रणसूभे, सूर्यनारायण माणिकराव : (७ ऑगस्ट १९४२). हिंदी आणि मराठी साहित्याचे अभ्यासक, समीक्षक आणि दोन्ही भाषांतील दलित आणि वैचारिक साहित्याचे परस्पर अनुवादक. गुलबर्गा येथे एका सामान्य कुटुंबात यांचा जन्म झाला. प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण शासकीय महाविद्यालय, गुलबर्गा येथे घेतले. इलाहाबाद विश्वविद्यालय, इलाहाबाद येथे (१९६५) एम. ए. हिंदी (प्रथम श्रेणीत उत्तीर्ण) ही पदवी प्राप्त केली. भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांनी मिळत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे १९७९ ला देश विभाजन और हिंदी कथा साहित्य या विषयात त्यांनी पीएच. डी. ही पदवी प्राप्त केली. त्यांच्या वाङ्मयीन जडणघडणीवर साने गुरूजी, बाबूराव अर्नाळकर यांचा प्रभाव आहे. शाळेत साने गुरुजींच्या साहित्य वाचनातून मूल्याचे संस्कार झाले तर बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्य कथांमुळे भाषेचे संस्कार झाले. ही लेखनप्रेरणा घेऊन रणसुभे यांनी लेखन केले. दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे हिंदी विषयाचे अध्यापक म्हणुन त्यांनी सन १९६५ ते २००२ पर्यंत काम केले. याकाळात सृजनशील लेखनापेक्षा समीक्षा लेखनाकडे ते वळले. त्यातही दलित साहित्याच्या अनुवादावर अधिक भर दिला. हिंदीमध्ये दलित साहित्य हा शब्द रुजवण्याचे श्रेय रणसुभे यांनी द्यावे लागते.
आधुनिक मराठी साहित्य का प्रकृतिमूलक इतिहास (१९७६) या ग्रंथाने त्यांच्या समीक्षा लेखनाची सुरुवात झाली. यात आधुनिक मराठी साहित्याची जाणीव हिंदी साहित्यास करुन देऊन दलित साहित्य, मराठवाड्यातील दलित साहित्य, कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रवाहाची ओळख हिंदी भाषिक अभ्यासकांना सर्वप्रथम करुन देण्याचे काम या ग्रंथाने केले. तसेच मराठी लेखकांची ओळख हिंदी भाषिकांना करून देण्याचे फार मोठे काम या ग्रंथाने केले. सूर्यनारायण रणसूभे यांची साहित्य संपदा
मराठीतून हिंदीत अनुवादीत केलेले साहित्य : आत्मकथा – अक्करमाशी (शरणकुमार लिंबाळे, १९८१), उठाईगीर (लक्ष्मण गायकवाड १९९२), यादों के पंछी (प्र. ई. सोनकांबळे, १९९८); वैचारिक – भारतीय मुसलमानों की मानसिकता और सामाजिक संरचना (जनार्दन वाघमारे, १९९९), मनुष्य और धर्मचिंतन (रावसाहेब कसबे, २००९), पिछडों का सामाजिक – राजनितीक आंदोलन (उत्तम कांबळे, २००९), दलितों के उद्धारक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. प्रल्हाद लुलेकर, २०१३), मानसिक तनाव और योगासन (भागवत दळवी, २०१३), डॉ. बाबासाहेब आंबेडकर और उनका धम्म (प्रभाकर वैद्य, २०१७); नाटक – साक्षीपुरम ( रामनाथ चव्हाण, २००६), क्रांति नीले नभ की ( रामनाथ चव्हाण, २०१५), अश्मक (दत्ता भगत, २०१५); कादंबरी – बहुजन (शरणकुमार लिंबाळे, २००९), काला सूरज (उत्तम कांबळे, २०१७), बुद्ध का रहट (उत्तम कांबळे, ०१७); समीक्षा – टीका – स्वयंवर’ ( डॉ. भालचंद्र नेमाडे, २०१६); संपादित ग्रंथांचे अनुवाद – दलित साहित्य : वेदना और विद्रोह (शरणकुमार लिंबाळे, २०१०), प्रज्ञासूर्य (शरणकुमार लिंबाळे, २०१३), दलित साहित्य की वैचारिक पृष्ठभूमी (जे. एम. वाघमारे) (२०१४). इत्यादी. हिंदीतून मराठीत अनुवादीत केलेले ग्रंथ : वैचारिक – मार्क्सवादाचे आजच्या काळातील महत्त्व (एजाज अहमद, ९९७), मार्क्सवादाचे स्वप्न आणि नवीन फेरमांडणी ( रमेश उपाध्याय, १९९७); समीक्षा संरचनावाद, उत्तर-संरचनावाद और प्राच्य काव्यशास्त्र (गोपीचंद नारंग, २००५); उपन्यास – झूठा-सच (यशपाल, २००४), याशिवाय त्यांचे ललित आणि वैचारिक लेखसंग्रहही पुढीलप्रमाणे प्रसिद्ध आहोत. : स्पंदन (१९९७), कहाणी संस्कृतीची’(२००१), मी, तुम्ही धर्म आणि सत्ता (२००४), अनुवाद वर्णव्यवस्था आणि मी (२००६), समता, केसरी, एकमत, विचारशलाका अशा वृत्तपत्र व नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या लेखांचे संग्रह आहेत. तसेच हैद्राबाद मुक्तीसंग्राम व मी : स्मृतिशेष चंद्रशेखर बाजपेयी (१९९७), हे आत्मकथन शब्दांकित केले. तसेच राजाराम राठोड (१९९७), जे. एम. वाघमारे (१९९८, २०११), पूरणमल लाहोटी (२००५) या महनीय व्यक्तींवरील गौरवग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. याशिवाय दलित साहित्य : स्वरुप और संवेदना (२००९),पत्रकरिता के युग निर्माता : भीमराव आंबेडकर (२०१०), उन्नसीवी सदी का नवजागरण और हिंदी साहित्य (२०१३), बीसवी सदी का नवजागरण और हिंदी साहित्य (२०१३), कहाणी भारतीय संस्कृति की (२०१५), विमर्श की अवधारणा (२०१७), हिंदी साहित्य : भारतेन्दु एवं द्विवेदी युगीन काल (२०१७), हिंदी साहित्य : आधुनिक काव्य का इतिहास (२०१७), हिंदी साहित्य : गद्य साहित्य का इतिहास (२०१७) हे त्यांचे हिंदीतील समीक्षा ग्रंथ लेखन होय.
कहानीकार कमलेश्वरःसंदर्भ और प्रकृती (१९७७) या त्यांच्या ग्रंथात कमलेश्वरांच्या दहा कथांची निवड करुन त्यांचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. कथांमधून येणारे जीवन वास्तव व साहित्यातून येणारे वास्तव यांचा तौलनिक अभ्यास या ग्रंथात मांडलेला आहे. यातून कमलेश यांच्या साहित्यातील वास्तवता शोधण्याचा प्रयत्न केला आहे. देश विभाजन और हिंदी कथा साहित्य (१९८१) हा पीएच. डी. चा प्रबंध ग्रंथरुपात प्रकाशित केला असून हा फाळणी विषयी भाष्य करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात फाळणी का झाली, फाळणीला कोणती कारणे होती याचे विश्लेषण केले आहे. तसेच हिंदी, उर्दू, बंगाली व पंजाबी या साहित्यातील कथा व कादंबरी यात फाळणीचे प्रतिबिंब किती आले आहे आणि ते किती वास्तव आहे याचा शोध घेतलेला आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक विश्लेषणाच्या आधारे ही मांडणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जीवनी, १९९३) हा अनुवादीत परंतु स्वतंत्र ग्रंथ असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन अनेक संदर्भांच्या, साधनसामग्रीच्या आधारे स्वतःचा दृष्टिकोन ठेवून चरित्र लेखन केले आहे. जीवनीपर साहित्य (१९९८), प्रादेशिक भाषा और साहित्य-इतिहास (२००४), आधुनिक हिंदी साहित्य का इतिहास (२००५), अनुवाद का समाजशास्त्र (२००९) या ग्रंथात संस्कृतमधील अनुवादाची परंपरा शोधुन त्या आधारे वर्णनव्यवस्थेमुळे या देशात अनुवादाची परंपरा नाही असे त्यांनी प्रतिपादित केले. अनुवाद तिथेच होतो जिथे समतावादी समाज, समतावादी विचार असतो. जो समाज अहंकारात जगत असतो तो दुसर्याबद्दल नीट विचार करू शकत नाही. याची त्यांनी मांडणी केली त्यामुळे अनेक आधार या ग्रंथात दिलेले आहेत.
सूर्यनारायण रणसुभे यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यात उत्कृष्ट अनुवादासाठी भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाचा पुरस्कार (यादों के पंछी, १९८५), महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई तर्फे ‘मराठी भाषिक लेखक के रुप में गजानन माधव मुक्तिबोध पुरस्कार’ (१९८९), हैद्राबाद हिंदी प्रचार सभा, हैद्राबाद तर्फे ‘साहित्य विशारद की उपाधी’ (१९९४), मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार (झुठा सच), उत्तर प्रदेश हिंदी संस्थानतर्फे सौहार्द पुरस्कार (२००७), आचार्य आनंदऋषी साहित्य पुरस्कार (२००९), महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार, महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार (२००९), हिंदी साहित्य संमेलन प्रयाग द्वारा साहित्य वाचस्पती पुरस्कार (२०१४), म. गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय, वर्धा यांच्या तर्फे हिंदी सेवी सम्मान (२०१५) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश होतो.
संदर्भ :
- यादव सतीश ; आगळे श्यामसुंदर ; रोडे विजयकुमार, लोकधर्मी लोकचिंतक: डॉ. सुर्यनारायण रणसुभे, परिदृश्य प्रकाशन, २०१९.