अर्थ : संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे, काळजीपूर्वक परीक्षण करणे. संशोधन म्हणजे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ज्ञानाचे व माहितीचे प्रमाणीकरण करून नवीन ज्ञानाची भर टाकण्यासाठी केलेले प्रणाली गत परीक्षण होय. फ्रेंच रूथ एम यांच्या मते ‘संशोधन ही एक अडचण सोडविणारी, पद्धतशीर व ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे त्याची सखोल, पूर्ण, शास्त्रीय माहिती देणारी अत्यावश्यक पद्धती आहे.’ प्रामुख्याने संशोधन म्हणजे पद्धतशीर व वस्तुनिष्ठ पृथक्करण करून मिळवलेल्या निरीक्षणाची नोंद करणे, ज्यामुळे सामान्य विधान, तत्त्वे, सिद्धांत व निकाल प्रमाणित करता येतात.
सर्वसाधारणपणे संशोधनाचे प्रमुख ध्येय हे व्यवसायिक ज्ञानात शास्त्रीय दृष्ट्या भर टाकणे हे आहे. परिचर्या संशोधन हेही ही याच अर्थात मोडते. परिचर्या शुश्रूषा हा एक सराव व कृती व्यवसाय आहे ज्यामध्ये संशोधन ज्ञानात भर टाकण्यासाठी व त्याला परिष्कृत करण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. कारण त्यावर रुग्णांची शुश्रूषा अवलंबून असते. ज्या परिचर्या कार्यरत असतात त्यांना या संशोधनातून निर्माण झालेले ज्ञान व त्यावर आधारित कृती करून रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांसाठी आशावादी निकालासाठी संशोधनाची प्रामुख्याने गरज असते. रुग्णांचे व त्याच्या नातेवाईकांचे आरोग्य व आजाराचे अनुभव समजून घेण्यासाठी, रुग्णांचे आरोग्य संवर्धन करून परिणामकारक व गुणात्मक तसेच रुग्णांना परवडणारी शुश्रूषा देण्यासाठी परिचर्या संशोधन कार्य करते.
व्याख्या-
बन्स नॅन्सी आणि ग्रुव्ह सुझन : ‘परिचर्या संशोधन ही अशी शास्त्रीय प्रक्रिया आहे की जे अस्तित्वातील ज्ञानाला प्रमाणित आणि शुद्ध करते आणि नवीन ज्ञानाची उत्पत्ती करते की जे ज्ञान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परिचर्या सराव व कार्याला प्रभावित करते.’
पोलीट आणि हँगलर : ‘परिचर्या संशोधन म्हणजे परिचर्या व्यवसायातील महत्त्वाच्या मुद्द्यांशी निगडीत ज्ञानासाठी केलेला प्रणालीगत शोध होय.’
पोलीट आणि बेक : ‘परिचर्या संशोधन म्हणजे परिचर्या व्यवसायातील महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी प्रणालीगत चौकशी करून विश्वासार्ह पुरावा विकसित करणे होय.’
वरील परिचर्या संशोधनाविषयीच्या व्याख्या स्पष्टपणे विशद करतात की, परिचर्या संशोधन ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे जी परिचर्या व्यवसायातील कार्याविषयी पुरावे निर्माण करून त्याला प्रभावित करते.
संदर्भ :
- सामंत कुसुम, शुश्रूषा संशोधन, २०११, .
- बसवंतअप्पा बि. टी. नर्सिंग रिसर्च, तिसरी आवृत्ती २०१४.
- बन्स नॅन्सी, ग्रुव्ह सुझन, अंडरस्टँडिंग नर्सिंग रिसर्च चौथी आवृत्ती २००८.
- पोलीट अंड बेक, नर्सिंग रिसर्च, दहावी आवृत्ती २०१६.
समीक्षक : सरोज वा. उपासनी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.