देऊळगावकर, चंद्रकांत दत्तोपंत : (१७ मे १९३२- २ जानेवारी २०१६). संत साहित्याचे अभ्यासक . यू. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे मन्मथ स्वामी : व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावर पीएच. डी. साठी संशोधन पूर्ण केले. ३४ वर्ष दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे अधिव्याख्याता, मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणून काम केले. चंद्रावरील कलंक आणि इतर कथा (१९६८, कुमारांकरिता कथासंग्रह); सानिया (१९६९), परोपकारी विठू (१९७३), आसिम त्याग (१९८८), घरटे (१९६७) हे कथासंग्रह ; आनंदाचे डोही (२०११) हा लेखसंग्रह ; मराठी निबंध व लघुनिबंध (१९७४, संपादित ग्रंथ), चिंतन आणि संस्मरण (२००८, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचा मराठी अनुवाद) इत्यादी त्यांचे साहित्य प्रकाशित आहे. आनंदाचे डोही या संग्रहात संतांचे आणि संतविचाराचे अनुसरण करून समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या व्यक्तिमत्वांचे स्मरण या ग्रंथातून केले आहे. उत्तम कानडी कथांचा अनुवाद, कुमार कथांचे लेखन, संत साहित्याचे समकालीन महत्त्व इत्यादी त्यांच्या साहित्यातील प्रतिपाद्य विषय आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्र व नियतकालिकांमधून लेखन केले. १९६२ साली लातूर येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे सचिव म्हणून त्यांनी कार्य केले आहे. मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांकरिता जीवन विकास प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली आहे. महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे ६ वर्ष सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे ६ वर्ष सदस्य, पंढरपूर येथील संतपीठावर नेमणुक, हैद्राबाद मुक्ती संग्रामात विद्यार्थी दशेत सहभाग, साने गुरुजी सेवा पथक आणि विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात सहभाग या विविधांगी क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे.
संदर्भ : क्षेत्र संशोधन