खन्ना, विनोद : (६ ऑक्टोबर १९४६ – २७ एप्रिल २०१७). हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते. त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) येथे झाला. भारताची फाळणी झाल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये आले. त्यांच्या वडिलांचे नाव किसनचंद खन्ना आणि आईचे नाव कमल होते. विनोद खन्ना यांच्या वडिलांचा कपडे आणि रसायनांचा व्यापार होता. विनोद खन्ना यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सेंटमेरी स्कूलमध्ये झाले. १९६० नंतर पुढील शिक्षण नाशिकमधील बर्नेस स्कूल या निवासी शाळेमध्ये झाले. मुंबईतील सिडनहम कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यांना हिंदी, मराठी, इंग्लिश, पंजाबी या भाषा चांगल्या बोलता येत होत्या. शालेय वयात अभिनयाशी संबंधित केलेल्या कार्यक्रमांमुळे त्यांना पुढे अभिनयाची आवड निर्माण झाली; पण याच क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांच्या घरून त्यांना विरोध होता.

प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांच्या मन का मीत ( १९६८) या चित्रपटामधून विनोद खन्ना यांना पहिल्यांदा संधी मिळाली. यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. त्यांच्या सुरुवातीच्या पूरब और पश्चिम, सच्चा झुठा, आन मिलो सजना, मस्ताना, ऐलान इत्यादी चित्रपटांमधून त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या. हम तुम और वो (१९७१) हा नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर गुलजार यांची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन असलेला मेरे अपने (१९७१) हा बंगाली आपनजन याचा हिंदीमध्ये रूपांतर केलेला चित्रपट विनोद खन्नांसाठी महत्त्वाचा ठरला. यामध्ये त्यांनी श्याम या दमदार तरुणाची भूमिका केली होती. हा चित्रपट गाजला. पुढे गुलजार यांच्या अचानक (१९७३) या चित्रपटात त्यांनी रणजित खन्ना या प्रामाणिक सैनिकी अधिकाऱ्याची केलेली करारी भूमिका लक्षणीय ठरली. याच टप्प्यावर ते खलनायकाच्या भूमिकेकडून नायकाच्या भूमिकेकडे वळले. नायक अथवा सहनायक अशा भूमिका साकारत त्यांनी आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली. फरेबी, हत्यारा, आप की खातिर, राजमहल, द बर्निंग ट्रेन, इम्तिहान, खूनपसीना, मेमसाब, प्रेम कहानी, इन्कार, कुर्बान, दयावान, हेराफेरी, अमर अकबर अँथनी, हाथ की सफाई, इन्सान, नेहले पे देहला, रेश्मा और शेरा, सरकारी मेहमान, दौलत, लेकिन, मीरा, हमशकल, शंकर शंभू, आरोप, परिचय, एक हसीना दो दिवाने अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रकाश मेहरा दिग्दर्शित हाथ की सफाई ( १९७५) या चित्रपटामध्ये रणधीर कपूर यांच्यासोबत विनोद खन्ना सहनायक होते. एकीकडे मोठा तस्कर तर दुसरीकडे प्रेमळ नवरा अशी भूमिका या चित्रपटात त्यांनी निभावली. प्रकाश मेहरा दिग्दर्शित मुकद्दर का सिकंदर (१९७८) या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या मित्राची – विशाल आनंद या वकीलाची – भूमिका विनोद खन्ना यांनी केली. त्यांच्या कारकीर्दीतील हा एक लोकप्रिय चित्रपट आहे. राखी, विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. दोघांची पडद्यावरील मैत्री प्रेक्षकांना भावली. या चित्रपटामधील विशाल या पात्रासाठी विनोद खन्ना यांना फिल्मफेअरचे सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचे नामांकन मिळाले. अतिशय डौलदार चाल, भेदक नजर आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते. लता मंगेशकर निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित लेकिन हा विनोद खन्नांच्या कारकिर्दीतील एक उल्लेखनीय चित्रपट आहे.

१९७१ मध्ये विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गीतांजली यांच्यासोबत लग्न केले. त्यांना अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना अशी दोन मुले आहेत. विनोद खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीतून अचानक निवृत्ती घेतली (१९८२) व आचार्य रजनीश यांचे शिष्यत्व स्वीकारले. विनोद खन्ना पाच वर्षे अमेरिकेत ओशो रजनीश यांच्या आश्रमात राहत होते. १९८५ मध्ये ते पुन्हा मुंबईत आल्यानंतर गीतांजली आणि त्यांचा घटस्फोट झाला. १९९० मध्ये त्यांनी कविता दफ्तरी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. विनोद आणि कविता खन्ना यांना साक्षी आणि श्रद्धा खन्ना ही दोन मुले आहेत.

१९८७ मध्ये विनोद खन्ना यांनी चित्रपटसृष्टीतइन्साफ या चित्रपटामधून पुनरागमन केले. त्यानंतर त्यांनी सत्यमेव जयते, महासंग्राम, क्षत्रिय, कारनामा, रिहाई, बटवारा, चांदनी इत्यादी चित्रपटांत भूमिका साकारल्या. १९९७ साली त्यांनी हिमालयपुत्र या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातून त्यांचा मुलगा अक्षय खन्ना याने नायकाची भूमिका केली होती. नंतरच्या काळात त्यांनी वाँटेड, दबंग, रेड अलर्ट द वॉर विदिन इत्यादी चित्रपटांत चरित्रभूमिका साकारल्या. रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट.

विनोद खन्ना यांनी चित्रपटाबरोबरच राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला आणि ते यशस्वीही ठरले. १९९७ साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि ते पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. ते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री होते. पुढे परराष्ट्र व्यवहार खात्यातही कार्यरत होते.

विनोद खन्ना यांना अनेक पुरस्कार मिळाले. हाथ की सफाई या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. २००० मध्ये विनोद खन्ना यांना चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. विनोद खन्ना यांना त्यांच्या मृत्युनंतर चित्रपट कारकीर्दीसाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वयाच्या  ७० व्या वर्षी मुंबईमध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले.