क जीवनसत्त्व पाण्यात विद्राव्य असून काही अन्नपदार्थांत ते नैसर्गिकरित्या सापडते. याचा समावेश ब जीवनसत्त्व समूहात होत नाही. याची रचना एकशर्करा रेणू (Monosaccharide) सारखी आहे.
इतिहास : १९३२ मध्ये सी. जी. किंग (C. G. King) व डब्ल्यू. ए. वॉग (W. A. Waugh) या पिट्सबर्ग विद्यापीठातील वैज्ञानिकांनी व हंगेरीतील ॲल्बर्ट झेंट-जॉर्जी (Albert Szent-Györgyi) यांनी क जीवनसत्त्वाचे रासायनिक पृथक्करण एकाच वेळी केले. जॉर्जी यांनी त्याचे साखरेसारखे गुणधर्म असल्याने या जीवनसत्त्वाचे नाव इग्नोज (Ignose) असे ठेवले. त्यानंतर हे जीवनसत्त्व अॅस्कॉर्बिक अम्ल या नावाने ओळखले गेले. १९३३ मध्ये इंग्लंडचे रसायन वैज्ञानिक सर वॉल्टर नॉर्मन हॉवर्थ (Sir Walter Norman Haworth) आणि सर एडमंड हर्स्ट (Sir Edmund Hirst) यांनी स्वतंत्रपणे क जीवनसत्त्वाचे कृत्रिमरित्या संश्लेषण केले. हॉवर्थ यांना त्याबद्दल १९३७ मध्ये रसायन शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. १९७० मध्ये लायनस पॉलिंग (Linus Pauling) यांनी आपल्या व्हिटॅमीन सी अॅंड द कॉमन कोल्ड (Vitamin C and the common cold) या पुस्तकात असे प्रसिद्ध केले की, क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास सर्दी नाहिशी होते. यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. मोठ्या मात्रेत अॅस्कॉर्बिक अम्ल घेतल्यास सर्दी आटोक्यात येऊ शकते, असे आजही काही वैद्यक, तज्ञ तसेच वैज्ञानिक मानतात.
रासायनिक संरचना : अनेक सजीवांमध्ये ग्लुकोजपासून क जीवनसत्त्वाचे संश्लेषण होऊ शकते. मानवी शरीरात गुलोनोलॅक्टोन ऑक्सिडेझ (L-gulonolactone oxidase) विकराच्या अभावामुळे जीवनसत्त्व क संश्लेषित होत नाही. क जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव एल-अॅस्कॉर्बिक अम्ल (L-Ascorbic acid) असे आहे. याची रासायनिक संज्ञा C6H8O6 असून याचे रेण्वीय वस्तुमान १७६.१४ ग्रॅम/मोल आहे.
स्रोत : आवळा हा क जीवनसत्त्वाचा उच्च स्त्रोत आहे. १०० ग्रॅ. आवळ्यामध्ये ७०० मिग्रॅ., तर पेरूमध्ये ३०० मिग्रॅ. क जीवनसत्त्व मिळते. संत्री, मोसंबी व लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे; अननस, आंबा, पपई, द्राक्षे, पीच, केळी, सफरचंद, फणस इत्यादी फळे; गाजर, बटाटा, कोबी वाटाणा, घेवडा, टोमॅटो इत्यादी फळभाज्या; चुका, पालक, मेथी, मुळ्याची पाने, हरभरा, कोथिंबीर, करडई इत्यादी पालेभाज्या यांतून क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. मोड आलेल्या कडधान्यात देखील पुरेसे क जीवनसत्त्व असते. रोजच्या दुधातून ते पुरेसे मिळत नाही. परंतु, गाईच्या व आईच्या दुधात बाळाच्या गरजेपूरते क जीवनसत्त्व असते.
प्रमाण व शारीरिक गरज : शरीरात पेशी व स्नायू यांमध्ये एकावेळी ३०० मिग्रॅ.पासून २ ग्रॅ.पर्यंत क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात साठवलेले असते. तसेच पांढऱ्या पेशी, डोळे, अधिवृक्क ग्रंथी (Adrenal glands), पीयुषिका ग्रंथी (Pituitary gland) आणि मेंदू यांमध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण सर्वाधिक असते; तर पेशीबाह्य द्रव, रक्तजल (Plazma), तांबड्या पेशी आणि लाळ यांमध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण सर्वांत कमी असते.
सर्वसामान्य व्यक्तीची क जीवनसत्त्वाची आवश्यकता ४५—५० मिग्रॅ. एवढी आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मदतीने रोजच्या आहारातील क जीवनसत्त्वाची गरज पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहे — सहा महिने ते १२ वर्षांपर्यंत ३० मिग्रॅ., १३ ते १८ वर्षांपर्यंत ३०—५० मिग्रॅ., प्रौढ स्त्री-पुरुष यांना ४५—५० मिग्रॅ. आणि प्रसूत स्त्रियांना ८० मिग्रॅ. इतक्या क जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
उपयोग : क जीवनसत्त्व शरीर बांधणीचे काम सीमेंटप्रमाणे करते. शरीरातील पेशी परस्परांना चिकट स्रावाने चिकटवून ठेवण्यासाठी तसेच या चिकट स्रावाच्या वाढीसाठी व हा स्राव कायम टिकून राहावा यासाठी क जीवनसत्त्व अत्यावश्यक असते, म्हणून त्याला स्नायूंचे जीवनसत्त्व (Cellular vitamin) असेही म्हणतात. जखम भरून काढण्यासाठी, केशवाहिन्यांच्या एकसंधतेसाठी, रक्तवाहिन्यांच्या विकास व वाढीसाठी तसेच दात, हाडे आणि कूर्चा यांसाठी ते अत्यावश्यक असते. चयापचय क्रियेतील काही क्रिया क जीवनसत्त्वाशिवाय घडू शकत नाहीत. क जीवनसत्त्वामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. तसेच या जीवनसत्त्वामुळे कोलॅजेन (Collagen) तंतू अधिक बळकट होतात.
अधोवृक्क ग्रंथीचे (Adrenal gland) कार्य सुरळीत चालण्यासाठी क जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. अधोवृक्क व शीर्षस्थ अशा दोन्ही ग्रंथी मिळून अधोवृक्क-पोष (Adrenal-Pituitary) अक्ष निर्माण करून प्रजोत्पादन क्रिया व्यवस्थित पार पाडण्यास साहाय्यभूत ठरतात. प्रजोत्पादन क्रियेत इतरही ग्रंथींचा सहभाग असतो. त्या ग्रंथी कार्यक्षम राहाव्यात यासाठीही क जीवनसत्त्व उपयुक्त आहे. डोळे, पांढऱ्या पेशी, यकृत आणि मेंदू यांना क जीवनसत्त्वाची अधिक गरज असते. क जीवनसत्त्व प्रतिऑक्सिडीरोधक (Antioxidant) असून त्याच्या सान्निध्यात कोणतीही ऑक्सिडीकरण क्रिया घडत नाही. त्याच्या सान्निध्यात अ आणि ई जीवनसत्त्वांचे ऑक्सिडीकरण होत नाही. कोविड साथीच्या काळात क जीवनसत्त्व आणि झिंक बाहेरून पुरवल्यास प्रतिक्षमता वाढल्याचे दिसून आले आहे.
पदार्थांची वाहतूक, त्यांवरील प्रक्रिया व त्यांची साठवणूक इत्यादी क्रियांमध्ये क जीवनसत्त्व नष्ट होते. त्याचप्रमाणे फळे सकाळी आणून संध्याकाळपर्यंत शीतकपाटामध्ये (Refrigerator) ठेवली असता त्यातील बरेचसे क जीवनसत्त्व नष्ट होते. इतर जीवनसत्त्वांपेक्षा क जीवनसत्त्व फार लवकर नष्ट होत असल्याने कृत्रिम पद्धतींनी ते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. कृत्रिम पद्धतींनी क जीवनसत्त्व मिळवण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. शीत पेयांना फळांचा सुगंध देताना त्यात कृत्रिमरित्या बनवलेले अॅस्कॉर्बिक अम्ल मिसळले जाते. कित्येक हवाबंद अन्नपदार्थांत क जीवनसत्त्व मिसळले जाते जेणेकरून त्या पदार्थांचे ऑक्सिडीकरण होणार नाही. काही वेळा मांसामध्ये (Meat) क जीवनसत्त्व घातले जाते जेणेकरून त्यामध्ये नायट्रोसॅमिन (Nitrosamine) तयार होणार नाही. कारण नायट्रोसॅमिन कर्करोगास साहाय्यकारक आहे.
इन्यूइट (Inuit) आणि एस्कीमो (Eskimo) लोक पिढ्यांनपिढ्या ध्रुवीय प्रदेशात राहत असल्याने त्यांच्या आहारात धान्य व फळांचा समावेश नव्हता. त्यांच्या आहारात बेलूगा व्हेल (Beluga whale) आणि नॉरव्हाल (Narwhal) या माशांची त्वचा व त्याखाली असलेल्या मेद थराचा (Blubber) समावेश असे. या अन्नपदार्थाचे स्थानिक नाव मुकटुक (Muktuk) हे असून यामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण प्रति १०० ग्रॅममध्ये ३८ मिग्रॅ. इतके असते. त्यामुळे यांना क जीवनसत्त्वाची कमतरता जाणवत नाही. याचा शोध १९११ च्या सुमारास लागला.
कमतरता/अभाव : क जीवनसत्त्वाच्या अभावाने स्कर्व्ही रोग होतो. भारतीय उपखंडात आहारातील क जीवनसत्त्वाची कमतरता सहसा भासत नाही. त्यामुळे येथे स्कर्व्ही रोग दिसून येत नाही. स्कर्व्ही या रोगात दाताच्या खालच्या आवरणाला सूज येणे, त्यातून रक्त वाहणे, दात गळून पडणे, रक्तवाहिन्या व केशवाहिन्यांच्या भिंती नष्ट झाल्याने त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, स्नायूंमध्ये ताकद नसणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे असलेल्या व्यक्ती अतिशय लवकर थकतात, मानसिकदृष्ट्या त्या निराश होतात आणि अशीच स्थिती कायम राहिल्यास त्यांचा मृत्यूही संभवतो. ही स्थिती काही शतकांपूर्वी समुद्र प्रवासास जाणाऱ्या खलांशामध्ये होती. आता क्वचितच कुपोषित व्यक्तीमध्ये ही लक्षणे आढळतात.
पहा : अॅस्कॉर्बिक अम्ल (पूर्वप्रकाशित); जीवनसत्त्वे; स्कर्व्ही (पूर्वप्रकाशित).
संदर्भ :
- Food and Health, Hand book of National Institute of Nutrition, Hyderabad.
- Nutritional disabilities, Handbook of National Institute of Nutrition, Hyderabad.
- John Marks, A guide to the Vitamins : Their role in health and disease;.
- https://en.wikipedia.org/wiki/Muktuk#/media/File:Mattak.jpg
- https://www.healthline.com/nutrition/vitamin-c-foods
समीक्षक : वंदना शिराळकर