पातंजल योगसूत्राच्या विभूतिपाद या तिसऱ्या पादात ‘संयम’ या योगसाधनेची संकल्पना आढळते. धारणा, ध्यान व समाधी या अंतरंग योगाच्या तीनही अंगांचे एकत्रित अनुष्ठान म्हणजे संयम होय. निरनिराळ्या विषयांवर संयम केल्याने अनेक प्रकारच्या सिद्धी म्हणजेच अलौकिक सामर्थ्ये प्राप्त होतात असे या पादात सांगितले आहे. पतंजलींनी सूत्र ३.४४ व ३.४५ मध्ये पाच महाभूतांवर जय मिळविण्याबाबत सांगितले आहे; तर ३.४७ (ग्रहणस्वरूपास्मितान्वयार्थवत्त्वसंयमादिद्रियजय:|) या सूत्रात इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था किंवा रूपांवर संयम साधला असताना इंद्रियजय प्राप्त होतो, असे म्हटले आहे. या पाच अवस्था पुढीलप्रमाणे —
(१) ग्रहण अवस्था (आकलन शक्ती) : बाह्य विषयांचे आकलन करण्याची क्षमता ही इंद्रियांची ग्रहण अवस्था होय. विषयांचे ग्रहण करणे हे ज्ञानेंद्रियांचे कार्य आहे व त्यानुसार कर्मेंद्रियांचे व्यवहार घडतात. इंद्रिये सत्त्व गुणापासून उत्पन्न होत असतात व त्यामुळे त्यांना विषयांचे ज्ञान होते. ज्ञानेंद्रियांना विषयांचे सामान्य रूपाने व विशेष रूपाने ज्ञान प्राप्त होते. उदा., डोळ्यांना प्रथम एखादे झाड दिसते तेव्हा ‘ते झाड आहे’ असे सामान्य ग्रहण होते व ‘हे आंब्याचे बहरलेले झाड आहे’ असे विशेष ग्रहण होते.
(२) स्वरूप अवस्था (शब्द, स्पर्श,रूप, रस आणि गंध ही तन्मात्रे) : इंद्रिये अहंकारातून निर्माण होतात. अहंकार बुद्धिपासून उत्पन्न होतो. बुद्धी सात्त्विक असल्यामुळे प्रकाशरूप आहे. परिणामी अहंकारही प्रकाशरूप आहे. त्यामुळे त्यापासून निर्माण झालेली इंद्रिये देखील प्रकाशरूप आहेत. प्रकाशमानता हे इंद्रियस्वरूप आहे.
(३) अस्मिता अवस्था (‘मी आहे’ अशी जाणीव) : ‘मी आहे’ (अस्मि) अशा ‘अहम्’च्या स्फुरणातील सात्त्विक अंशापासून इंद्रिये उत्पन्न झाली आहेत म्हणून अहंकार ही इंद्रियांची अस्मिता आहे.
(४) अन्वय अवस्था (परस्पर संबंध) : अस्मिता ज्यापासून उत्पन्न झाली आहे ते महत् तत्त्व प्रकृतिपासून निर्माण झाले आहे. प्रकृती सत्त्व, रजस् व तमस् या तीन गुणांची बनलेली आहे. हे गुण अनुक्रमे प्रकाश, क्रिया, स्थिती प्रकट करतात. इंद्रिये प्रकृतीचे विकार असतात, म्हणूनच ती त्रिगुणात्मक असतात. प्रकृतीचे तीनही गुण इंद्रियातही असतात. हा इंद्रियांचा अन्वय होय.
(५) अर्थवत्त्व अवस्था (सार्थकता) : ‘प्रकृतीच्या अस्तित्वाचा अर्थ (उद्देश) पुरुषाला भोग व अपवर्ग प्राप्त करून देणे. इंद्रिये प्रकृतीचा परिणाम असल्याने पुरुषाला भोग व अपवर्ग प्राप्त करून देणे हे त्यांचे अर्थवत्त्व होय. त्यावरील संयम हा या साधनेतील पाचवा व अखेरचा संयम आहे.
प्रत्येक इंद्रियाच्या या पाच रूपांवर स्वतंत्रपणे संयम करावयाचा आहे. इंद्रियजयाचे फळ पातंजल योगसूत्रातील ३.४८ या सूत्रात सांगितले आहे (ततो मनोजवित्वं विकरणभाव: प्रधानजयश्च|) अर्थातच इंद्रियजयामुळे मनाच्या वेगाएवढा वेग प्राप्त होणे (मनोजवित्व), उपभोगासाठी इंद्रियांच्या माध्यमाची गरज न उरणे (विकरणभाव) व प्रकृतीवर विजय (प्रधानजय) ही फळे प्राप्त होतात. योगी इंद्रियांशिवाय व इंद्रियांच्या मर्यादेपलीकडील ज्ञान मनाच्या वेगाने तात्काळ मिळवू शकत असल्याने ती पूर्णपणे त्याच्या ताब्यात येतात. ही एक प्रकारची विदेहावस्था आहे. तसेच या संयमामुळे योग्याला प्रधानजय (प्रकृतीवर जय) म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेल्या बुद्धी, अहंकार, मन, ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ तन्मात्रे, ५ महाभूते यांवर विजय प्राप्त होतो. ही सिद्धीप्राप्तीतील सर्वांत अंतिम स्थिती आहे. व्यासभाष्यात या तीन सिद्धींना ‘मधुप्रतीका’ असे म्हटले आहे.
समीक्षक : कला आचार्य