उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. सुमारे ३१० किमी. लांबीच्या आणि ८५ किमी. रुंदीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ सुमारे १९,०१० चौ. किमी. असून एकूण जलवाहनक्षेत्र ६४,०२५ चौ. किमी. आहे. हे सरोवर समुद्रसपाटीपासून ७५ मी. उंचीवर असून त्याची सरासरी खोली ८७ मी. आणि कमाल खोली २४४ मी. आहे. इ. स. १६१५ मध्ये फ्रेंच समन्वेषक सॅम्यूएल द शांप्लँ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सरोवराचा शोध लावला. इ. स. १७६३ च्या सुमारास फ्रेंचांकडून याचा ताबा ब्रिटिशांकडे आला. हिमयुगीन घडामोडीत निर्माण झालेली ही पंचमहा सरोवरे आहेत. आँटॅरिओ सरोवराच्या उत्तरेस, पश्चिमेस व नैर्ऋत्येस कॅनडाचा आँटॅरिओ प्रांत असून दक्षिणेस आणि पूर्वेस अ. सं. सं.चे न्यूयॉर्क राज्य आहे. या दोन प्रांत व राज्यांची म्हणजेच कॅनडा व अ. सं. सं. या दोन देशांची आंतरराष्ट्रीय सीमा या सरोवरच्या मध्यातून जाते. नायगारा इस्कार्पमेंट हा तुटलेल्या कड्यांचा प्रदेश या सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असून येथे त्याचा विस्तार पश्चिम-पूर्व असा झालेला आहे. सरोवरातील पाणी प्रतिदिनी १३ किमी. वेगाने वाहते. दक्षिण किनाऱ्यावरील वेग सर्वाधिक आहे.
आँटॅरिओ सरोवराला मिळणारी नायगारा ही प्रमुख नदी असून जेनेसी, ऑस्वीगो व ब्लॅक या नद्या दक्षिणेकडून व ट्रेंट ही नदी उत्तरेकडून मिळते. सरोवराच्या अगदी पूर्व भागात पाच बेटांची मालिका असून तेथूनच सेंट लॉरेन्स नदीचा प्रवाह सुरू होतो. सेंट लॉरेन्स नदीद्वारे हे सरोवर अटलांटिक महासागराशी जोडले गेले आहे. नायगारा नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि वेलंड कालव्याने आँटॅरिओ सरोवर पंचमहा सरोवरांपैकी एक असलेल्या ईअरी सरोवराशी जोडले आहे. त्यामुळे ईअरी सरोवरातील पाणी नायगारा नदी व वेलंड कालव्याद्वारे आँटॅरिओ सरोवरात येते. या दोन सरोवरांदरम्यानच्या नायगारा नदीमार्गात असलेला जगप्रसिद्ध नायगारा धबधबा हा जलवाहतुकीतील प्रमुख अडथळा आहे. त्यामुळे नायगारा धबधबा टाळून काढलेल्या जलवाहतूकयोग्य वेलंड कालव्याने ही दोन सरोवरे एकमेकांना जोडली आहेत. ऑस्वीगो (न्यूयॉर्क) येथे आँटॅरिओ सरोवर नूयॉर्क राज्य कालवा प्रणालीशी जोडले आहे. आँटॅरिओ सरोवराच्या पश्चिमेस ह्यूरन हे पंचमहा सरोवरांपैकी एक सरोवर आहे. त्या सरोवरातील जॉर्जियन उपसागर ट्रेंट कालव्याने या सरोवराशी जोडला आहे. रिडो कालवा हा एक प्रमुख अंतर्गत जलमार्ग असून त्यामुळे ओटावा नदी आँटॅरिओ सरोवराशी जोडली गेली आहे. किंग्स्टन, टोरँटो, हॅमिल्टन (कॅनडा) व रॉचेस्टर, ऑस्वीगो (अ.सं.सं) ही या सरोवरातील प्रमुख बंदरे आहेत. हीच येथील प्रमुख शहरे असून त्यांभोवती उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. हिवाळ्यात सरोवराचा केवळ किनाऱ्याजवळचा भाग गोठलेला असतो आणि तेथील बंदरे मध्य डिसेंबर ते मध्य एप्रिल यांदरम्यान हिमवेष्टित असतात. सेंट लॉरेन्स नदीच्या मुखाकडील प्रदेश हिवाळ्यात गोठत असल्याने या सरोवरातून मर्यादित वाहतूक चालते.
सरोवराच्या उत्तरेकडील भूमी विस्तृत मैदानी प्रदेशाखाली असून तेथे मोठ्या प्रमाणावर कृषिविकास झालेला आहे. अतिरिक्त मासेमारी, सरोवरातील पाण्याचे प्रदूषण इत्यादी प्रतिकूल घटक असले, तरी तेथील गोड्या पाण्यातील व्यापारी मासेमारी महत्त्वाची आहे. येथे ईल माशांची पकड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सरोवराच्या किनाऱ्यावर असलेली राज्य व प्रांतीय उद्द्याने, वाळूचे दांडे, सुंदर पुळणी, सुरक्षित बंदरे, हौसी मासेमारी, शिकारीच्या सुविधा इत्यादींमुळे या सरोवराच्या परिसरात फार मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
समीक्षक : ना. स. गाडे