या साहित्य लेखनात गॅदरिंग स्टॉर्म (१९४०) आणि  कलेक्टेड पोएम्स (१९५५) हे दोन काव्यसंग्रह तसेच सेव्हन टाइप्स ऑफ अँबिग्यूइटी (१९३०),  सम व्हर्शन्स ऑफ पास्टोरल (१९३५),  स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स वर्ड्‍‍‍‍‍ (१९५१) आणि मिल्टन्स गॉड (१९६१) या चार समीक्षात्मक ग्रंथाचा समावेश होतो. एम्पसनची मौलिकता केवळ त्यांच्या लिखाणापुरती मर्यादीत नव्हती तर त्याने अत्यंत साहसी जीवन व्यतीत केले.

सोळाव्या-सतराव्या शतकांतील जॉन डन आणि चालू शतकातील टी. एस्. एलियट यांच्या साहित्यावृत्तीचा त्याच्या काव्यावर प्रभाव पडलेला दिसतो. तंत्राचा अतिरिक्त पुरस्कार केल्यामुळे त्याच्या काव्यात आशयाला योग्य स्थान राहिले नाही.  सेव्हन टाइप्स ऑफ अँबिग्यूइटी ह्या त्याच्या विख्यात ग्रंथात त्याने विविधार्थतेचे तत्त्व हे एक काव्यलक्षण असून ते काव्याच्या मूल्यमापनाचा एक निकष होऊ शकेल, असे मत त्याने मांडले.  शब्दांची विविधार्थक्षमता काव्याला अधिक अर्थ प्राप्त करून देते व ते अधिक सधन व समृद्ध बनविते, अशी त्याची धारणा आहे. विविधार्थता सात प्रकारची असते असे सांगून ती वेगवेगळ्या कवींच्या काव्यात कशी आढळते, हे त्याने दाखविले आहे. ह्या ग्रंथाने अमेरिकन साहित्यातील नवटीकेचा पाया घातला.

संदर्भ :