प्रस्तावना : कौटुंबिक आरोग्य सेवा देताना त्या कुटुंबाच्या आरोग्य समस्या व गरजा शोधल्यानंतर त्या गरजा पुरविण्यासाठी उपलब्ध साधने किंवा स्त्रोत शोधून सेवा शुश्रूषा देण्याचे नियोजन सामाजिक परिचारिका करीत असते.

कौटुंबिक परिचर्या देण्यासाठी उपयोगी स्त्रोत

स्त्रोत (Resources) साधारणतः पुढील स्त्रोत उपलब्ध होऊ शकतात. जसे – १. घरातील सदस्य  २. कुटुंबातून  ३. काही सामाजिक संस्था ४. उपलब्ध पुस्तके, आरोग्य पत्रिका इ. अशा प्रकारचे स्त्रोत वापरण्यासाठी परिचारिका मार्गदर्शन करणे.

 आरोग्य समस्या नियोजनाकरिता उपयोगी स्त्रोत :

१. आर्थिक स्त्रोत (Economic Resource) : ह्यासाठी सामाजिक परिचारिका खालील बाबी विचारात घेऊन मार्गदर्शन करते.

  • व्यक्तीच्या आजाराचे स्वरूप.
  • कुटुंबाचे उत्पन्न.
  • आजारावर उपाययोजना करण्यासाठी जवळपासच्या आरोग्य संस्था.
  • कुटुंबाचा आरोग्य विमा (Medical Insurance) आहे किंवा नाही.
  • कुटुंब प्रमुखाला व्यावसायिक विमा किंवा आर्थिक मदत मिळते काय?

२. कुटुंबातील भौतिक सुविधा (Physical Resources) :

  • घरातील सदस्यांच्या आरोग्यवर्धक सवयी व चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा उदा. सुरक्षित वायुविजन, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था, संडास व बाथरूम इ.
  • आजारी व्यक्तीच्या आजारानुसार व गरजेप्रमाणे शुश्रूषा करण्यासाठी लागणारी उपकरणे आणि वस्तू  इ.

३. वैयक्तिक (Personal Resources) :

  • आजारी व्यक्तीची काळजी घेणारा किंवा शुश्रूषा करू शकणारा कुटुंबातील सदस्य.
  • कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध.
  • घरातील व्यक्तीला पूर्वी झालेल्या आजाराविषयीचे ज्ञान व शुश्रूषा विषयीचा अनुभव याचा उपयोग करून परिचारिका सद्य:स्थितीत आजाराविषयी मार्गदर्शन करू शकते.
  • वैयक्तिक किंवा कुटुंबातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते व्यवस्थापन कौशल्य उपयोगात आणणे.

४. परिचारिका स्वतः एक स्त्रोत (Nurse as Resource) :

  • परिचारिकेचे आरोग्य समस्या शोधण्याचे कौशल्य.
  • परिचारिकेच्या गृह परिचर्या देण्यासाठी आवश्यक कौशल्य (Skill).
  • परिचारिका आपल्या अनुभवाचा उपयोग करून आरोग्य समस्येवर मार्गदर्शन करते. गृह शुश्रूषा करण्याच्या पद्धती करून दाखविते.
  • आरोग्य शिक्षण देण्यासाठी सोप्या पद्धती कुटुंब सदस्यांच्या पात्रतेचा (Level of understanding) विचार करून आरोग्य शिक्षण देते. उदा. लघवीतील साखरेचे प्रमाण तपासणे, बहुउद्देशीय पोषक आहार बनविणे, विविध कुटुंब नियोजन पद्धतींचा वापर करण्यासाठी सुयोग्य जोडपे निवडणे इ.

५. सामाजिक स्त्रोत (Community Resources) :

सामाजिक परिचारिका शहरी किंवा ग्रामीण विभागात कार्यरत असताना त्यांना ज्या भागात आरोग्य सेवा देण्यासाठी नेमलेले असते. त्या ठिकाणच्या विविध संसाधनांविषयीची माहिती पुरवित असते. जसे की,

i.  आरोग्य सेवा केंद्रे : जवळपास असलेल्या आरोग्य सेवा केंद्राचे संदर्भसेवा, केंद्राचा पत्ता, सेवेचे वेळापत्रक इ. माहिती देऊन कुटुंबाला आरोग्य समस्येवर उपाय करण्यास मदत होते.

  • सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इ.
  • इतर खाजगी दवाखाने, नर्सिंग होम, रेड क्रॉसची केंद्र इ.
  • विशिष्ट आरोग्य सेवा केंद्रे – संसर्गजन्य दवाखाने, क्षयरोग केंद्र इ.
  • विशिष्ट आजार सेवा केंद्रे – मधुमेह, हृदयरोग, एच.आय.व्ही. इ.
  • विशिष्ट आरोग्य संवर्धन केंद्र – गरोदर स्त्रिया, स्तनदा माता केंद्र, कुटुंब नियोजन सेवा.

ii.  आरोग्य संवर्धन सेवा (Health Protective Services) : ह्या सेवा गरजेनुसार संदर्भ म्हणुन व आरोग्य शिक्षण देतांना परिचारिका वापरतात. उदा.,

  • कुटुंब नियोजन – कुटुंब कल्याण – आरोग्य सेवा (Dept. of Family Planning, Family Welfare & Health)
  • समाज कल्याण विभाग (Social Welfare Dept.) – विद्यार्थी कल्याण योजना, बालकामगार प्रतिबंध, बाल गुन्हेगारी प्रतिबंध, वेश्या व्यवसाय प्रतिबंध इ.
  • साथ रोग प्रतिबंध, विलगीकरण नियम इ. (Epidemiological Measures)
  • वातावरण, हवामान विभाग (Environmental Control Dept.) – शुद्ध पाणी पुरवठा, मलनिस्सारण सुविधा, अन्नसुरक्षा, अन्न व औषधी भेसळ प्रतिबंध इ.

iii.  आरोग्य शिक्षण सेवा (Health Education Services) : आरोग्य शिक्षण हा सामाजिक परिचर्येचा आत्मा असतो. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून परिणामकारक आरोग्य शिक्षण देता येते. उदा.,

  • आरोग्य शिक्षण – शालेय आरोग्य सेवा, कुटुंबातील, कार्यालयातील किंवा कारखान्यामधील मध्यम वयस्क व्यक्तींना आरोग्य शिक्षण देण्याचा उपक्रम.
  • स्थानिक, देशपातळीवर किंवा आंतरदेशीय संस्थांमार्फत असे उपक्रम आयोजित करणे.
  • सरकारी किंवा खाजगी आरोग्य केंद्रातून आरोग्य संवर्धन प्रशिक्षण देणे.
  • शिक्षक – विद्यार्थी मंडळाचे शालेय परिचारिकेचे सदस्यत्व या उपक्रमात भाग घेणे.
  • औषध बनविणाऱ्या कंपनी व विमा, आरोग्य विमा कंपनीच्या सहभागाने आरोग्य शिक्षण देणे.
  • समाज कल्याण संस्था, युनिसेफ, डब्ल्यु.एच.ओ., रोटरी क्लब, लायन्स क्लब इत्यादींच्या सहकार्याने आरोग्य शिक्षणाच्या सोयी-सुविधा कुटुंबातील सदस्यांना उपलब्ध करून देणे. उदा. वयस्कांसाठी चष्मे, कर्ण यंत्र, पुनर्वसनासाठी विविध साधने, आधारकाठी इ.

iv. अनौपचारिक आरोग्य स्त्रोत (Informal Health Resources) : यामधील मदतीचे स्त्रोत म्हणुन कुटुंबाशेजारील व्यक्ती, मोफत सेवा देणाऱ्या धर्मादाय संस्था, आरोग्याविषयी माहितीपत्रके, पुस्तके, नियतकालिके इ. समावेश होतो.

सारांश : सामाजिक परिचारिका वरील सर्व स्त्रोत कौटुंबिक आरोग्य सेवा देण्यासाठी वापरत असते. त्यासाठी परिचारिका त्याविषयी मूलभूत माहिती गोळा करते व नंतर त्यासाठी मार्गदर्शन करते. उदा.,

  • उपलब्ध संसाधने, संस्थेचा पत्ता, घरापासूनचे अंतर, त्यासाठी येणारा खर्च व वेळ इ.
  • तसेच ते वापरण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण कसे करावे.
  • उपलब्ध आरोग्य संसाधनांचे वर्गीकरण करून एक स्वतंत्र वही/नोंद ठेवते व गरजेनुसार मार्गदर्शन करते.
  • आरोग्य स्त्रोत वापरण्यासाठीचा एक कृती आराखडा (Referral procedure) तयार करते.

या सर्व बाबी लक्षात घेता सामाजिक परिचारिका स्वतः एक आरोग्य स्त्रोत (Resource Person) म्हणुन यशस्वी कार्य करीत रीत्या असते.

संदर्भ :

  • नाजू कोतवाल, टी.एन.ए.आय.मॅन्युअल.
  • फ्रीमन, पब्लिक हेल्थ नर्सिंग.