अंतरकर, शिवराम सदाशिव : (२१ जून १९३१—१८ डिसेंबर २०१८). आधुनिक भारतीय तत्त्वज्ञ. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डुगवे ह्या गावी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण (१९३७‒४१) जन्मगावी पूर्ण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण (१९४१‒४८) चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. १९४८ पासून मुंबई महानगरपालिकेत ते रुजू झाले. नोकरी सांभाळून जवळील सिद्धार्थ महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते १९५७ साली बी. ए. (ऑनर्स) व १९६० साली एम. ए. उत्तीर्ण झाले. ते वल्लभ-वेदांत पारितोषिकाचे मानकरी होते. १९६०‒६५ पार्ले महाविद्यालयात, १९६५‒६८ रुपारेल महाविद्यालयात, तर १९६८ ते १९८६ गोवा पदव्युत्तर केंद्रात त्यांनी तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. १९८६ साली मुंबई विद्यापीठाने तत्त्वज्ञान विभाग सुरू केला, तेव्हा प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून ते गोव्याहून मुंबईस आले. १९९१ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पाच वर्षे दादरच्या इंडियन एज्युकेशन संस्थेच्या प्रगत संशोधन केंद्रात मानद प्राध्यापक म्हणून कार्य करून १९९६ ते २००५ मध्ये पुन्हा मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात जैन अकादमी व संशोधन केंद्रात ते मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले.
जैन अकादमीची पायाभरणी करताना त्यांच्या हातून झालेले सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जैनधर्मीयांना आपल्या धर्माकडे डोळसपणे पाहायला सांगितले. त्यासाठी त्यांनी जैन धर्मगुरूंकडे जाऊन अध्ययन केले, जैन तत्त्वज्ञान वाचून समजून घेतले व जी शंकास्थळे वाटली, त्याबाबत जैनधर्मीयांशी चर्चा केली. आपले म्हणणे त्यांच्यावार न लादता त्यांना विचारप्रवृत्त केले आणि मुख्य म्हणजे कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता त्यांनी विचारमंथनास चालना दिली. संवेदनशील विषय कौशल्यपूर्वक हाताळण्याचे कसब असल्याने हे त्यांना शक्य झाले. अहिंसा व अनेकांतवाद या मूलभूत संकल्पनांचे त्यांनी केलेले विश्लेषण व स्पष्टीकरण अत्यंत तर्कशुद्ध पायावर आधारलेले होते. कार्ल पॉपरच्या तीन विश्वांच्या अनुषंगाने त्यांनी केलेली जैन विचारांची मांडणी व प्रत्येक सिद्धांताला लावलेले बुद्धिप्रामाण्यवादी निकष जैन अभ्यासंकासमोर विचारांचे नवे दालन उघडून गेले. जैन अकादमीचे प्रमुख या नात्याने त्यांनी प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाने व प्रदीप गोखले, मीनल कातरणीकर यांच्या सहभागाने रिकलेक्शन, रेकग्निशन अँड रिझनिंग हा जैनांच्या परोक्षप्रमाणविषयक विचारांचा वेध घेणारा ग्रंथ साकारला.
एकंदरीत, तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी जे शक्य आहे, ते त्यांनी केले. हे करत असताना ते ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदे’च्या स्थापनेपासून त्यात सहभागी झाले. सुरुवातीला उपाध्यक्ष व मग १९९५ ते २००१ मध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी परिषदेच्या कार्यास दिशा दिली. मराठी तत्त्वज्ञान महाकोशात त्यांनी पंचवीस नोंदी लिहिल्या. ‘इंडियन फिलॉसफिकल असोसिएशन’ व ‘बॉम्बे फिलॉसफिकल असोसिएशन’ पुनरुज्जीवित केल्या. तत्त्वज्ञान-मंदिर (अमळनेर) व परामर्श या नियतकालिकांच्या संपादन-सल्लागार मंडळाचे सदस्य या नात्याने वैचारिक दिशा दिली. परामर्शच्या एयर विशेषांकाचे अतिथी-संपादन (मे, १९९०) केले. विद्यार्थ्यांना एम. फिल.; पीएच. डी.साठी मार्गदर्शन केले. वि. दा. करंदीकरांच्या अष्टदर्शने ह्या तत्त्वकाव्यास व्यासंगपूर्ण प्रस्तावना लिहिली. आंतरधर्मीय संवादांतर्गत त्यांची पोपशीही भेट झाली.
पूर्वायुष्यात अंतरकर हे कीर्तन-प्रवचनाची परंपरा पाळून होते. के. वि. बेलसरे व १९६३ पासून पीएच. डी.चे मार्गदर्शक जे. एन. चब यांच्यामुळे तत्त्वज्ञानाचा विचार भारतात व भारताबाहेर कसा केला जातो, हे पाहावयाची त्यांना संधी मिळाली. ‘अतिभौतिकीधिष्ठित नीतिशास्त्रा’वरील त्यांचा पीएच. डी.चा प्रबंध व प्रत्येक शोध-निबंध, भाषण, व्याख्यान म्हणजे जीवनाचा गांभीर्यपूर्ण शोध होय. विषयाचे गांभीर्य ओळखून (पण प्रसंगी विनोद, चेष्टा-मस्करी, हास्यपूर्ण रीतीने) ते तत्त्वज्ञानातील गुंतागुंत सोपी करून समजावत. अकादमीय तत्त्वज्ञान व तत्त्वज्ञ त्यांच्या विशेष आवडीचे असले, तरी विद्यापीठीय वर्तुळाबाहेरील तत्त्वज्ञान ते जाणून होते. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.
जीवन व्यामिश्र, गुंतागुंतीचे, जटील आहे; जीवनविषयक उत्तरे झटदिशी गणितासारखी सोडवता येत नाहीत; ती समस्यांचा विचारपूर्वक मागोवा घेत विज्ञानाच्या पायावर नीतीच्या शिडीने अध्यात्माचे शिखर गाठता येते. मात्र जागरूकता, चिकाटी, परिश्रम व पूर्वग्रहविरहित दृष्टी त्यासाठी आवश्यक असते, हे त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या व्याख्यानातून, लेखनातून व चर्चेतून ते ठळकपणे दिसते. झापडेबंद, ठोकळेबाज, साचेबद्ध जीवनापेक्षा चिकित्सक जीवन, पारखलेले डोळस जीवन त्यांनी आदर्श मानले. परंपरेत पाय रोवून आधुनिक दृष्टीने जग पाहणार्या महाराष्ट्रातील तत्त्वचिंतकात ते अग्रस्थानी होते. पायाभूत अहिंसा, सत्यादी मूल्यांसोबत ‘स्वातंत्र्य, ममता, परमतसहिष्णुता’ त्यांनी अधोरेखित केली. एअरप्रणित तार्किक प्रत्यक्षार्थवाद समजून घेतला. लँग्वेज, टूथ अँड लॉजिक या ग्रंथाचे भाषांतर करून भाषा, सत्य आणि तर्क (१९७४) प्रसिद्ध केल्याने मराठी वाचकापर्यंत तत्त्वज्ञानाची तत्कालीन संकल्पना पोहोचली. डिसेंबर १९७९ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठात ‘रिलिजियस लाईफ अँड सायंटिफिक आऊटलुक’ या विषयावर दिलेले गुरुदेव रा. द. रानडे स्मृतिव्याख्यान प्रसिद्ध आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा अवधानी पुरस्कार प्राप्त संतांचे तत्त्वज्ञान आणि धर्मविचार (२०१०) हा लेखसंग्रह परंपरेचा विचार आधुनिक संदर्भात करतो. ‘जेथे जातो तू माझा संगती’ म्हणजे कल्पनातील, दिक्कालातीत परमेश्वर नसून माझ्या नित्यानुभवता असणारी, सतत होत असणारी जाणीव, जागरूकता हा विचार त्यांनी मांडला. जे. कृष्णमूर्ती, बौद्धदर्शन, ज्ञानेश्वरी, दासबोध, ईशावास्यवृती यांच्याबरोबरीने सॉक्रेटीस, कांटस्ट्रॉसन, राइल, डमेट यांच्या तत्त्वचर्चेत रममाण होण्याचा त्यांचा स्वभाव सर्व विद्यार्थ्यांस परिचित आहे. संशोधकाची सत्यान्वेषी नि विनम्र, अनाग्रही वृत्ती व त्याचबरोबरीने व्यासंगातून आलेला आत्मविश्वास ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.
तात्पर्य, अंतरकर यांच्या विचारप्रवासाचे चार टप्पे सांगता येतात. परंपरागत रीतिरिवाजांचे पालन करणारा पहिला टप्पा. एअरच्या तार्किक प्रत्यक्षार्थवादाला प्रमाण मानणारा दुसरा टप्पा. तिसर्या टप्प्यावर जैन धर्माचा अभ्यास करून तो विद्यार्थ्यांसमोर मांडला व त्या संदर्भातील तत्त्वचिंतनास चालना दिली. जैन अकादमी व संशोधन केंद्रातून ते निवृत्त झाले असले, तरी त्यांचा तत्त्वज्ञानाचा व्यासंग दीर्घकाळ स्वान्तःसुखाय राहिला. चौथ्या अखेरच्या टप्प्यावर वाचन, चिंतन, मनन यांमुळे संतांकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन त्यांनी दिला.
त्यांचे ठाणे येथे निधन झाले.
समीक्षक : मीनल कातरणीकर