जलपरिसंस्थेच्या विविध प्रकारांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ७०.८% क्षेत्र पाण्याखाली असून त्यातील सुमारे २.५% क्षेत्र गोड्या पाण्याखाली आणि उर्वरित ९७.५% क्षेत्र खाऱ्या पाण्याने व्यापलेले आहे. त्यामुळे सागरी परिसंस्था ही सर्वांत विशाल परिसंस्था ठरली आहे. विशालतेबरोबरच ही परिसंस्था अधिक संतुलित, परंतु जटिल आहे. वेगवेगळे सजीव आणि पर्यावरणातील विविध घटक यांच्यात एक अतूट नाते असते. अशा अतूट नात्यातून जैविक आणि पर्यावरणातील अजैविक घटकांमध्ये जी एक वैशिष्ट्यपूर्ण चक्राकार प्रणाली निर्माण होते, तिला ‘परिसंस्था’ असे म्हणतात.
जगातील परिसंस्थांचे भूमी परिसंस्था व जल परिसंस्था असे दोन गट केले जातात. जलपरिसंस्थेचे खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील परिसंस्था असे दोन प्रकार पडतात. सागरी किनाऱ्यापासून खोल अंधाऱ्या सागरी तळापर्यंतच्या सर्व भागांत आढळणाऱ्या परिसंस्था सागरी परिसंस्थेत मोडतात. प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांसारखे जैविक घटक आणि हवा, पाणी, पोषकद्रव्ये व सौरऊर्जा यांसारखे अजैविक घटक असे दोन मुख्य घटक असतात. कोणत्याही परिसंस्थेत सजीव-सजीव, सजीव-पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात. त्यामुळे परिसंस्थांचा विस्तार केवढाही असू शकतो. काही परिसंस्था नैसर्गिक सागरी प्रदेशाएवढ्या विशाल असतात, तर काही परिसंस्था नदी, डबके किंवा वनांपुरत्या मर्यादित असतात.
सागरी परिसंस्थेत सूक्ष्म प्लवक, असंख्य प्रकारचे मासे, कवचधारी प्राणी, सरीसृप वर्गातील प्राणी, सागरी सस्तन प्राणी, बलाढ्य शार्क, रे व देवमासे अशा असंख्य जीवांचा समावेश होतो. सागरी परिसंस्थांमुळे सागरी जीवांचे अस्तित्व टिकून राहते. खाऱ्या पाण्यातील दलदली, कच्छ वनश्रीचे (खारफुटी) प्रदेश, भरती-ओहोटीच्या दरम्यानचे पट्टे, नदीमुखखाडी, खाडी, खाजण, मृत्तिका प्रदेश, सागरी कुरण, प्रवाळ खडक व प्रवाळशैलभित्ती, समुद्र, उपसागर, महासागर, खोल महासागरी भाग आणि सागरी तळ इत्यादी खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रांत आढळणाऱ्या परिसंस्थांचा समावेश सागरी परिसंस्थेत केला जातो. या वेगवेगळ्या क्षेत्रांनुसार सागरी परिसंस्थेचे खारफुटी परिसंस्था, प्रवाळ खडक परिसंस्था, किनारी परिसंस्था, दलदल परिसंस्था, खाजण परिसंस्था, खाडी परिसंस्था, नदीमुखखाडी परिसंस्था, खोल सागरी परिसंस्था इत्यादी वेगवेगळे प्रकार केले जातात. खाऱ्या पाण्यातील परिसंस्था या गोड्या पाण्यातील (उदा., नद्या, सरोवरे, तलाव इत्यादी) परिसंस्थांपेक्षा खूप वेगळ्या असतात.
मिश्रणाने ऑक्सिजन पाण्यात मिसळत जाण्यास, जास्तीत जास्त प्रकाशसंश्लेषण होण्यास व त्यामुळे उपलब्ध पोषक द्रव्यांचा कमाल वापर होण्यास सूर्यप्रकाशित थरामधील परिस्थिती अनुकूल असते. महासागरातील जीवांची निर्मिती या थरावर अवलंबून असते. तसेच येथून खाली जाणाऱ्या जैव द्रव्यांवर खालील भागातील पोषक द्रव्यांचे प्रमाण अवलंबून असते. प्लवक हा पाण्यात तरंगणारा सूक्ष्मजीव सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. प्लवकाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश व पोषक द्रव्यांची गरज असते. त्यामुळे मुख्यत्वे सूर्यप्रकाशित तसेच कमी उष्ण भागात ते जोमाने वाढतात. प्लवकाचे दोन प्रकार आहेत : १) प्राणिप्लवक व २) वनस्पतिप्लवक. वनस्पतिप्लवक हे सर्वाधिक महत्त्वाचे प्लवक आहेत. ते प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. त्यांना ‘सागरी कुरण’ म्हटले जाते. वनस्पतिप्लवक हा सागरी परिसंस्थेतील ‘उत्पादक’ किंवा ‘स्वयंपोशी’ घटक आहे. हे सूर्यप्रकाशित पट्ट्यात (किनारी भागात १६ मी., तर भर समुद्रात सुमारे १५० मी. खोलीपर्यंत) आढळतात. सूर्यप्रकाश व पोषकद्रव्ये यांच्या अनुकूल परिस्थितीत यांची संख्या ३०० पटीने वाढू शकते व पर्यायाने अन्न म्हणून त्यांवर अवलंबून असणाऱ्या इतर जीवांच्या संख्येतही वाढ होते. जैविक घटकांच्या अन्न मिळविण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे उत्पादक, भक्षक (उपभोक्ते) व विघटक (अपघटक) अशा तीन गटांत वर्गीकरण केले जाते.
वनस्पती व प्राणी यांना श्वसनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन व वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन डाय-ऑक्साइड हे वायूदेखील सागराच्या पाण्यात विरघळलेले असतात. त्यामुळे सागराचे पाणी ही वनस्पती व प्राणी यांच्या दृष्टीने आदर्श जीवनाधार प्रणाली बनली आहे. वनस्पतिप्लवक हा सागरी परिसंस्थेतील जीवसृष्टीचा मूलाधार आहे. वनस्पतिप्लवक हे प्राणिप्लवक व इतर काही प्राण्यांचे अन्न असते. प्राणिप्लवक व लहान जलचर प्राणी हे मोठ्या प्राण्यांचे भक्ष्य असते. उत्पादकांनी तयार केलेल्या अन्नाचे भक्षण करणाऱ्या सजीवांना भक्षक किंवा परपोशी म्हणतात. या भक्षकांचे पाथमिक, द्वितीयक व तृतीयक पातळीवरील भक्षक असे वर्गीकरण केले जाते. शार्क मासा हा सागरी अन्नसाखळीतील सर्वांत वरच्या पातळीवरील तृतीय भक्षक आहे. जीवांची मृत शरीरे खाली जाताना त्यांवर इतर प्राणी जगतात. उरलेली मृत शरीरे तसेच प्राण्यांनी उत्सर्जित केलेली द्रव्ये यांचे सर्व खोलींवर सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन पोषक द्रव्ये निर्माण होतात. ही व तळावरील इतर पोषक द्रव्ये अभिसरणाने वर आणली जातात आणि ती वनस्पतिप्लवकांना मिळतात. अशा प्रकारे श्रेणीबद्ध पद्धतीने सागरी परिसंस्थेतील अन्नसाखळी चालू असते. अन्नसाखळीबरोबरच समुद्रात अन्नजाळीही निर्माण होते. सागरी परिसंस्थेत अत्यंत सूक्ष्मजीवांपासून (उदा., ०.००१ मी. लांब नॅनो म्हणजे बुटके प्लवक) ते महाकाय जीवापर्यंत (उदा., सु. २९ मी. लांब निळा देवमासा व २१ मी. लांब समुद्र तृण-केल्प) सर्व प्रकारचे जीव आढळतात. या सर्व जीवांचे तीन गट पाडले जातात : १) तलस्थ जीव, २) तरणक जीव आणि ३) प्लवक. हे सर्व सागरी परिसंस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत.
सामान्यत: किनाऱ्यापासून दूर असलेल्या समुद्रतळावर तलस्थ जीव राहतात. उदा., तळाला चिकटून राहणारे स्पंज, प्रवाळ; तळावर सरपटत व रांगत जाणारे खेकड्यासारखे जड कवचधारी प्राणी; बार्नेकलसारखे बीळ करून राहणारे प्राणी इत्यादी. तळावर काही वनस्पतीही आढळतात; परंतु त्या प्राण्यांच्या दृष्टीने विशेष उपयोगी नसतात. तरणक प्राण्यांत मुक्तपणे चांगले पोहणारे, फिरणारे व स्थलांतर करणारे जीव येतात. यात सर्व प्रकारच्या माशांचा समावेश होतो.
समुद्र आणि महासागराची भौतिक व रासायनिक वैशिष्ट्ये, त्यातील हालचाली, विविध खोलीपर्यंत पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण, समुद्राच्या तळाचे स्वरूप, ज्वालामुखी क्रिया, भूभागाची समीपता, पाण्याची खोली, तापमान, लवणता, पाण्यातील ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड व फॉस्फरसचे प्रमाण, अक्षांश, प्रदूषण पदार्थ गोष्टी आणि जीवसृष्टी यांच्यामध्ये निकटचा संबंध असून त्यावरच सागरातील जैवविविधता अवलंबून असते. पोषणद्रव्यांची वाटणी, प्लवकाचे प्रमाण आणि पर्यायाने जीवांची वाटणी हे सामान्यपणे पाण्याच्या हालचालीशी निगडित असते. सर्वसाधारणपणे अभिसरण प्लवकांना फायदेशीर ठरते. सागरतळाशी कमी तापमानामुळे पाणी थंड व जड असते, तर पृष्ठभागालगतचे पाणी उबदार असते. परिणामत: सागरात निर्माण होणाऱ्या अभिसरण प्रवाहांमुळे सागरी जीवसृष्टीला उपयुक्त ठरणारे विविध वायू व खाद्यपदार्थांचा सागराच्या खोल भागापर्यंत पुरवठा होत राहतो. सागरी प्रवाहांमुळे प्राण्यांना व वनस्पतींना आवश्यक असणारे वायू व खाद्यपदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात; परंतु प्रवाहाच्या मार्गात खूप बदल झाला (उदा., दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील एल निनो प्रवाह), तर तेथील जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात नष्ट होऊन तेथील सागरी परिसंस्था विस्कळीत होते. प्रवाहाच्या परिणामामुळे पाणी उसळून वर आल्यामुळे पोषक द्रव्यांचा भरपूर व सतत पुरवठा होतो (उदा., पेरू प्रवाह) व तेथे भरपूर मासे जगू शकतात. उलट, त्या उसळण्यामध्ये थोडा बदल झाल्यास तेथील अन्नपुरवठा घटून सागरी जीवांचीच नव्हे, तर त्यांच्यावर जगणाऱ्या पक्ष्यांचीही संख्या घटते. कोणत्याही परिसंस्थेत लहानमोठे बदल होत असतात. काही वेळा हे बदल तीव्र आणि पटकन घडून येतात. उदा., एखाद्या प्रदेशात चक्रीवादळ आल्यास तेथील समुद्रकिनाऱ्याच्या भागातील परिसंस्था विस्कळीत होतात.
सागरी परिसंस्थेत सर्व पातळ्यांवर जीवसृष्टीचे अस्तित्व दिसून येते; परंतु त्यांचे वितरण असमान असते. सुमारे ११ किमी. खोलीच्या महासागरी खंदकांमध्येही जीवसृष्टी आढळते. सागरी परिसंस्थेत तरंगणारे, प्रवाळ स्वरूपाचे, खडकाला चिकटून जगणारे, वाळू व चिखलाखालील तसेच अतिखोल सागरातील असे विविध प्रकारचे प्राणिजीवन आढळते. भिन्नभिन्न सागरी प्रदेशातील जीवसृष्टीची वैशिष्ट्ये भिन्न स्वरूपाची असतात. पॅसिफिक महासागरातील परिसंस्था ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी सागरी परिसंस्था असून त्याखालोखाल अटलांटिक, आर्क्टिक व हिंदी महासागरातील परिसंस्थांचा क्रमांक लागतो. ऋतुमान, अक्षांश व खोलीनुसार जीवसृष्टीत बदल होतात. समशीतोष्ण भागांत वसंत ऋतूत अधिक प्रमाणात पोषक द्रव्ये वर येतात व त्यामुळे वनस्पतिप्लवकांची जलद वाढ होते. उच्च अक्षांशाच्या पट्ट्यात (उदा., अटलांटिक व आर्क्टिक) विपुल जीव आढळतात, तर उष्ण कटिबंधात पोषक घटकांच्या कमतरतेमुळे वनस्पतिप्लवकांची वाढ कमी प्रमाणात होते; मात्र या भागात प्रकाश अधिक खोलीवर जाऊ शकत असल्याने वनस्पतिप्लवक अधिक खोलीवर आढळतात. वाढत्या खोलीनुसार जीवांचे प्रमाण कमी होत जाते. कारण, सुप्रकाशित क्षेत्राखाली प्रकाशसंश्लेषण होत नाही. त्यामुळे सावकाशपणे वरून खाली जाणारी पोषक द्रव्ये व ऑक्सिजन यांवर त्यांची गुजराण होत असते.
अद्वितीय शरीरक्रिया व आकार असलेले असंख्य प्रकारचे सागरी जीव नैसर्गिक रित्या निर्माण झालेले आढळतात. नोटोथेनिड (अंटार्क्टिक कॉड) जातीच्या माशांच्या रक्तात गोठण-प्रतिबंधक प्रथिने असल्यामुळे अंटार्क्टिकातील गोठनबिंदूच्या खालील तापमानात ते राहू शकतात. शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण इंद्रियांमुळे काही प्राणी प्रकाश नसणाऱ्या अंधाऱ्या प्रदेशात प्रकाशाची निर्मिती करतात. काही प्राणी पाण्यातूनही खूप दूरवरची कंपने किंवा आवाज सहज ओळखू शकतात, तर देवमासे पाण्यात असताना अनेक आवाज काढतात.
आर्थिक, सामाजिक, वातावरण, पर्यावरण आणि जैविक दृष्ट्या सागरी परिसंस्था महत्त्वाच्या आहेत. पर्यावरण संतुलनासाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे. सागरी वनस्पतींच्या माध्यमातून महासागराकडून कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषला जातो व ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. सागरी परिसंस्था वैश्विक हवामान संतुलित राखतात. सूक्ष्म प्लवकजीवांचे व इतर सागरी वनस्पतींचे अस्तित्व नसते, तर पृथ्वीवरील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण प्रचंड वाढले असते. या परिसंस्थांमुळे मानवाला अन्न व विपुल प्रमाणात नैसर्गिक संसाधने उपलब्ध होतात. जैवविविधतेचे जतन करतात. प्रवाळ खडक हे अनेक सागरी जीवांची आश्रयस्थाने आहेत. संपूर्ण सागरी परिसंस्थांपैकी सर्वाधिक विविधतापूर्ण जीव प्रवाळ खडकांत आढळतात. नदीमुखखाड्या यासुद्धा अनेक जीवांची आश्रयस्थाने आणि प्रजनन स्थळे आहेत. जैववस्तुमानाच्या दृष्टीने खारफुटी वनांतील परिसंस्था ही एक महत्त्वाची उत्पादक परिसंस्था मानली जाते. परिसंस्थांमुळे मनोरंजन आणि पर्यटनाच्या संधी उपलब्ध होतात. सागरी परिसंस्थांशिवाय सागरी अन्नसाखळीचे व अन्नजाळीचे अस्तित्व राहिले नसते आणि सागरांची आजची स्थिती न राहता धोकादायक बनली असती.
सागरी परिसंस्था वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या, तरी त्या नैसर्गिक अवस्थेत ठेवण्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मानवनिर्मित प्रदूषण, अणुचाचण्यांतील किरणोत्सर्ग, अतिरिक्त मासेमारी इत्यादींमुळे सागरी परिसंस्थांना हानी पोहोचत आहे. वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढल्यामुळे हिमाच्छादित प्रदेश वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढून लवणतेची पातळी घटते. त्याचा परिणाम सागरी जीवांवर होतो. जर लवणता घटली, तर खाऱ्या पाण्यात राहणारे प्राणी कमी क्षारतेच्या किंवा गोड्या पाण्यात जगू शकणार नाहीत. सागरी पाण्यात विविध प्रकारची अपशिष्टे, प्रदूषके व केरकचरा टाकला गेल्यास सागरी पाण्याच्या रासायनिक गुणधर्मात बदल होऊन अनेक सागरी प्राणी मरतात. प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे एक दशलक्ष सागरी पक्षी तसेच अनेक डॉल्फीन मासे मरतात. अतिरिक्त मासेमारीमुळे काही सागरी भागातील अनेक माशांच्या जाती कमी, दुर्मिळ किंवा नष्ट होतात; तर काही जातींची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे परिसंस्थांमधील संपूर्ण अन्नसाखळी व अन्नजाळी विस्कळीत होऊन सागरी जैवविविधता धोक्यात येत आहे. त्यामुळे अनेक देशांनी अतिरिक्त मासेमारीवर निर्बंध घालण्याची पावले उचलली आहेत. जगातील कच्छ वनश्रीचे आच्छादन कमी होताना दिसते. औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे अनेक जलचरांचा किनारी अधिवास धोक्यात येत आहे.
समीक्षक : माधव चौंडे