एक सस्तन प्राणी. मुंगसाचा समावेश स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील मांसाहारी गणाच्या हर्पेस्टिडी कुलात होतो. आफ्रिकेत, आशियात आणि यूरोपात मिळून त्यांच्या ३३ जाती आढळतात. त्यांपैकी बऱ्याच जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात त्यांच्या सहा जाती असून त्यांपैकी सर्वत्र आढळणाऱ्या मुंगसाचे शास्त्रीय नाव हर्पिस्टिस एडवर्डसी आहे.

मुंगूस (हर्पिस्टिस एडवर्डसी)

भारतातील मुंगसाच्या शरीराची लांबी ३४–४५ सेंमी. असते. शेपटी जवळजवळ शरीराएवढीच लांब असते. शरीराचा रंग पिवळसर तपकिरी असून पोटाकडचा रंग फिकट असतो. अंगावर केस असतात. तोंड निमुळते, कान लहान आणि पाय आखूड असतात. दात आणि पंजे अतिशय तीक्ष्ण असतात. नर हा मादीपेक्षा मोठा असतो. मुंगूस गावाशेजारील पडक्या वास्तूत, मोकळ्या जागांत, माळरानावर, गवताळ जागी, झुडपांमध्ये किंवा रानात एकेकटे किंवा तीन-चारांच्या गटात फिरताना आढळतात.

मुंगूस स्वत: तयार केलेल्या बिळात राहते. ते दिवसा वावरते. चाहूल लागताच ते तत्क्षणी मागील दोन पायांवर उभे राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेताना दिसते. काही वेळा ते वर उडी मारणे व लोळण घेणे अशा करामती ही करते.

लहान सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी व त्यांची अंडी, साप, विंचू, बेडूक व कीटक हे मुंगसाचे प्रमुख भक्ष्य आहे. अंड्याला भोक पाडून ते अंड्यातील बलक शोषून घेते. ते कधीकधी कंदमुळे व फळेही खाते. ते जरी शाकाहारी अन्न घेत असले, तरी मांसाहार करते. मांसाचे तुकडे करण्यासाठी आणि खाण्यासाठी त्याचे दात सोयीचे असतात.

मुंगूस अतिशय चपळ, सावध आणि धीट प्राणी आहे. बहुधा ते आपले भक्ष्य पाठलाग करून पकडते. वेगाने पळताना तोल सांभाळून वेग कमी न करता चटकन वळण घेणे हे मुंगसाचे एक वैशिष्ट्य आहे. भक्ष्यावर हल्ला करताना ते बिळात जाऊन लपले तर मुंगूस तीक्ष्ण नखांनी बीळ उकरून भक्ष्याला शोधून काढते. स्वभावाने ते हिंस्र असून वेळप्रसंगी आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या असलेल्या प्राण्यांवर हल्ला करते.

मुंगसाच्या विणीचा ठरावीक कालावधी नसतो. मादीला प्रत्येक खेपेला दोन किंवा तीन पिले होतात. पिलांचे संगोपन मादी करते. साधारणपणे सात महिन्यांत त्यांची पूर्ण वाढ होते व पिले स्वतंत्रपणे जगू लागतात.

साप हे मुंगसाचे विशेष भक्ष्य आहे. नागासारखे विषारी प्राणीही ते चपळतेने पकडते. ते सापाचे किंवा नागाचे डोके तोंडात धरून चटकन त्याची कवटी फोडून त्याला मारते. त्या झटपटीत सापाचे विषारी दात आपल्याला लागणार नाहीत याचीही ते दक्षता घेते. सापाचे विष मुंगसाला घातक नसते, ही समजूत निराधार आहे. सापाचे विष कमी प्रमाणात असल्यास, त्याचा मुंगसावर परिणाम होत नाही आणि त्या विषापासून मुंगूस सुरक्षित असते, असे संशोधनातून आढळले आहे. वेग, चपळता, समयसूचकता आणि शरीरावरचे दाट केस ह्या वैशिष्ट्यांमुळे मुंगूस आणि साप यांच्या लढाईत अनेकदा मुंगूस सरस ठरते.

भारतात आढळणाऱ्या मुंगसाच्या इतर जातीं हर्पिस्टिस स्मिथी, हर्पिस्टिस जावानिकस, हर्पिस्टिस फ्युकस, हर्पिस्टिस व्हिटिकोलीस आणि हर्पिस्टिस युरव्हा या आहेत. हर्पिस्टिस स्मिथी ही जाती आकाराने मोठी व रंगाने लालसर असते. भारताशिवाय ती श्रीलंकेतही आढळते. हर्पिस्टिस जावानिकस ही जाती लहान असूनही साप मारण्यात पटाईत मानली जाते. भारत, पाकिस्तान व अफगाणिस्तान येथे ती आढळते. हर्पिस्टिस फ्युकस ही जाती दक्षिण भारतातील पर्वतांच्या रांगांमध्ये आढळते. तिचा रंग तपकिरी असतो. हर्पिस्टिस व्हिटिकोलीस ही जाती भारताच्या सह्याद्रीच्या वनांमध्ये आढळते. ती आकाराने मोठी असते. हर्पिस्टिस युरव्हा ही जाती खेकडे खाणारी आहे. ती पोहू शकते. भारत, चीन व तैवान येथे ती आढळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा