प्राचीन भारतातील एक समृद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र, बंदर व बौद्ध स्थळ. सोपारा म्हणजेच आजच्या मुंबई उपनगरातील ‘नाला सोपारा’. हे ठिकाण अरबी समुद्राला मिळणाऱ्या ‘वैतरणा’ व ‘उल्हास’ नद्यांच्या मधोमध वसलेले आहे.

सोपारा येथील स्तूपाचे अवशेष.

सोपाऱ्याचा सर्वांत प्राचीन उल्लेख महाभारतात एक पवित्र क्षेत्र म्हणून सापडतो. प्राचीन काळी सोपारा ‘अपरांत’ प्रांताच्या राजधानीचे ठिकाण समजले जात असे. विविध ग्रंथांमध्ये या ठिकाणाला ‘शूर्पारक’ (संस्कृत), ‘सोपारा’ (प्राकृत), ‘सुप्पारा’ (ग्रीक), ‘ऑफिर’ (हिब्रू), ‘सुबारा’ (अरबी) इ. नावांनी संबोधले आहे. महाभारताच्या आरण्यक पर्वात तसेच नहपानाच्या नाशिक शिलालेखात सोपारा येथील रामतीर्थाचा पवित्र स्थळ म्हणून उल्लेख सापडतो. ऋषभदत्ताने येथे विश्रांतीगृहे आणि भिक्षागृहे उभारली होती. इ. स. तिसऱ्या शतकात येथील काही दानकर्त्यांनी कान्हेरी येथील लेण्यांना दाने दिली होती.

प्राचीन बौद्ध साहित्यांतही सोपाऱ्याचा संदर्भ एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून येतो. या ग्रंथांप्रमाणे गौतम बुद्धांच्या काळातच बौद्ध धर्माचे आगमन सोपाऱ्यात झाले होते. थेरीगाथा  या ग्रंथात येथील रहिवाशी ‘पुन्न’ (पूर्ण) चा उल्लेख आलेला आहे, जो श्रावस्तीमध्ये बुद्धांकडून दीक्षित होऊन बौद्ध भिक्षू बनला होता. पूर्णाच्या विनंतीवरून स्वतः गौतम बुद्ध सोपाऱ्यास आल्याचे म्हटले जाते. पूर्णावदान या ग्रंथानुसार त्याने श्रावस्तीहून परतल्यानंतर सोपाऱ्यात ‘चंदनमाला प्रासाद’ (गंध कुटी) ची स्थापना केली होती. तसेच गौतम बुद्ध ‘बोधिसत्त्व’ (सोपारा बोधिसत्त्व) म्हणून सोपारा येथे जन्माला आल्याच्या समजुतीमुळे हे ठिकाण त्या काळीच बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकिकास प्राप्त झाले होते. सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथील तिसऱ्या धर्मपरिषदेनंतर (इ. स. पू. २५६) ‘यवन धर्मरक्षित’ (यवन धम्मरक्खित) या बौद्ध भिक्षूला अपरांतात (कोकणात) बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ पाठविले होते. सातवाहन काळात सोपारा हे भारत आणि रोम दरम्यानच्या समृद्ध व्यापाराचे एक केंद्र होते. सातवाहनांच्या आर्थिक उलाढालीत सोपाऱ्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सातव्या शतकात प्रसिद्ध चिनी यात्री व बौद्ध भिक्षू ह्यूएन त्संग याने या स्थानाला भेट दिली होती.

सम्राट अशोक यांचा शिलालेख, सोपारा.

टॉलेमी (इ. स. ५०), तसेच मसुदी (दहावे शतक), अल्-बीरूनी (अकरावे शतक), अल्-इद्रिसी (बारावे शतक) या यात्रींनी सुबाराचा (सोपारा) उल्लेख एक उत्कृष्ट व्यापारी केंद्र म्हणून केलेला आहे. कॉझ्मास इंडिकोप्लूस्ट्स (Cosmas Indicopleuestes) या ग्रंथाप्रमाणे पाचव्या शतकात हे ठिकाण कल्याण व मलबार दरम्यान एक अग्रगण्य व्यापारी केंद्र होते. नवव्या शतकातील कुवलयमाला या ग्रंथात या स्थानाचा उल्लेख मिळतो. शिलाहारांच्या काळात (नववे ते तेरावे शतक) हे एक समृद्ध ठिकाण म्हणून अबाधित होते. सोपारा येथून वेगवेगळ्या काळात हस्तीदंत, शंख-शिंपले, रेशीम व हत्ती-घोडे इत्यादींचा व्यापार चालत असे.

गौतम बुद्ध यांच्या सोपारा प्रवेशाची प्रचलित दंतकथा, सम्राट अशोकाचे शिलालेख व येथील बौद्धस्तूपामुळे बौद्ध धर्म व सोपाऱ्याचे संबंध अधिक मजबूत झालेले आहेत. सोपारा येथे अनेक पुरातत्त्वीय अवशेष आढळले आहेत. यांपैकी सम्राट अशोकाच्या राजाज्ञेपैकी ८ व ९ क्रमांकाचे भग्न शिलालेख येथे सापडले आहेत. या दोन शिलालेखांपैकी आठव्याचा शोध भगवानलाल इंद्रजी (१८८२) व नवव्याचा शोध एन. ए. गोरे यांनी लावला.

सोपाऱ्यापासून पश्चिमेला अर्ध्या किमी. अंतरावर ‘बुरुड राजाचा कोट’ नावाचे एक प्राचीन टेकाड आहे. या टेकाडाचे १८८२ साली भगवानलाल इंद्रजी यांनी उत्खनन केले. त्यांना येथे एका विशाल स्तूपाचे अवशेष तसेच अनेक महत्त्वाच्या पुरातन वस्तू आढळल्या. त्यामध्ये  कास्याच्या सात मानुषी बुद्ध तसेच मैत्रेय यांच्या मूर्ती, बुद्ध पात्र, रक्षा करंडक इ. पुरातन वस्तूंचा समावेश होता. यावेळी त्यांना यज्ञश्री सातकर्णीची (इ. स. १७०-९९) काही नाणीही मिळाली. यावरून भगवानलाल इंद्रजी यांनी या स्तूपाचा काळ इ. स. दुसऱ्या शतकाचा उत्तरार्ध ठरविला. यानंतर हेन्री कझिन्स यांनी याच ठिकाणी सखोल उत्खनन केले, त्यात इंद्रजींनी शोधलेल्या स्तूपापेक्षाही प्राचीन अशा एका अन्य स्तूपाचे अवशेष आढळून आले. सोबत आहत नाणी, मौर्य काळातील वृत्तचितीच्या आकाराचा अस्थी करंडक (ज्यावर मौर्यकालीन ब्राह्मी अक्षरे कोरण्यात आलेली होती) व सातवाहनकालीन नाणी प्राप्त झाली. विद्वानांच्या मते असे सांगितले जाते की, आठव्या-नवव्या शतकात हा स्तूप पुन्हा एकदा खोलला गेला असावा आणि त्यामध्ये मागाहून अस्थी व बौद्ध पात्र क्रमशः तांबे, अश्म, स्फटिक, चांदी व सोन्याच्या एकातएक असलेल्या करंडकासह कास्याचे मानुषी व मैत्रेय बुद्ध एका विटांच्या पोकळीत ठेवले गेले असावेत.

के. एन. दीक्षित व डग्लस बॅरेट यांच्या मते, मानुषी बुद्धाच्या मूर्ती या नंतरच्या काळातील असून सातव्या-आठव्या शतकाशी संबंधित आहेत. सदाशिव गोरक्षकर यांच्या मते, कास्य मूर्ती इ. स. नवव्या शतकामधील आहेत.

सोपारा येथे काही हिंदू मंदिरांचे अवशेषही आढळले आहेत. शिल्पांमध्ये ब्रह्माचे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणतः दहाव्या शतकानंतर अनेक जैन वाङ्मयीन परंपरांमध्ये सोपाऱ्याचा एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख येतो. सोपाऱ्याजवळील ‘गास’ गावपरिसरात अनेक जैन अवशेष सापडतात. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी येथे जैन संप्रदाय कार्यरत होता.

संदर्भ :

  • Cousens, Henry, Progress Report of the Archaeological Survey of Western India for the Year ending June, Bombay, 1898.
  • Dhavalikar, M. K. Cultural Heritage of Mumbai, Mumbai, 2016.
  • Gorakshkar, Sadashiv, ‘Sopara – Abode of Buddhas Seven Supreme,’ JAS, Bombay, Dr. Bhagwanlal Indraji Vol., Bombay, (1986-87).
  • Pandit, Suraj, ‘The legendary Sopara’, livehistoryindia.com. 2017.

                                                                                                                                                                         समीक्षक : मंजिरी भालेराव