ब्यूकानन, जेम्स एम. : (३ ऑक्टोबर १९१९ – ९ जानेवारी २०१३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. ब्यूकानन यांनी विकसित केलेल्या सार्वजनिक निवड सिद्धांत (Public Choice Theory) या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी १९८६ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले. राजकारणी लोकांचे हितसंबंध व आर्थिकेतर घटक देशाच्या आर्थिक धोरणावर कसा प्रभाव टाकतात, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले.
ब्यूकानन यांचा जन्म अमेरिकेतील मर्फ्रीस्बोरो (टेनेसी) येथे झाला. टेनेसी प्रांताचे तत्कालीन राज्यपाल जॉन पां. ब्यूकानन यांचे ते नातू. त्यांनी १९४१ मध्ये ‘मिडल टेनेसी स्टेट विद्यापीठाʼतून एम. एस. ही पदवी प्राप्त केली. काही काळ युद्धादरम्यान होनोलुलू येथे ॲडमिरल निमित्झ यांच्या दलात त्यांनी काम केले. त्यांनी १९४५ मध्ये ॲनी बक्के या नॉर्वेजियन युवतीशी विवाह केला. १९४८ मध्ये शिकागो विद्यापीठातून ‘फिस्कल इक्विटी इन अ फेडरल स्टेट’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच. डी. ही पदवी संपादित केली. १९५६ – १९६८ या काळात व्हर्जिनिया विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे त्यांनी अध्यापन केले. तेथे त्यांनी ‘थॉमस जेफर्सन सेंटर फॉर स्टडीज इन पॉलिटिकल इकॉनॉमी’ ही संघटना स्थापन केली. त्यांनी १९६८-६९ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस अँजेल्स येथे अध्यापन केले. पुढे १९६९ – १९८३ या काळात ‘व्हर्जिनिया पॉलिटिकल इन्स्टिट्यूट’मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. दरम्यान फ्लॉरिडा स्टेट विद्यापीठ व टेनेसी विद्यापीठ यांच्याशीही ते संलग्न होते. १९८८ मध्ये युद्धपश्चात ते हवाईला परतले व तेथे त्यांनी राजकीय अर्थशास्त्रावर अनेक व्याख्याने दिली. पुढे त्यांची ही व्याख्याने युनिव्हर्सिटी प्रेसकडून प्रसिद्ध केली गेली.
ब्यूकानन यांनी सार्वजनिक व्यय, कर्जे, स्थूल अर्थशास्त्र, घटनात्मक अर्थशास्त्र स्वातंत्र्याचे राजकीय तत्त्वज्ञान असे अनेक विषय अभ्यासले. राजकीय अर्थशास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यांच्या मते, बाजारपेठांत खरेदी करताना ग्राहकांचे जसे धरसोडीचे वर्तन असते, तसेच वर्तन राजकारणी लोकांचेही असते. त्यांची ही मानसिकता त्यांच्या कृतीतून व वर्तनातून दिसून येते व पुन्हा निवडून यावे, हीच त्यामागची प्रेरणा असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत सार्वजनिक पैसा अधिक खर्च करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे देशाच्या अंदाजपत्रकात तूट राहते. त्यावर उपाय म्हणजे लोकप्रतिनिधींच्या सार्वजनिक खर्च करण्यावर त्यांनी काही निर्बंध घातले. त्यासाठी अमेरिकन काँग्रेसने घटनात्मक दुरुस्ती करून पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.
ब्यूकानन यांनी आपल्या राजकीय अर्थशास्त्र सिद्धांताचा विनियोग राजकारणातील निर्णयप्रक्रियेचे विश्लेषण करण्यासाठी केला. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली. त्यांचे यासंदर्भातील विचार प्रमाण नसून ज्याकडे विद्वान दुर्लक्ष करतात त्या साध्या व साधारण अशा सामान्य दृष्टिकोनाकडे लक्ष वेधण्याचा हेतू असल्याचे स्वत: ब्यूकानन यांनी सांगितले. त्याबद्दल अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड विल्सन रेगन (Ronald Wilson Reagan) यांच्या प्रशासनातील अनेकांनी त्यांचे कौतुक केले. ब्यूकानन यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे अमेरिकेची घटना अमलात येण्यापूर्वी व ती अमलात आल्यानंतर लोकांच्या निवड स्वातंत्र्यामध्ये झालेल्या बदलांचा अर्थशास्त्रीय अभ्यास. विशिष्ट खेळापूर्वी त्याबाबत केलेले नियम व नियमांना अधीन राहून खेळ करणे या उदाहरणाने घटना पश्चात लोकांकडून होणाऱ्या आर्थिक व्यवहारासंबंधीच्या वर्तनाचे वर्णन केलेले आहे. त्यांनी आपल्या सहकारी अर्थतज्ञांना बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून काम करावे, राजकारणात लक्ष घालू नये, असा सल्लाही दिला. हा संदेश संबंधितांपर्यंत जावा यासाठी त्यांनी घटनात्मक अर्थशास्त्र हे नियतकालिक सुरू केले.
ब्यूकानन यांचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध झाले : फिस्कल थिअरी ॲण्ड पॉलिटिकल इकॉनॉमी (१९६०), दि कॅलक्यूलस ऑफ कन्सेंट (१९६२-सहलेखक), डिमांड ॲण्ड सप्लाय ऑफ पब्लिक गुड्स (१९६८), पब्लिक प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक डेट (१९५८), पब्लिक फायनान्स इन डेमोक्रॅटिक प्रोसेस (१९६७), कॉस्ट ॲण्ड चॉइस (१९६९), दि लिमिट्स ऑफ लिबर्टी (१९७५), डेमॉक्रसी इन डेफिसिट (१९७७-सहलेखक), फ्रीडम इन कॉन्स्टिट्यूशनल काँट्रॅक्ट (१९७८), व्हॉट शूड इकॉनॉमिस्ट्स डू? (१९७९), दि पॉवर टू टॅक्स (१९८०-सहलेखक), दि रिझन ऑफ रूल्स (१९८५ – सहलेखक), लिबर्टी मार्केट ॲण्ड स्टेट (१९८५).
ब्यूकानन यांचे व्हर्जिनिया प्रांतातील ब्लॅक्सबर्ग येथे निधन झाले.
समीक्षक – संतोष दास्ताने