चित्रपटप्रेमींची सदस्यता असलेली संस्था. इथे अन्यथा चित्रपटगृहांमध्ये सहसा पाहायला न मिळणारे कलात्मक चित्रपट सदस्यांना दाखवले जातात, कला म्हणून त्यांची चर्चा केली जाते. जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट सदस्यांना दाखवणे, त्यांविषयी पत्रके वा अभ्याससाहित्य निर्माण करणे, चर्चा-परिसंवाद-चित्रपटमहोत्सव यांचे आयोजन करणे व त्याद्वारे चित्रपटकलेचा प्रचार व प्रसार करणे हे फिल्म सोसायटीचे उद्दिष्ट असते. भारतात तिला ‘फिल्म सोसायटी’ तर यूरोपात त्यास ‘फिल्म क्लब’ अथवा ‘सिने क्लब’ असे म्हंटले जाते. अशा फिल्म सोसायटींमधील परस्पर आदानप्रदानातून उभे राहिलेले जाळे म्हणजे फिल्म सोसायटी चळवळ. ही एक आंतरराष्ट्रीय, अ-राजकीय आणि सांस्कृतिक चळवळ आहे.
ल्यूम्येअर बंधूंनी चित्रपटनिर्मिती केल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी १९२० मध्ये पॅरिसमध्येच ल्यूई दी ल्यूक (Luis de Louke) यांनी ‘सिनेक्लब’ची स्थापना केली, तर १९२४ मध्ये ‘सिने क्लब दी फ्रान्स’ची स्थापना झाली. त्यापुढील अवघ्या तीन वर्षांत फ्रान्समध्ये अशा सुमारे अशा २४ संस्था उदयाला आल्या. लंडनमध्ये ‘फिल्म सोसायटी’ची स्थापना २५ ऑक्टोबर १९२५ रोजी झाली. प्रख्यात इंग्रजी साहित्यिक एच. जी. वेल्स आणि जॉर्ज बर्नाड शॉ हे तिच्या संस्थापक सदस्यांपैकी होते. याच काळात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका इत्यादी देशांमध्येही अशा फिल्म सोसायटींनी मूळ धरले. त्यातूनच पुढे फिल्म सोसायटींच्या छत्रसंस्था म्हणून – कॅनडियन फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी (कॅनडा, १९३०), ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी (इंग्लंड, १९३५), सेन्ट्रल फिल्म्स कौन्सिल (स्कॉटलंड, १९३६) आदी संस्था उदयाला आल्या.
पहिल्या महायुद्धानंतर चित्रपटव्यवसायाला चालना मिळाली. यूरोपात निर्माण होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढली. मात्र जे चित्रपट व्यावसायिक प्रेक्षागृहांतून प्रदर्शित होऊ शकत नसत, त्यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने १९२५ मध्ये वेगवेगळ्या शहरांमधून फिल्म सोसायटींची निर्मिती करण्यात आली. फिल्म सोसायटींमध्ये प्रेक्षकांसाठी आयोजित केलेल्या चित्रपटफितींची देवाणघेवाण करणे, चित्रपटांसंबंधीची विशेष माहिती एकमेकांना देणे, चित्रपट-निर्मात्यांकडून फिल्म सोसायटींच्या खेळांसाठी चित्रपट मिळवण्यासंबंधी वाटाघाटी करणे, या कामांच्या निकडीतून ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी’ या शिखर संस्थेची स्थापना वेलवाईन (Welwyn) येथे सप्टेंबर १९३२ मध्ये करण्यात आली. दुर्दैवाने या संस्थेचे कार्य जोर धरू शकले नाही. त्यानंतर १९३६ मध्ये ‘स्कॉटिश फिल्म सोसायटी’ने ‘फेडरेशन ऑफ स्कॉटिश फिल्म सोसायटी’ची स्थापना केली. या संस्थेने जगभरातील फिल्म सोसायटींसाठी कार्याचा आदर्श नमुना प्रस्थापित केला. यातून प्रेरणा घेऊन मुंबईमधील इलस्ट्रेटेड विकलीचे ब्रिटिश संपादक स्टॅन्ले जेफसन यांनी मुंबईत १९२९ मध्ये ‘अमॅच्युर फिल्म सोसायटी’ स्थापन केली. मुंबईतील हौशी दिग्दर्शकांना लघुपट निर्माण करण्यास या सोसायटीने प्रवृत्त केले.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ५ ऑक्टोबर १९४७ रोजी सत्यजित राय यांनी कोलकाता येथे ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ची स्थापना केली. या फिल्म सोसायटीच्या पहिल्या बैठकीत सत्यजित राय, चिदानंद दासगुप्ता, हिरेन संन्याल, यांच्यासह एकोणीस सदस्य उपस्थित होते. व्यावसायिक चित्रपटांपेक्षा वेगळी कलामूल्ये असणारे चित्रपट सदस्यांना दाखवणे, चित्रपटविषयक चर्चासत्र घडवून आणणे, चित्रपटविषयक अभ्यासपूर्ण पत्रके छापणे आणि १६ एमएम कॅमेराच्या साहाय्याने माहितीपटांची निर्मिती करणे, हे उद्देश समोर ठेवून कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना झाली.
फिल्म सोसायटीमध्ये पाहिलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटांमुळे सत्यजित राय यांना कलात्मक चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. व्ही.शांताराम, बिमल रॉय, गुरुदत्त या भारतीय चित्रपट दिग्दर्शकांनी चित्रपटाचे कलामूल्य ओळखले होते; मात्र त्यांना तत्कालीन चित्रपटांची व्यावसायिक चाकोरी तोडणे शक्य झाले नाही. सत्यजित राय यांच्या पथेर पांचालीने ती चाकोरी तोडली. सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याशी नाते सांगणाऱ्या या चित्रपटाने भारतात कलात्मक चित्रपटांची सुरुवात केली. मृणाल सेन, ऋत्विक घटक यांनीदेखील अशा प्रकारचे चित्रपट निर्माण केले. चित्रपटांकडून मनोरंजनापेक्षा अधिक अपेक्षा ठेवणारा प्रेक्षकवर्ग त्यामुळे निर्माण झाला. भारतात १९५२ पासून सुरू झालेल्या व दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या मुख्य शहरांतून आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून जागतिक दर्जाचा चित्रपट पाहण्याची संधी भारतीय प्रेक्षकांना मिळू लागली. उत्तम दर्जाचे चित्रपट नियमितपणे पाहता यावे, या गरजेपोटी भारतातील प्रमुख शहरांमध्ये अनेक फिल्म सोसायटी निर्माण झाल्या.
सत्यजित राय यांच्याप्रमाणेच अदूर गोपालकृष्णन यांनी केरळमध्ये ‘चित्रलेखा’ ही फिल्म सोसायटी स्थापन केली. भारतातील कलात्मक चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून नावाजले गेलेले शाम बेनेगल, बासू भट्टाचार्य, गिरीश कासारवल्ली यांसारख्या दिग्दर्शकांनीदेखील फिल्म सोसायटींमधूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईमध्ये बॉम्बे फिल्म सोसायटी, आनंदम् या फिल्म सोसायटी पन्नास व साठच्या दशकात कार्यरत होत्या. १९६८ साली चित्रपट प्रसिद्धीकुशल पत्रकार वसंत साठे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रभात चित्र मंडळ’ या चित्रपटसाक्षर प्रेक्षक घडवणाऱ्या फिल्म सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सोलापूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे फिल्म सोसायटी चळवळीचे कार्य जोमाने वाढले. पुण्यातील आशय फिल्म क्लब, कोल्हापूरची महर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी यांच्यातर्फे चित्रपट रसास्वाद शिबिरे, आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांचे आयोजन सातत्याने करण्यात येते. चित्रपटसंस्कृतीच्या प्रसाराला लिखित शब्दांची जोड असावी यासाठी नियतकालिकांचे प्रकाशन फिल्म सोसायटींद्वारा करण्यात येते. प्रभात चित्र मंडळाद्वारे गेली पंचवीस वर्षे वास्तव रूपवाणी या नियतकालिकातून चित्रपटविषयक अभ्यासपूर्ण लेखन प्रकाशित केले जाते.
फिल्म सोसायटी चळवळीला सुसूत्रता आणण्यासाठी सत्यजित राय यांच्या अध्यक्षतेखाली ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ या शिखर संस्थेची स्थापना १३ डिसेंबर १९५९ रोजी करण्यात आली. कलकत्ता फिल्म सोसायटी, बॉम्बे फिल्म सोसायटी, दिल्ली फिल्म सोसायटी, द मद्रास फिल्म सोसायटी, पाटना फिल्म सोसायटी आणि रुकरी फिल्म सोसायटी या सहा फिल्म सोसायटी ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ च्या पहिल्या सदस्य संस्था होत्या. फेडरेशनचे पहिले अध्यक्ष म्हणून सत्यजित राय यांची निवड करण्यात आली. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि इंद्रकुमार गुजराल हेदेखील या चळवळीत सहभागी झाले होते.
चित्रपट कला आणि सामाजिक मूल्ये यांचा अभ्यास करणे, कलात्मक मूल्ये असणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, चित्रपटरसास्वादाची शिबिरे आयोजित करून प्रेक्षकांमध्ये चित्रपट आस्वादनाची क्षमता निर्माण करणे, चित्रपटविषयक संशोधनास मदत करणे, भारतातील विविध फिल्म सोसायटींमध्ये समन्वय साधून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणे, यांसाठी विविध देशांचे दूतावास व संबंधित संस्थांशी संपर्क करणे या कामांची उद्दिष्टे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या वेळी कार्यकर्त्यांसमोर ठेवली गेली. भारतभर फिल्म सोसायटींचा प्रसार झाल्यानंतर फेडरेशनचे कार्य सुलभ व्हावे यासाठी त्याचे पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर अशा चार विभागांमध्ये विभाजन करण्यात आले. या चारही विभागांतील फिल्म सोसायटींच्या कार्यकर्त्यांची प्रादेशिक विभागाचे पदाधिकारी व सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येते. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडियाचे केंद्रीय कार्यालय कोलकाता येथे आहे. सध्या भारतात चारशेहून अधिक सोसायटी कार्यरत आहेत.
२००६ साली फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष शाम बेनेगल यांनी फिल्म सोसायटी चळवळ विद्यार्थिवर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी कॅम्पस फिल्म सोसायटीची संकल्पना मांडली. आज महाराष्ट्रातील पंचवीस महाविद्यालयांतून कॅम्पस फिल्म सोसायटी कार्यरत आहेत.
फिल्म सोसायटी ही प्रेक्षक-चळवळ आहे. प्रेक्षकांची अभिरुची उंचावली, की कलात्मक चित्रपटांची निर्मिती सुकर होईल असा विश्वास या चळवळीने निर्माण केला आहे.
समीक्षक : अभिजीत देशपांडे