डोळस, अविनाश : ( ११ डिसेंबर १९५० – ११ नोव्हेंबर २०१८). अविनाश शंकर डोळस. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक. फुले – शाहू – आंबेडकर या विचारप्रणालीत त्यांनी लेखन केले असून, राजकीय कार्यकर्ता अशी त्यांची एक ओळख आहे. त्यांचा जन्म आंबे-दिंडोरी, ता. दिंडोरी, जि.नाशिक येथे झाला. प्राथमिक शिक्षण आंबे-दिंडोरी, माध्यमिक शिक्षण मराठा हायस्कूल नाशिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद कला महाविद्यालय,औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे झाले. मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे मराठी साहित्य विषयाचे प्राध्यापक (१९७४-२००८) आणि विभाग प्रमुख (१९९५-२००८) म्हणून त्यांनी कार्य केले. अखिल भारतीय दलित नाट्य परिषद (१९९९) व दलित युवक आघाडी (१९७१) अशा विविध संस्थांवर जबाबदारीच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे. एक गाव एक पाणवठा मोहीम, मराठवाडा विकास आंदोलन व मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा या ऐतिहासिक घटनांत त्यांचा सहभाग राहिला आहे.

अविनाश डोळस यांची साहित्य संपदा : कथासंग्रह : महासंगर (१९८३); समीक्षा : मराठी दलित कथा (१९८८), आंबेडकरी विचार आणि साहित्य (१९९४), आंबेडकरी चळवळ: परिवर्तनाचे संदर्भ (१९९५), सम्यक दृष्टीतून (२००९); अनुवाद : जातिव्यवस्थेचे निर्मूलन (अन्हिलेशन ऑफ कास्ट, २०१५) ; संपादने : प्रबुद्ध भारत (२००१-२००२), अस्तित्व (द्वैमासिक,१९७७-१९८३), पुरोगामी सत्यशोधक, मिलिंद मॅगेझिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर त्यांची सदस्यसचिव पदावर निवड झाली (२०११). या चरित्र साधनेतील खंड १ व २, खंड ५, खंड ११ (इंग्रजी), खंड १६ व खंड १८ चे तीन भाग (मराठी) आणि चवदार तळे कोर्ट केस (खंड ३, शोध सामग्री) या खंडांचे मुद्रणपूर्व संपादकीय कार्य त्यांनी केले आहे. दलित साहित्य आणि चळवळ, दलित विद्यार्थ्यी आणि त्यांचे प्रश्न, स्त्रीमुक्ती चळवळ, आंबेडकरवाद यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रात प्रासंगिक लेखन केले आहे.

अस्पृश्य म्हणून ज्यांचे शोषण झाले तो जनसामान्य वर्ग हा अविनाश डोळस यांच्या कथांचे उपजीव्य आहे. त्यांच्या कथेचा नायक जातीय विषमता व दारिद्र्याच्या गर्तेत फसलेला असून सुद्धा आपला स्वाभिमान जागृत ठेवतो आणि आपल्या अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी संघर्ष करतो. ‘प्रथा’ या त्यांच्या कथेची पाळेमुळे ही ग्रामीण जीवनाशी संबंधित आहेत. या कथेचा नायक दलित तरुण आहे. हा तरुण सुशिक्षित आहे एवढेच नव्हे तर त्याच्या मनात उच्चविद्याविभूषित होण्याची उत्कट उर्मी आहे. महत्त्वाकांक्षी आणि इतरांप्रमाणे प्रतिष्ठित व समताधिष्ठित जीवन सहजपणे व स्वाभाविक जगता यावे यासाठी प्रयत्न करणारा नायक हे डोळस यांच्या कथेचे वैशिष्ट्य आहे. ‘घेर’ या कथेमध्ये महार व मातंग या ज्ञातीबांधवांतील परस्परसंबंधांचे चित्रण आलेले आहे. ‘ग्लिसरीन’ या कथेद्वारे दलितांमधील शोषण अधोरेखित केलेले आहे. ‘हेल्पलेस’ ही कथा एक गाव एक पाणवठा या चळवळीशी संबंधित आहे. ‘शांती दुताच्या शोधात’ ही कथा मराठवाडा विद्यापीठ नामांतराशी संबंधित आहे‌. ‘वटवृक्ष उन्मळून पडतोय’ ही कथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या रिपब्लिकन पक्षाच्या झालेल्या वाताहतीवर भाष्य करणारी आहे. एकंदरीतच डोळस यांच्या कथा या दलितांच्या सामाजिक राजकीय अशा विविध बाजूंवर भाष्य करणाऱ्या, सत्य प्रकर्षाने मांडणाऱ्या आणि परिवर्तनवादी बदलांना शब्दबद्ध करणाऱ्या आहेत. त्यामुळे समकालीन ऐतिहासिक घटिते ही डोळस यांच्या कथेमध्ये सातत्याने येतात. या कथा दलितांच्या ऐतिहासिक संदर्भाने सुद्धा ओतप्रोत भरलेल्या आहेत. त्यांच्या महासंगर या कथासंग्रहातील काही कथांचा अनुवाद भारतीय व पाश्चात्त्य भाषेत झालेला आहे. अर्जुन डांगळे यांनी संपादित केलेला पॉयझन्ड ब्रेड हा दलित साहित्यविषयक ग्रंथ, स्टीफन आल्टर व बिमल दसनायके यांनी संपादित केलेला दि पेंग्विन बुक ऑफ मॉडर्न इंडियन शॉर्ट स्टोरीज हा ग्रंथ – या ग्रंथांत त्यांच्या कथांचा समावेश केलेला आहे. अभिजात कथा म्हणून त्यांच्या ‘बळी’ या कथेचा दि पेंग्विन बुक…या संग्रहात गौरव केला आहे.

अस्तित्व या त्यांच्या प्रकाशनातर्फे त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. राजकीय चळवळ आणि राजकारण यांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, जळगाव (१९९०), अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, नांदेड (१९९१), अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, वडसा (२००५) इत्यादी अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते. साहित्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. समीक्षा सौंदर्यशास्त्र राज्य पुरस्कार महाराष्ट्र शासन (१९९४-९५), बी. रघुनाथ उत्कृष्ट कथा लेखन पुरस्कार (१९७१) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

औरंगाबाद येथे अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले.

संदर्भ :

  • मुन, संजय; सरवदे, वाल्मीक; भवरे, महेंद्र; दोतोंडे, राम; शिरसाठ,भारत (संपा), डोळस : प्रा.अविनाश डोळस गौरवग्रंथ, उल्हासनगर, २०१७.
  • मोरे, दिनेश, मराठवाड्यातील दलित चळवळीचा इतिहास (इ.स. २००० पर्यंत), औरंगाबाद, २०१६.